आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीडच्या अंबाजोगाईत भीषण अपघात:भरधाव कारने चौघांना 100 फूट फरफटत नेले, तिघांचा जागीच मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी

बीड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीडच्या अंबाजोगाई तालुक्यात एक भीषण अपघात झाला आहे. भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने, कारने रस्त्यावर उभ्या असलेल्या चौघांना जबर धडक दिली. या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाले आहेत. तर रस्त्यावरील दोघे आणि कारमधील दोघे असे 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवारी रात्री 9:30 च्या दरम्यान बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूरमध्ये झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री ही कार भरधाव वेगाने अंबाजोगाईकडून घाटनांदूरकडे येत होती. यादरम्यान कारच्या चालकाचे गाडीवरीवरील नियंत्रण सुटले आणि त्याने रस्त्यावर उभे असलेल्या चौघांना धडक दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, अंबाजोगाईहून नातेवाईकांचा अंत्यविधी उरकून अहमदपूरला परत जाणाऱ्या भरधाव कार (एमएच 24 व्ही 2518) चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने घाटनांदूर येथील पोलिस चौकीसमोर रस्त्यालगत असलेल्या पानपट्टीसमोर बोलत उभे असलेल्या चौघांना कारने भरधाव वेगात धडक दिल्याने वैभव उर्फ सौरभ सतीश गिरी(वय 22) लहू बबन काटुळे (वय 30) हे दोघे जागीच ठार झाले. तर रमेश विठ्ठल फुलारी(वय 45) (सर्व घाटनांदूर ) याला उपचारासाठी लातूरला घेऊन जात असताना रस्त्यात मृत्यू झाला.

तर उद्धव निवृत्ती डोमपले (वय 47) (नवाबवाडी येथील सालगडी) कार चालक अलिम शेख (वय 25) दीपक वैजनाथ राजारोशे (वय 35) (रा.अहमदपूर) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना तात्काळ अंबाजोगाई येथील स्वाराती ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघात एवढा भीषण होता की कारच्या धडकेने रस्त्यालगत असलेले लोखंडी खांब उपटून खाली पडला. एकाच अपघात तिघांचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थातून हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघाताची माहिती मिळताच अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वासुदेव मोरे, आंबाजोगाईचे पोलिस अधीक्षक सुनील जायभाये यांनी अपघात स्थळाची पाहणी केली.

बातम्या आणखी आहेत...