आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:मराठवाड्याची नाट्य परंपरा या ग्रंथासाठी पुरस्कार; डॉ. साळुंकेंना मसाप पुरस्कार जाहीर

बीड14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाड्यातील प्रसिद्ध नाटककार व नाट्य अभ्यासक डॉ. सतीश साळुंके यांच्या ‘मराठवाड्याची नाट्यपरंपरा’ या बहुचर्चित बृहदग्रंथाला मराठवाडा साहित्य परिषदेचा २०२२ वर्षासाठी नाट्य विषयक उत्कृष्ट समीक्षा व संशोधनात्मक ग्रंथ लेखनासाठीचा प्रा. कुमार देशमुख नाट्य पुरस्कार घोषित करण्यात आला. मसापचे अध्यक्ष प्रा. कौतिकराव ठाले-पाटील यांनी ही घोषणा केली.

मराठी नाटकाचे उगमस्थान हे मराठवाडा असून लोक परंपरेतून अभिजात नाटक उभे राहिल्याचे संशोधन या ग्रंथातून डॉ. साळुंके यांनी मांडले. मराठी रंगभूमीच्या अभ्यासकांसाठी हा ग्रंथ मौल्यवान ठरला आहे. यात सातवाहन काळापासून राष्ट्रकूट, चालुक्य, यादव व बहामनी या वेगवेगळ्या कालखंडात मराठवाड्यात नाटकाचे स्वरूप कसे होते हे सप्रमाण मांडण्यात आले.

मराठवाड्याची शैक्षणिक रंगभूमी, बालरंगभूमी, दलित रंगभूमी, कामगार रंगभूमी, अभिजात रंगभूमी, १९६० ते २०२० पर्यंतच्या मराठवाडी रंगभूमीचा प्रवास, तंत्रज्ञ रंगभूमी, नाट्यगृहांची परंपरा, नाट्यलेखन परंपरा, आधुनिक रंगभूमीचे शिल्पकार व महत्त्वपूर्ण रंगकर्मींशी साधलेला रंगसंवाद अशा विविध विषयांवर मराठवाड्याच्या नाट्य परंपरेची संशोधनात्मक मांडणी ग्रंथात करण्यात आली आहे.‘मराठवाड्याची नाट्यपरंपरा’ या ग्रंथास नाटककार व नाट्य अभ्यासक प्रा. दत्ता भगत यांची प्रस्तावना असून दिग्दर्शक पद्मश्री वामन केंद्रे यांनी या ग्रंथाचा बर्ल्ब लिहिला आहे. डॉ. साळुंके यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल पद्मश्री वामन केंद्रे, सांस्कृतिक संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे, मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील, कार्यवाह डॉ. दादा गोरे, प्रा. दत्ता भगत, कुंडलिक अतकरे, डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी स्वागत केले आहे.

विविध विषयांवरील २५ पुस्तके प्रकाशित
डॉ. सतिश साळुंके यांची आजपर्यंत जवळपास पंचवीस विविध पुस्तके प्रकाशित आहेत. यामध्ये, दहा नाट्यविषयक पुस्तकांना राज्य शासनाच्या साहित्य व संस्कृती मंडळातर्फे उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार मिळाले आहेत. यामध्ये आता आणखी एका पुरस्काराची भर पडली आहे.

बातम्या आणखी आहेत...