आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपहार:शेलगाव गांजी येथे जुनी विहीर नवीन दाखवून परस्पर पैसे उचलले

केज18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केज तालुक्यातील शेलगाव गांजी येथील एका शेतकऱ्याने १० वर्षांपूर्वी खोदलेली विहीर नवीन असल्याचे दाखवून शेतकरी आणि मजूर यांच्या परस्पर जिल्हा बँकेत त्यांचे खाते उघडून अपहार केला असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.

शेलगाव गांजी येथील शेतकरी विठ्ठल पटणे यांना २०११-१२ मध्ये त्यांच्या शेतामध्ये सिंचन विहीर मंजूर झाली. २०१४ मध्ये त्यांनी मजुरांमार्फत विहिरीचे खोदकाम सुरू केले आणि २०१५ मध्ये विहिरीचे पूर्ण खोदकाम पूर्ण झाले. मजुरांना १६ हजार ६२६ रु. मिळाले. नंतर त्यांनी मजुरांकरवी ३० फूट व्यास व ४१ फूट खोलीच्या विहिरीचे खोदकाम पूर्ण केले. परंतु, त्यांनी बिलाची मागणी करूनही तांत्रिक अडचणीमुळे व पूर्णत्वाचे प्रमाणपत्र अपलोड केल्यामुळे बिल निघायला अडचणी आल्या. त्यांनी वरिष्ठ कार्यालय व मंत्रालयातही पाठपुरावा सुरू ठेवला. पं. स. आणि जिल्हा नरेगा कक्षानेही अपूर्ण ऑनगोइंगमध्ये दाखवून लाभ देण्यासाठी कार्यवाही केली. परंतु त्याचा उपयोग झाला नाही.

दरम्यान, २०१६ मध्ये त्याच शेतकऱ्याच्या नावे पूर्वीची विहीर अस्तित्वात असतानाही नवीन वर्क कोड काढून २ लाख ७३ हजार ९०३ रु. मजुरांच्या खात्यावर वर्ग करून ते परस्पर उचलले असल्याची तक्रार पटणे यांनी केली आहे. बांधकामही केलेले नसताना खडी, सिमेंट, पाणी उपसा आणि क्रेन यासाठी १ लाख ३५ हजार ७३५ रुपये सरपंच, ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक, शाखा अभियंता व अधिकाऱ्यांनी संगनमत करून उचलून अपहार केल्याची तक्रार पटणे यांनी केली आहे.

विहीर कुणी चोरली? माझ्या शेतात एकच विहीर असताना दुसरी विहीर जर कागदोपत्री खोदली असेल तर ती विहीर मला शोधून द्यावी. नाही तर ती कुणी चोरली याचा तपास लावावा, अशी मागणी शेतकरी विठ्ठल पटणे यांनी केली.

चौकशी पूर्ण, कारवाई हाेईल : गवते या तक्रारीच्या अनुषंगाने सुनावणी घेण्यात आली असून चौकशी पूर्ण झाल्यानंतर कारवाई करण्यात येईल, असे मनरेगाचे तक्रार निवारण अधिकारी गवते यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...