आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिंता:सोयाबीनसह इतर पिकांवर हुमणी किडींच्या प्रादुर्भावाने बळीराजा जेरीस

दिंद्रुडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील परिसरातील खरिपाच्या पिकांवर रोगराईची सुरू असलेली मालिका थांबण्याचे नाव घेत नसून याचा आर्थिक भुर्दंड शेतकऱ्यांना बसत आहे. सोयाबीन व ऊस या पिकांमध्ये हुमणीचा प्रादुर्भाव वाढला असल्याने पिके धोक्यात आली आहेत. सुरुवातीला शंखी गोगलगाय, नंतर मावा व थ्रीप्स आणि आता बोंडअळी व हुमणीमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.

दिंद्रुड (ता. माजलगाव) येथील शिवाजी शिंदे यांनी गट नंबर १६५ मध्ये सोयाबीन पेरले आहे. त्यातील जवळपास तीन एकर क्षेत्रातील सोयाबीनचे पीक उण्णी (हुमणी) लागल्याने नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. तसेच भोपा (ता.धारुर) येथील शेतकरी रामचंद्र वाघचौरे व भगवान वाघचौरे यांच्या अनुक्रमे २ एकर व ५ एकर उसाला हुमणी लागली आहे. आलापूर येथील रावसाहेब फपाळ यांचे १ एकरमधील सोयाबीन सुध्दा क्षतिग्रस्त झाले आहे. ही केवळ प्राथमिक स्वरूपातील उदाहरणे असून इतर ठिकाणीही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना कीड रोगांचा फटका बसला आहे. दिवसेंदिवस हा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

या भागात अगोदरच पावसाने दांडी मारल्यामुळे पिके करपू लागली आहेत. त्यातच हुमणी अळी ही पिकांच्या मुळांना कुरतडत असल्याने पीके खाली माना टाकत आहेत. अशीच परिस्थिती राहिल्यास शेतकऱ्यांचा मशागतीसाठी केलेला खर्च वाया जाईल. तसेच उत्पन्न घटल्याने मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान सुद्धा होऊ शकते. त्यामुळे वेळीच कृषी विभागाने हुमणी निर्मूलनासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी होऊ लागली आहे.मे महिन्यात शक्यतो २० तारखेपासून कडूलिंब व सुबाभूळ या झाडांवर पाने कुरतडणारे भुंगे दिसून येतात. त्यांच्या नर - मादीच्या मिलनातून अंडीकोष ओलसर जमिनीत सुप्तावस्थेत पडतात व त्यापासून हुमणीची उत्पत्ती होते, असे संशोधनातून पुढे आले असल्याचे कृषितज्ज्ञांचे मत आहे. त्यासाठी ‘फेरोमन’ सापळे लावून वेळीच हुमणीची उत्पत्ती रोखता येऊ शकते. त्यासाठी शेतकऱ्यांनी आता सावध होऊन तंत्रशुद्ध माहिती आत्मसात करणे गरजेचे असल्याचे जाणकार सांगतात.

लागवडीपूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना केली पाहिजे मुरमाड, सनवट व हलक्या प्रतीच्या जमिनीत जर काडी, कचऱ्यांचे प्रमाण असेल तर पिकाला हुमणी लागण्याची दाट शक्यता असते. सोयाबीन, ऊस, कांदा लागवडीपूर्वी खतामध्ये एकरी ५ किलोग्राम फिप्रोनील (जिआर) मिसळून पेरणी करावी. हुमणी चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा महत्त्वाचा आणि रास्त पर्याय आहे. एकदा का पिकामध्ये हुमनीचा प्रभाव वाढल्यास तो थांबवणे अवघड आहे. त्यामुळे पिकांच्या लागवडीपूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना केली पाहिजे. -चंद्रकांत फपाळ, प्रयोगशील शेतकरी व कृषी अभ्यासक.

बातम्या आणखी आहेत...