आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बीड जिल्ह्यातील येळंबघाट परिसरात तरुणीवर प्रथम अॅसिड व नंतर पेट्रोल टाकून निर्घृणपणे जाळणारा नराधम अविनाश रामकिसन राजुरे (२४) यास रविवारी नांदेड जिल्ह्यात देगलूर परिसरात अटक करण्यात आली. सुमारे ५० टक्के भाजलेल्या या तरुणीचा बीड जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मानवतेला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. फेब्रुवारी महिन्यात वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथेही एका प्राध्यापक तरुणीला पेट्रोल टाकून भररस्त्यात जाळून टाकले होते. या घटनेनंतर महिला सुरक्षेसाठी राज्यात आंध्र प्रदेशच्या धर्तीवर ‘दिशा’ कायदा करण्याचे आश्वासन महाविकास आघाडी सरकारने दिले होते. परंतु अद्याप त्यावर अंमलबजावणी झालेली नाही. यामुळे विरोधकांनी ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. तरुणीला अॅसिड आणि पेट्रोल टाकून जाळले गेले, १२ तास ती रस्त्यावर उपचाराविना पडून होती आणि अखेर तिचा मृत्यू झाला. ही घटना मानवतेला काळिमा फासणारी आहे. राज्यात सातत्याने महिला अत्याचारात वाढ होते आहे. आघाडी सरकारने या प्रकरणात तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुसती भाषणे न करता दिशा कायदा मंजूर करावा आणि हा शिवरायांचा महाराष्ट्र असल्याचे कृतीतून दाखवून द्यावे. बीड जिल्ह्यातील ही घटना मानवतेला काळिमा फासणारी असून उद्या भाऊबिजेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील भगिनींना दिशा कायद्याची ओवाळणी द्यावी, अशी मागणी भाजपच्या राज्य उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी रविवारी केली.
तत्काळ कृती आराखडा बनवा : उत्तर प्रदेशातील हाथरस पीडितेच्या नावाने गळा काढणाऱ्यांचा गळा आता कोणी दाबला आहे का? बीडची घटना महाराष्ट्राला काळिमा फासणारी असून राज्यातील महिला सुरक्षेसाठी तत्काळ कृती आराखडा बनवा, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. महिलांवरील वाढते अत्याचार ही चिंतेची बाब झाली आहे. असे प्रकार रोखण्यासाठी आघाडी सरकारने त्वरित कठोर पावले उचलावीत, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.
जलदगती न्यायालयात खटला चालवणार
बीड जिल्ह्यातील घटनेची सरकारने गंभीर दखल घेतली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. दोषीला कडक शिक्षा व्हावी यासाठी जलदगती न्यायालयात खटला चालवण्यासंदर्भात सूचना करण्यात आली आहे. या प्रकरणावर मी स्वत: लक्ष ठेवून आहे.- अनिल देशमुख, गृहमंत्री
१२ तास विव्हळत पडून होती तरुणी
नांदेड जिल्ह्यातील शेळगाव (ता. देगलूर) येथील सावित्री दिगंबर अंकुमवार (२२) आणि तिच्या गावातील अविनाश रामकिसन राजुरे (२४) हे दोघे पुणे येथे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहत होते. दिवाळीसाठी शुक्रवारी रात्री दुचाकीने गावाकडे निघाले होते. शनिवारी पहाटेच्या सुमारास अविनाशने येळंबघाट परिसरात सावित्रीचा गळा दाबला. तिच्यावर अॅसिड फेकले व नंतर पेट्रोल टाकून जाळले. जळत्या अवस्थेतच तिला रस्त्याजवळील खदानीत फेकून दिले होते. तब्बल १२ ते १५ तास ही तरुणी मदतीविना खदानीत विव्हळत पडून होती. तिला शनिवारी एका नागरिकाने नेकनूर पोलिस ठाण्यात वर्दी दिल्यानंतर तत्काळ बीड जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु रविवारी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.