आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:रेल्वेमार्ग वेळापत्रक नसल्याने नगर ते आष्टीच्या मार्गासाठी प्रतीक्षा कायम, सोलापूर डिव्हिजनकडून निर्णय होईल

बीड / रवी उबाळे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर-बीड-परळी रेल्वेमार्गाची १९७४ पासूनची मागणी असून या मागणीला ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. प्रत्यक्षात नगर ते आष्टीपर्यंतच्या लाेहमार्गाचेही काम पूर्ण झालेले आहे. या ६१ किलोमीटर अंतराच्या लोहमार्गावर पॅसेंजर रेल्वे धावली पाहिजे यासाठी काही दिवसांपूर्वी खासदार डाॅ. प्रीतम मुंडेंनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंकडे मुंबई ते आष्टी पॅसेंजर गाडीची मागणी केली. मात्र, यासंदर्भात रेल्वे बाेर्डामार्फत काेणत्याही प्रकारचे रेल्वेमार्ग वेळापत्रक किंवा इतर गाड्यांची माहिती अधिकृतपणे जाहीर केलेेली नाही. त्यामुळे नगर ते आष्टी लाेहमार्ग झाला तरी प्रत्यक्षात पॅसेंजर रेल्वे धावण्यासाठी बीडकरांना प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

नगर-बीड-परळी रेल्वेमार्ग हा बीडकरांच्या जिव्हाळ्याचा आहे. यासाठी अलीकडच्या काळात केंद्र व राज्य सरकारने अर्धा-अर्धा खर्चाचा वाटा उचलल्यापासून या लाेहमार्गाच्या कामाला गती प्राप्त झाली आहे. जिल्ह्यातील हा लाेहमार्ग विकासासाठी चालना देणारा असून सद्य:स्थितीला प्रत्यक्षात नगर ते आष्टी असा ६१ किलोमीटर अंतराचा लाेहमार्ग पूर्ण झाला आहे. मात्र, यावर प्रवासी वाहतूक रेल्वे कधी सुरू हाेणार? त्याचे उद‌्घाटन? त्याचे वेळापत्रक काय? येणारी गाडी काेठून येणार व परत कशी जाणार? यासह अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. तसेच रेल्वे बाेर्डामार्फत यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडे काेणत्याही प्रकारची माहिती अधिकृतपणे दिलेली नाही.

दाेन दिवस पॅसेंजर रेल्वेची चाचणी
गुरुवारी (दि.३) सकाळी ९ वाजता नगरहून आष्टीकडे नारायणडोह, सोलापूरवाडी, धानोरा, कडा व आष्टी या रेल्वेस्थानकांवर पाच-पाच मिनिटे थांबून आष्टी रेल्वेस्थानकावर सकाळी ११.३० वाजता पॅसेंजर रेल्वेचे आगमन झाले हाेते. दुपारी १२ वाजता पुन्हा नगरकडे प्रयाण झाली. शुक्रवारी (दि. ४) नगर रेल्वेस्थानक येथून सकाळी ९ वाजता पॅसेंजर रेल्वे निघाली. नगर ते नारायणडाेह हे अंतर १५ किमीचे असून नारायणडाेह येथे १५ मिनिटांत पाेहाेचले. दिवसभर पॅसेंजर रेल्वे याच स्थानकात थांबून राहिली. रेल्वे अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली असता पॅसेंजर रेल्वेची चाचणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

सोलापूर डिव्हिजनकडून निर्णय होईल
नगर-बीड-परळी रेल्वेमार्गाच्या निर्माणची जबाबदारी आमच्या टीमवर आहे. त्यासंदर्भात कामे सुरू आहेत. नगर ते आष्टीपर्यंतचे काम पूर्ण झाले असून साेलापूर डिव्हिजनकडे वर्ग केले आहे. गाडी सुरू करण्याचे नियाेजन हे साेलापूर डिव्हिजनची जबाबदारी आहे. - विजयकुमार राॅय, चीफ इंजिनिअर, नगर-बीड-परळी लाेहमार्ग

दिव्य मराठी एक्स्पर्ट व्ह्यू / नामदेवराव क्षीरसागर, निमंत्रक, जिल्हा स्वातंत्र्यसैनिक रेल्वे मागणी आंदाेलन समिती
१९७२ ते १९७४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आष्टी येथे आल्या व त्यांनी मराठवाड्यातील लाेहमार्गांचा विचार करू असे जाहीर केले हाेते. सुरुवातीला मनमाड ते हैदराबाद हा मीटर गेजवरून ब्राॅड गेज केला. त्या वेळेस मराठवाडा जनता विकास परिषदेचे गोविंदभाई श्रॉफ यांच्या अध्यक्षतेत इंदिरा गांधींना ४२ मागण्यांचे मेमाेरँडम दिले हाेते. त्यात नगर-बीड-परळी लाेहमार्गाचा समावेश हाेता. म्हणून १९७४ पासून हीच मागणी सर्वांनी लावून धरली. पुढे १९८३ मध्ये मराठवाड्यात लोहमार्गावरून जोरदार आंदाेलन झाले. त्या वेळी बीड जिल्हाही बंद झाला.

रेल्वे प्रशासनाकडून माहिती प्राप्त नाही
राज्य सरकारने नगर-बीड-परळी रेल्वेमार्गासाठी ५० टक्के खर्चाचा हिस्सा उचलल्याने या मार्गाचे काम गतीने हाेत आहे. या लोहमार्गावर मुंबई ते आष्टी प्रवासी वाहतूक हाेण्यासंदर्भात बातम्याच वाचण्यात आल्या. रेल्वे प्रशासनाकडून लोहमार्गावरील वाहतुकीसंदर्भात जिल्हा प्रशासनाकडे माहिती प्राप्त झालेली नाही. - धनंजय मुंडे, पालकमंत्री, बीड

राज्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद
नगर ते आष्टीदरम्यान लोहमार्गाचे काम पूर्ण झाले. या मार्गावर प्रवासी वाहतूक सेवा सुरू करावी, अशी मागणी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंकडे केली आहे. त्यांनीदेखील लवकर या मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू करू असा सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. -डॉ. प्रीतम मुंडे, खासदार

बातम्या आणखी आहेत...