आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामागील तीस वर्षांत पिण्याच्या पाण्यासाठी लाखो रुपयांचा चुराडा करून चार पाणीपुरवठा योजना राबवण्यात आल्या. मात्र प्रत्यक्षात एकाही योजनेचे आसोला गावास पाणी मिळाले नाही. दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसात पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागते. सध्या ग्रामस्थांना खासगी टँकरकडून चार रुपयाला घागरभर पाणी विकत घ्यावे लागते. विकत पाणी घेऊ न शकणाऱ्या महिलांना तीस फूट विहिरीत जीव धोक्यात घालून उतरावे लागत आहे.
धारूर शहरापासून पूर्वेस ७ किमी अंतरावर आसरडोह रोडवर आसोला गाव आहे. येथील तीन हजारांच्या जवळपास लोकसंख्या असून दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असते. या गावातील कायमस्वरूपी पाणीटंचाई दूर करण्यासाठी मागील तीस वर्षांत चार पाणीपुरवठा योजना झाल्या. वान नदीवरून तीन खेडी योजना, उपळी धरणावरून २० खेडी योजना, मठाच्या ठिकाणाहून पंधरा वर्षांपूर्वीची पाणीपुरवठा योजना, गावाच्या शिवारात विहीर खोदून केलेली दहा वर्षांपूर्वीची योजना अशा एकूण चार योजना गावासाठी करण्यात आल्या. या योजनेवर लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला, परंतु त्या योजनेचे पाणी ग्रामस्थांना मिळालेच नाही. मागील तीन वर्षांपासून ७० लाख रुपयांच्या मुख्यमंत्री पेयजल योजनेचे काम सुरू आहे. मात्र काम पूर्ण न झाल्याने त्याही योजनेचे पाणी गावात येते का नाही, असा प्रश्न आहे.
मागील चार वर्षांपूर्वी गावात १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून विहिरीचे बांधकाम करण्यात आले होते. त्या विहिरीतून काही अंतराने घागरभर पाणी मिळते. त्या विहिरीचेही दोन वर्षांपूर्वी कडे ढासळले आहे. सध्या गावात तीव्र पाणीटंचाई असल्याने ३० फूट असलेल्या विहिरीत जीव धोक्यात घालून घागरभर पाणी घेण्यासाठी उतरावे लागते. तेही पाणी पुरत नसल्याने पाणी विक्रीसाठी गावात खासगी टँकर येतात. चार रुपये घागरप्रमाणे पाणी खरेदी करावे लागते. विकतचे पाणी मिळविण्यासाठीही तासन््तास ताटकळत बसावे लागत आहे. महिलांना एक किमीच्या जवळपास डोक्यावरून घागरीने पाणी आणावे लागते.
ग्रामसेवकाची टाळाटाळ
गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे. तत्काळ टँकर सुरू करण्याची गरज आहे. परंतु येथील ग्रामसेवक हे सरपंचपद रिक्त असल्याचे सांगून मागील महिनाभरापासून टाळाटाळ करत आहेत. याकडे वरिष्ठांनी लक्ष घावे.
-ॲड संजय चोले, नागरिक, आसोला
गावात पाण्याची सुविधा नाही
आसोला गावात मागील महिनाभरापासून पिण्याच्या पाण्याची टंचाई सुरू आहे. टँकर मागणीशिवाय पर्याय नाही. सरपंचपदाची अडचण होती. अर्धा किलोमीटरहून पाणी आणावे लागते.
- एम. बी. डांगे, ग्रामसेवक.
योजनेचे काम अर्धवट
आसोला गावासाठी मुख्यमंत्री पेयजल योजनेचे काम सुरू आहे. योजना कार्यान्वित नाही. टँकरची गावास तत्काळ गरज आहे.
-रंजना गणेश चोले, सरपंच, आसोला
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.