आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासांगलीत सुरू असलेली रामकथा सोडून महाराजांना दोन तासांच्या आत पुण्यातील वाघोली येथे कीर्तनासाठी येणे अशक्य असल्याचे पाहून आयोजकांसह भाविकांनी पुढाकार घेत केज येथील कीर्तनकार समाधान महाराज शर्मा यांना ५५ मिनिटांत वाघोलीला हेलिकॉप्टरने आणत भाविकांना सुखद धक्का दिला आहे.
केज तालुक्यातील रामकथाकार, कीर्तनकार समाधान महाराज शर्मा यांची सांगली येथे रामकथा सुरू आहे. त्यांना पुण्यातील वाघोली येथे सुरू असलेल्या कीर्तन महोत्सवात गुरुवार, ५ जानेवारी २०२३ रोजी कीर्तनाचे निमंत्रण देण्यात आले होते. परंतु, सांगली ते वाघोली हे अंतर पाच तास १७ मिनिटांचे होते आणि शर्मा महाराज यांची गुरुवारची रामकथा सायंकाळी पाच वाजता संपणार होती. दोन तासांत महाराजांना कारने वाघोली येथे पोहोचणे आवश्यक होते. कारने हा प्रवास करण्यासाठी महाराजांना पाच तास लागणार होते. ही परिस्थिती लक्षात घेऊन महाराजांच्या कीर्तनासाठी आयोजक शांताराम खटके व भाविकांनी त्यांच्यासाठी थेट सांगली ते वाघोली अशी महालक्ष्मी कंपनीच्या हेलिकॉप्टरची व्यवस्था केली. त्यामुळे समाधान महाराज शर्मा हे केवळ ५५ मिनिटांत वाघोली येथे कीर्तनासाठी सायंकाळी पोहचले. वाघोली येथे तीन दिवसांपासून कीर्तन महोत्सव सुरू झालेला असून गुरुवारी तिसऱ्या दिवसाचे कीर्तन शर्मा महाराज यांचे होते.
हेलिकॉप्टरमधून उतरताच महाराजांचे स्वागत
शर्मा महाराजांच्या कीर्तनाचा लाभ भाविकांना घेता यावा म्हणून आयोजक शांताराम खटके मित्रमंडळासह हरिदास जोगदंड, रवींद्र थोरात, राेहिदास खटके, सोमनाथ खटके, सोमनाथ आव्हाळे, बबन जायभाय, गणेश हारगुडे यांनी पुढाकार घेत वाघाेली येथे हेलिकॉप्टर येताच महाराजांचे जोरदार स्वागत केले.
सांगली ते वाघोली अंतर २४७ किमी आहे. रस्त्याने येण्यास ५ तास लागत असल्याने महाराजांना ५५ मिनिटांत कीर्तनस्थळी आणले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.