आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हल्ला:केजच्या तहसील कार्यालयात ; नायब तहसीलदार बहिणीवर हल्ला करणाऱ्या भावाला सुनावली चार दिवसांची पोलिस कोठडी

केजएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शेतीच्या वादातून नायब तहसीलदार बहिणीवर काेयत्याने हल्ला केल्याची घटना केजच्या तहसील कार्यालयात सोमवारी (दि. ६) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली होती. जखमी नायब तहसीलदार आशा दयाराम वाघ यांच्यावर लातूरच्या रुग्णालयात शस्त्रक्रिया झाल्यानंतर पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवला. त्यानंतर मंगळवारी पहाटे २.३० वाजता केज ठाण्यात भाऊ मधुकर वाघ याच्यावर गुन्हा दाखल केला असून अटक केलेल्या भावास पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता त्याला १० जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

केज तहसील कार्यालयाच्या महसूल क्र. २ मध्ये १० वर्षांपासून नायब तहसीलदार पदावर आशा वाघ कार्यरत आहेत. त्यांच्यात व भाऊ मधुकर वाघ (रा. डोणडिगर, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) यांच्यात काही महिन्यांपासून कौटुंबिक वाद सुरू होता. मधुकर वाघने चाळीसगाव येथील नगरपालिकेतून आशा वाघ यांचे जिवंतपणीच मृत्यू प्रमाणपत्र काढले होते.

या प्रमाणपत्राचा आधार घेत मधुकरने आशा वाघ यांचे वर्ष २००४ मध्ये बोगस मृत्यू प्रमाणपत्र वापरून एमपीएससी व महसूल विभागाला फसवत असल्याची तक्रार महसूल सचिव, महसूल उपयुक्तांकडे केली होती.

या तक्रारीवरून उपायुक्तांनी आशा वाघ यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. एका पिशवीत कोयता ठेवून सोमवारी सकाळी ११.३० वाजता तो तहसील कार्यालयात पोहोचला आणि अचानकपणे त्याने आशा यांच्या डोक्यात व हातावर कोयत्याने सपासप वार केले होते.

कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान साधून हल्लेखोर मधुकर वाघ यास एका रूममध्ये कोंडून ठेवले होते. त्यानंतर गंभीर जखमी आशा वाघ यांच्यावर केज, अंबाजोगाई रुग्णालयात प्रथमोपचार करून लातूरच्या खासगी रुग्णालयात दाखल केले होते. सहायक पोलिस निरीक्षक संतोष मिसळे, फौजदार वैभव सारंग यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी तहसील कार्यालयाच्या कोंडून ठेवलेल्या रूममधून हल्लेखोर मधुकर वाघ यास कोयत्यासह ताब्यात घेतले होते.

शस्त्रक्रियेनंतर जबाब घेऊन गुन्हा दाखल
हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आशा वाघ यांच्यावर लातूर येथील खासगी रुग्णालयात सोमवारी रात्री ८.३० वाजता शस्त्रक्रिया केली. तीन तासाने त्या शुद्धीवर येताच फौजदार वैभव सारंग यांनी त्यांचा जबाब नोंदवून घेतला. मंगळवारी पहाटे २.३० वाजेच्या सुमारास त्यांच्या जबाबावरून मधुकर वाघ याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. सपोनि. संतोष मिसळे यांच्या मार्गदर्शनात फौजदार वैभव सारंग पुढील तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...