आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऐकावे ते नवलच:कारच्या समोर दुचाकी आडवी लावत पोलिसाच्या गळ्याला लावला चाकू अन् घड्याळ, मोबाइल हिसकावले; ‘फोन पे’वरून पैसे ट्रान्सफर कर म्हणत मारहाण

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पोलिसाचा पाठलाग करत गुंडांकडून लुटण्याचा प्रयत्न, येळंबघाटजवळ शस्त्रांच्या धाकावर भरदुपारची घटना

आजवर अनेकदा आपण चाेर-गुंडांच्या मागे पाेलिस धावताना पाहिले असेल, पण बीडमध्ये मात्र याउलट घटना घडली. केजहून बीडकडे जाणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याच्या कारसमाेर दुचाकी आडवी लावून दोन दुचाकींवर आलेल्या चार गुंडांनी मारहाण करत लुटण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे पाेलिसाच्या खिशात राेकड कमी असल्याने “फाेन पे’वरून एक लाख ट्रान्सफर करण्यासाठी दबाव टाकला. पाेलिस कर्मचारी समाधान धारलिंग खराडे (२७) व त्यांच्यासाेबतच्या मित्राने चाैघांशी दाेन हात केले अन् स्थानिकांच्या मदतीने चौघे गजाआड झाले. चौघा जणांत एमपीडीएनुसार कारवाई झालेल्या एका फरार आरोपीचा समावेश आहे.

समाधान हे केज पोलिस ठाण्यात पोलिस नाईक पदावर कार्यरत आहेत. मंगळवारी दुपारी दीड वाजता ते सुग्रीव सक्राते या मित्रासोबत कारमधून केजहून बीडकडे निघाले. दुपारी १.३० वाजेच्या सुमारास येळंबघाट पुलाजवळ आले असता पाठलाग करणारी एक दुचाकी (केए ३२ आयएफ-३०७) त्यांच्या कारला आडवी लावण्यात आली. त्या पाठोपाठ दुसऱ्या दुचाकीवर दोघे आले. चौघांनी मिळून खराडे व सुग्रीव यांना कारमधून ओढून मारहाण करण्यास सुरुवात केली. मोहंमद इम्रान मोहंमद अब्दुल लतीफने कमरेचा धारदार चाकू काढून खराडे यांच्या गळ्याला लावत हातातील ३ हजारांचे घड्याळ व ९ हजार किमतीचा मोबाइल काढून घेतला. त्यानंतर फोन पेवरून एक लाख रुपये टाक, असे म्हणत धमकावले. या वेळी तेथून जाणाऱ्या एका व्यक्तीने हल्लेखोरांना हटकले तेव्हा त्यालाही धमकी दिली. त्यामुळे त्याने पुढे जाऊन काही नागरिकांना याबाबतची माहिती दिली. मंगळवारी भारत बंदमुळे नेकनूर पोलिस गस्तीवर होते. गस्तीवरील दोन पोलिस तेथे पोहोचले. त्यांनी नागरिकांच्या मदतीने घटनास्थळी धाव घेत चौघांनाही पकडले. झडतीत त्यांच्याकडे दोन लोखंडी चाकू, कत्ती, बटणचा चाकू, दातऱ्या व धार असलेले दोन चाकू, एक जंबिया अशी शस्त्रे आढळली. मारहाणीत जखमी झालेले पोलिस कर्मचारी समाधान खराडे यांच्यावर केजमध्ये खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.

मारहाण करणाऱ्या या गुंडांवर कारवाई

याप्रकरणी मोहंमद इम्रान मोहंमद अब्दुल लतीफ (२२, रा. शहाबाजार, औरंगाबाद), मोहंमद फैसल मोहंमद आयाज (२०, रा. रोशन गेट, औरंगाबाद), शेख अहेमद शेख मकबूल (१९, रा. अहेमदनगर, गुलबर्गा, कर्नाटक), मोहंमद सद्दाम मोहंमद गौस (२८, रा. बंदानवाज दर्गा, पाकिजा गल्ली, गुलबर्गा, कर्नाटक) यांच्याविरुद्ध आर्मनुसार नेकनूर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला.

एमपीडीए होऊन दीड वर्षापासून फरार

या प्रकरणातील मुख्य आरोपी मोहंमद इम्रान मोहंमद अब्दुल लतीफ याच्यावर औरंगाबादेत खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण, लूटमार असे गंभीर स्वरूपाचे २० गुन्हे नोंद आहेत. जिन्सी पोलिसांनी त्याच्यावर मोक्कांतर्गत कारवाई केली होती. या गुन्ह्यात तो दीड वर्षापासून पोलिसांना हुलकावणी देत फरार होता.

नेकनूर एपीआयचे हद्दीत नियंत्रण नाही

नेकनूर हद्द काही दिवसांपासून वादग्रस्त ठरत आहे. एपीआय लक्ष्मण केंद्रे यांचा हद्दीत वचक नाही, अवैध धंद्यांवर कारवाई नाही. दिवाळीतही नेकनूर हद्दीत प्रियकराने प्रेयसीला अॅसिड टाकून जाळले होते. मंगळवारी येळंबघाटजवळ पोलिसालाच लुटण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांची ही अवस्था तर सामान्यांची काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser