आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियम मोडावा:माझ्यामुळे तुम्हाला नियम मोडावा लागला, सर त्रासाबद्दल माफ करा

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आज हे पत्र लिहिताना पुन्हा मनमाडच्या इंडियन हायस्कूलच्या सातवीच्या वर्गात बसलाेय असेच वाटतेय. सध्याच्या काळात संपर्काची अनेक साधनं असतानाही हे पत्र लिहितोय कारण इंग्रजीचे शिक्षक म्हणून तुम्हीच अाम्हाला पत्रलेखन शिकवलं होतं. सध्या मी बीडचा पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत आहे. नियम मोडणाऱ्यांना दंड करतो मात्र आज माझ्यामुळे तुम्हाला मोडाव्या लागलेल्या एका नियमाबद्दल माफी मागण्यासाठी हा पत्रप्रपंच..

मला आठवतंय मी सातवीत होतो. वार्षिक परीक्षा सुरू होत्या. मराठीचा पेपर होता. पर्यवेक्षक म्हणून तुम्ही होता. मी पटापट सर्व उत्तरे लिहिली अन् पेपर जमा केला अन् वेळेआधीच घरी पाेहोचलो. माझे वडील त्र्यंबकराव ठाकूर हेही याच हायस्कूलमध्ये शिक्षक होते नंतर ते मुख्याध्यापकही झाले. अतिशय कडक शिस्तीचे असल्याने आम्ही सगळी भावंडे त्यांना वचकूनच असायचो. वार्षिक परिक्षेत वेळेआधीच मी घरी कसा, हा प्रश्न त्यांनी विचारला. सगळा पेपर सोडवून मी आल्याचे वडिलांना सांगितले तर त्यांनी प्रश्नपत्रिका पाहून खात्री केली. काही प्रश्नांत सातपैकी पाच प्रश्न सोडवायचे होते ते सोडवले होते पण वेळ असतानाही सर्व प्रश्न का सोडवले नाही ? असे विचारले. त्याचे गुण मिळणारच नाही तर सोडवायचे कशाला असे म्हणत मी बाजू मांडली पण, हे प्रश्न सोडवले असतेस तर तुझा सराव झाला असता तो कामी आला असता.

केवळ गुणांसाठी आणि गुणांपुरताच अभ्यास करू नये तर ज्ञान मिळवण्यासाठी करावा असा सल्लाही त्यांनी दिला. जा पुन्हा जाऊन पेपर लिही असे फर्मान साेडले. पण, एकदा पेपर जमा केल्यानंतर पुन्हा तो देता येत नाही हा नियम मी वडिलांच्या लक्षात आणून दिला. ‘नंदूला त्याचा पेपर पुन्हा दिला जावा,’ अशी दोन ओळींची चिठ्ठी त्यांनी माझ्या हाती देत शाळेत पाठवले. ती चिठ्ठी पाहून तुम्ही धर्मसंकटात सापडलात.

पेपर द्यावा तर नियम मोडणार अन् न द्यावा तर सहकारी नाराज अशी स्थिती. तुम्ही नियम मोडून मला पुन्हा पेपर दिला अन् पर्यायी प्रश्नांसह मी तो सोडवला. वडिलांच्या आग्रहाखातर माझ्यासाठी तुम्हाला नियम मोडावा लागला, त्याचा तुम्हाला त्रासही झाला असेल पण इतक्या वर्षांनंतरही ही घटना मनात आहे. आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने या त्रासाबद्दल तुमच्याकडे माफी मागतोय...तुम्ही माफ करालच.तुमचाच नंदकिशोर ठाकूर, पाेलिस अधीक्षक, बीड (शब्दांकन : अमोल मुळे)

बातम्या आणखी आहेत...