आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दायित्व:जिल्ह्यात ठिकठिकाणी पर्यावरण दिन उत्साहात साजरा, माजलगावात येत्या काळात दहा गुंठ्यांत घनवन साकारण्याचा उपविभागीय अधिकारी बाफना यांचा मानस

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • योगेश्वरी विद्यालयात ‘जागर पर्यावरणा’चा कार्यशाळा, सोनपेठला वृक्षदिंडी; माजलगाव, गेवराईत वृक्षारोपण

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्ह्यात ठिकठिकाणी विविध उपक्रम राबवण्यात आले. अंबाजोगाई येथे योगेश्वरी महाविद्यालयात जागर पर्यावरणाचा कार्यशाळा पार पडली. माजलगाव येथे उपविभागीय कार्यालयात वृक्षारोपण करण्यात आले तर सोनपेठ येथे वृक्षदिंडी काढण्यात आली. यासह विविध उपक्रमांनी पर्यावरण भान जपण्याचा संकल्प रविवारी (ता.५ जून) ठिकठिकाणी करण्यात आला.

माजलगाव येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये महसूल प्रशासन आणि सामाजिक वनीकरण विभाग बीड यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण करण्यात आले. प्रातिनिधिक स्वरूपात विविध प्रकारच्या ११ झाडांची लागवड करण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, तहसीलदार वर्षा मनाळे, वनरक्षक डी.बी. शेळके, उपविभागीय अधिकारी कार्यालयातील व वन विभागातील अधिकारी, कर्मचारी हे उपस्थित होते. शाश्वत विकासासाठी पर्यावरणाचा समतोल साधणे अत्यंत आवश्यक असून, ती काळाची गरज तर आहेच परंतु, सर्वांचे नैतिक कर्तव्यही आहे.

त्यामुळे सर्व माजलगाववासियांनी येणाऱ्या पावसाळ्यात किमान एक तरी झाड लावावे. यासह लावलेल्या रोपांचे योग्य रीतीने संगोपन करावे. जेणेकरून भविष्यात पर्यावरणातील चांगला बदल आपल्याला पहावयास मिळेल व पर्यावरणाचा ऱ्हास थांबेल, असे आवाहन उपविभागीय अधिकारी नीलम बाफना यांनी केले. येणाऱ्या काळात चांगला पाऊस झाल्यानंतर उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या आवारातील १० गुंठा जागेत जवळपास ३००० झाडांची वृक्ष लागवड करून घन वन करण्याची योजना असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी अधिकारी, कर्मचारी हजर होते.

झाडांचा वाढदिवस साजरा
अंबाजोगाई येथे योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या छात्रसेना विभाग, जय हिंद ग्रुप व पतपेढी यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ‘जागर पर्यावरणाचा’ ही कार्यशाळा पार पडली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे सचिव सुभाष शिंदे होते तर प्रमुख वक्ते म्हणून सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चिक्षे हजर होते. मेजर एस.पी. कुलकर्णी, कॅडेट रोहन कुलकर्णी, भाग्यश्री आरवडे, रोहिणी करपे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लेफ्टनंट डॉ.राजकुमार थोरात यांनी केले. आभार प्रदर्शन पी.डी. शिंपले यांनी केले. पाहुण्यांचा सत्कार वैष्णवी नेहरकर व सुप्रिया साखरे यांनी केला.

याप्रसंगी बोलताना प्रसाद चिक्षे म्हणाले, आज मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत आहे. मानवाने निसर्गामध्ये ढवळाढवळ केली. त्यामुळे तापमान वाढ अवर्षण, पूर, भूकंप अशा संकटांना तोंड द्यावे लागत आहे. विद्यार्थ्यांनी पृथ्वी वाचवण्यासाठी जल, जमीन, जंगल यावर प्रेम करावे. मोठ्या प्रमाणात जंगल निर्मिती करावी. मेजर एस.पी. कुलकर्णी म्हणाले विद्यार्थी पर्यावरण जागरणाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करून वृक्ष लागवड व जलसाक्षरता यांचा प्रसार करत आहेत. ५ जून ते १७ सप्टेंबरपर्यंत शहिदांच्या स्मृतिप्रित्यर्थ वृक्षारोपण करण्यात येणार आहे, असे सांगितले.

अध्यक्षीय समारोप करताना सुभाष शिंदे यांनी मानवाला वाणी व पाणी फुकट मिळाले. त्यामुळे पाण्याची बचत करता आली नाही. पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी वृक्षारोपण करून लोक चळवळ उभी करणे गरजेचे आहे, असे सांगितले. यावेळी मेजर एस.पी.कुलकर्णी, प्रसाद चिक्षे, संतोष चौधरी, रोहिणी करपे या वृक्षप्रेमींच्या पुढाकारातून गेल्या काही वर्षात लावण्यात आलेल्या झाडांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वैभव चौसाळकर, प्रकाश आकुसकर, चंद्रकांत कांबळे, राहुल घाडगे यांनी परिश्रम घेतले. योगेश्वरी वृक्ष बँकेसाठी धनराज सोळुंके व त्यांच्या सहकाऱ्यांनी शंभर वृक्ष भेट दिले.

