आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराघरासमोरील अंगणात मैत्रिणीबरोबर खेळत असलेल्या चार वर्षांच्या चिमुकलीला आमिष दाखवत नदीवर नेऊन मुकादम तरुणाने तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. चार वर्षांपूर्वी दहिफळ वडमाउली (ता. केज) येथे घडलेल्या या घटनेतील आरोपीला अंबाजोगाई येथील अपर सत्र न्यायाधीश व्ही. के. मांडे यांनी गुरुवारी दहा वर्षांच्या तुरुंगवासाबरोबरच दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. शिक्षेनंतर त्याची बीडच्या जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. अण्णा ऊर्फ भाऊराव प्रभाकर गदळे (३७, रा. दहिफळ वडमाउली, ता. केज, जि.बीड) असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे.
दहिफळ वडमाउली येथील अण्णा उर्फ भाऊराव प्रभाकर गदळे या मुकादमाने दारूच्या नशेत ३० ऑक्टोबर २०१८ रोजी अल्पवयीन मुलीच्या घरी जाऊन तिच्या आई-वडिलांना धान्याचे पोते शिवण्यास मदत करण्याचा बहाणा केला होता. घरासमोर चार वर्षांची चिमुकली अंगणात मैत्रिणीसोबत खेळत होती. मुलीला आपण नदीकडे खेकडे धरायला जाऊ असे आमिष दाखवून शेतात नेत तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला. सायंकाळ होऊनही मुलगी घरी न परतल्याने तिच्या आई-वडिलांनी मुलीची शोधाशोध केली, परंतु ती सापडली नाही. त्यांनी गावातील मुलांकडे चौकशी केली असता गदळे हा मुलीला घेऊन गेल्याचे समजले. यावरून कुटुंबीयांना सायंकाळी गदळे हा अल्पवयीन मुलीबरोबर शेतात दिसला. मुलीच्या आई-वडिलांना पाहताच तो शेतातील पळसाच्या झाडाच्या आळ्यात जाऊन लपला. त्याला पकडण्यात आले होते.
पोक्सोनुसार चार वर्षांपूर्वी गुन्हा
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी केज पोलिस ठाण्यात ३० ऑक्टोबर २०१८ रोजी आरोपीवर पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केल्यानंतर तपास अधिकारी तथा पोलिस उपनिरीक्षक एस. एस. कदम यांनी अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. दरम्यान, २२ जून २०२२ रोजी अपर सत्र न्यायाधीश व्ही. के. मांडे यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली.
मुलीची साक्ष ठरली महत्त्वाची
या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने एकूण ७ साक्षीदार तपासले. यात अल्पवयीन मुलीची साक्ष महत्त्वाची ठरली. न्यायालयाने या प्रकरणातील साक्षीपुरावा व सरकारी वकिलाचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी अण्णा ऊर्फ भाऊराव प्रभाकर गदळे याला दहा वर्षांचा तुरुंगवास व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सरकार पक्षाच्या वतीने ॲड. लक्ष्मण फड यांनी काम पाहिले. पोलिस पैरवी म्हणून पो. कॉ. गोविंद कदम व पो.हे.कॉ. शिवाजी सोनटक्के यांनी काम पाहिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.