आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीचा प्रस्ताव लवकरात लवकर सादर करण्यात येईल. त्यांना दरमहा पेन्शन योजना लागू करण्याचा प्रस्ताव मंजूर करून घेण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करीन. असे आश्वासन महिला व बालविकास मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींना दिले. त्यामुळे अंगणवाडी सेविकांची पदयात्रा काढून मोर्चा आंदोलन मागे घेण्यात आला.
अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मागण्यासंदर्भात २० जून रोजी यवतमाळ येथून अमरावतीपर्यंत पदयात्रा काढून २५ जून रोजी महिला व बालविकास मंत्र्यांच्या अमरावती येथील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. तत्पूर्वी, १७ जून रोजी महिला व बालविकास मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी अंगणवाडीच्या विविध संघटनेच्या प्रतिनिधींना चर्चेसाठी बोलावून बैठक घेतली.
बैठकीला महिला व बालविकास विभागाचे उपसचिव श्री. ठाकूर, संबंधित विभागाचे आयुक्त श्रीमती रूबल अग्रवाल, राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे अध्यक्ष कॉ. एम. ए. पाटील, अंगणवाडी कर्मचारी सभाच्या अध्यक्षा कॉ. निशा शिवूरकर, राजेश सिंह, विजया सांगळे, माया पवार, हुकुमताई ठमके, अरुणा आलोणे, चंदा लिंगनवार, ज्योती कुलकर्णी हे उपस्थित होते.बैठकीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करा, त्यांना भरीव स्वरूपाची मानधनवाढ द्या, त्यांना दरमहा अर्ध्या मानधनाएवढी पेन्शन द्या, सध्या अंगणवाडी सेविकांना दरमहा ८३०० रुपये, मिनी सेविकांना ५९०० रुपये, व मदतनिसांना ४४५० रुपये मानधन मिळते. महागाई प्रचंड वाढत असताना त्यांच्या मानधनांत महाराष्ट्र शासनाने काहीही वाढ केलेली नाही.
अत्यंत कमी मानधनावर काम केल्यामुळे त्या आपल्या सेवाकाळात मानधनातून काहीच बचत करू शकल्या नाहीत. त्यामुळे त्यांना सेवानिवृत्तीनंतर म्हातारपणी उदरनिर्वाह करणे, औषधोपचार करणे अशक्य होते. म्हणून म्हातारपणी जगण्यासाठी त्यांना अर्ध्या मानधनाएवढी दरमहा पेन्शन द्यावी, अशी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची मागणी असल्याचे सांगितले. मंत्री ठाकूर व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आश्वासनानंतर ही पदयात्रा तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती अंगणवाडी कर्मचारी संघाच्या जिल्हा उपाध्यक्षा अनुसया वायबसे, तालुकाध्यक्षा इरफाना शेख, सिंधू घोळवे यांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.