आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा११३ वर्षाची परंपरा असलेल्या श्रीक्षेत्र मुक्ताईनगर (जि. जळगाव) येथून पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी मार्गस्थ असलेल्या संत मुक्ताईंच्या पादुकांना बुधवारी शहागड (जि. जालना) येथील गोदावरी नदीत स्नान घालण्यात आले. त्यानंतर शहागड मार्गे पालखीने बीड जिल्ह्यात प्रवेश केला. बुधवारी ही पालखी गेवराई शहरातील केशवराज मंदिरात मुक्कामी होती.
पालखी सोहळ्यात एक हजार वारकरी आहेत. गुरुवारी (२३ जून) सकाळी ६ वाजता ही पालखी गेवराईतून बीडकडे मार्गस्थ होईन. सकाळी ९ वाजता गढी येथील जयभवानी सहकारी साखर कारखाना येथे येणार असून येथे न्याहारी करून पुढे नंतर पालखी नामलगाव फाटा (ता. बीड) येथील जाहीर पाटील विद्यालयात मुक्काम थांबेल. शुक्रवारी (२४ जून) पालखीचे बीड शहरात अागमन हाेऊन माळीवेस भागातील हनुमान मंदिरात विसावणार आहे. शनिवारी (२५ जून) सकाळी ११ वाजता माळीवेस येथील हनुमान मंदिरातून पालखीचे प्रस्थान शहरातील बालाजी मंदिर पेठ बीडकडे होणार असून येथे पालखी मुक्काम थांबेल. रविवारी (२६ जून) ही पालखी मार्गस्थ हाेऊन पाली (ता. बीड) येथे मुक्कामी असेल. सोमवारी (२८ जून) मोरगाव चौसाळा मुक्काम करून पारगाव, वाकड, आष्टी मार्गे पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे.
संत मुक्ताईंच्या पालखीसोबत आरोग्य पथक
मुक्ताईंच्या पालखीत महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटकमधील वारकरी सहभागी अाहेत. त्यांच्या सेवेसाठी संस्थानची दोन वाहने, जळगाव जिल्हा परिषदेचे आरोग्य पथक, जळगाव बांधकाम विभागाचे पाणीपुरवठा करणारे टँकर आहे. सोहळ्यासाठी विश्व हिंदू परिषद देवगिरी प्रांत यांच्यातर्फे सुरुवातीपासून पाणीपुरवठा करण्यासाठी टँकर दिले जाते.
यंदा सप्तशती शताब्दी सोहळ्याला विशेष महत्त्व
पालखी सोहळा संस्थानचे अध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात सुरू असून व्यवस्थापक विनायक हरणेंचे सहकार्य लाभतेय. यंदा संत मुक्ताई अंतर्धान सोहळा सप्तशती शताब्दी सोहळ्यास विशेष महत्त्व आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.