पर्यावरण संवर्धन गरजेचे
कृषि महाविद्यालय अंबाजोगाई येथे जागतिक पर्यावरण दिवस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे आध्यक्ष कृषि महाविद्यालय अंबाजोगाईचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ बाबासाहेब ठोंबरे होते तर प्रमूख अतिथी म्हणून अंबाजोगाईच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी मंजूषा मिसकर, चंदन कुलकर्णी, प्रकाश बोरगांवकार, सचिन एटलोड हे हजर होते. डाॅ.बाबासाहेब ठोंबरे म्हणाले, कृषि महाविद्यालय पातळीवरील अंबाजोगाई येथे वृक्ष लागवडीतून प्राणवायुचा अखंड स्रोत निर्माण झाला आहे असे सांगतानाच पर्यावरण संवर्धन गजरेचे असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाॅ.सुहास जाधव यांनी केले तर आभार डाॅ.विद्या तायडे यांनी मानले. यावेळी विद्यार्थी, कर्मचारी आदींची उपस्थिती होती.

वृक्षदिंडीला प्रतिसाद
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सोनपेठ नगर परिषदेच्या वतीने शहरात वृक्षारोपण व वृक्ष दिंडी काढण्यात आली. मुख्याधिकारी विठ्ठल केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी माविमच्या सय्यद, दिलीप जाधव, विजयमाला, वृक्ष मित्र महेश जाधव, कार्यालयीन अधिक्षक उमेश आर्दड, लेखापाल टी.डी.जोशी, पंडीत कदम, सुनिल राठोड, मुझमील अन्सारी, अशोक वाघुंबरे, वृक्ष लागवड विभाग प्रमुख धम्मपाल किरवले, एम.जे.गवारे, छगन मिसाळ, अविनाश भिसे, संदीप पोरे, दिलीप परळकर, श्रीकांत कराड, मुन्ना सय्यद, बचत गट महिला आणि नगर परिषदेचे सफाई कर्मचारी या सर्वांनी वृक्ष दिंडीत सक्रिय सहभाग नोंदविला.

शिक्षण कॉलनी येथे ज्येष्ठ नागरिक पी. सी.भांडे, मुख्याधिकारी विठ्ठल केदारे व सर्वांनी वृक्षारोपण केले. वृक्ष दिंडी नगर परिषद कार्यालयातून निघाली. जुने पोलीस स्टेशन, वडकर गल्ली, रामेश्वर मंदिर, खंडोबा मंदिर मार्गे सिरसाळा कॉर्नर व शिक्षण कॉलनी अशी ही दिंडी पार पडली. त्यानंतर शिक्षण कॉलनी येथील बागेत वडाचे झाड लावण्यात आले. यासह येत्या काळात पाच हजार झाडे लावणार असल्याचे सीओ केदारे यांनी सांगितले.

पर्यावरण हेच सर्वस्व
पर्यावरण सुरक्षित तरच समाजाचे आरोग्य सुरक्षित. त्यामुळे पर्यावरण हेच सर्वस्व असून त्याची काळजी घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केले. अंबाजोगाई येथे जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा देताना ते बोलत होते. आज सगळीकडे विकास कामाच्या नावाखाली मोठया प्रमाणावर वृक्षतोड केली जात आहे. राष्ट्रीय महामार्ग बनवतांना देखील शेकडो वर्षे जुने वटवृक्ष तोडली जात आहेत.

यामुळे जमिनीची झीज मोठ्या प्रमाणात होत आहे. पर्यायाने प्रचंड प्रमाणात पर्यावरणाची हानी होत आहे. याचा परिणाम आपल्या निसर्गावर होऊन ऋतु बदलावर देखील होत आहे. मात्र अशाही परिस्थितीत काही वृक्षप्रेमी लोक पर्यावरण संरक्षण करण्यासाठी धडपड करत आहेत.त्यांना नागरिकांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मोदी लर्निंग स्कुल येथे आजवर २५०० झाडे लावली असून येत्या काळात आणखी ५०० झाडे लावण्याचा संकल्प त्यांनी यावेळी केला.

बनसारोळा, ता. केज
केज तालुक्यातील बनसारोळा येथे स्व.उषाताई गोरे चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे, ग्रामशक्ती वेलफेअर फाऊंडेशन यांच्या वतीने पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच भीमराव गोरे माळी हजर होते. यावेळी सरपंच जयचंद धायगुडे, सोसायटी चेअरमन नाना गुरूजी, माजी सरपंच अशोक काकडे, बाळासाहेब जाधव आदी मान्यवरांनी वृक्षारोपण करत पर्यावरण दिनाचे महत्व स्पष्ट केले.

सर्वांचा पुढाकार हवा
वडवणी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात तहसीलदार दत्ता भारस्कर यांच्या हस्ते पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. नायब तहसीलदार सिरसेवाड, अव्वल कारकुन मंगेश बुचूडे, दिवटे यांच्यासह कर्मचारी हजर होते. पर्यावरण संवर्धनासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे तहसीलदार भारस्कर यांनी सांगितले. यावेळी इतर मान्यवरांनीही मार्गदर्शन केले.

बातम्या आणखी आहेत...