आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धक्कादायक बाब:तंत्रज्ञ नाही, चालकच उतरवतो ऑक्सिजन; जिल्हा रुग्णालय : प्रशिक्षिणाची खात्री नाही; प्रेशर कंट्रोल न झाल्यास नाशिकातील दुर्घटनेसारखा घडू शकतो अनर्थ

बीड8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • टँकरचालकच ऑक्सिजन टँकरमधून टाकीत सोडतो. मात्र, तो प्रशिक्षित आहे का हे कुणीही तपासलेले नाही.

जिल्हा रुग्णालयाच्या लिक्विड ऑक्सिजन प्रकल्पाचे औरंगाबादच्या सागर गॅस एजन्सीला ५ वर्षांसाठी देखभाल दुरुस्तीचे कंत्राट दिलेला आहे. टँकरमधून टाकीत ऑक्सिजन सोडताना तिथे कंपनीचा प्रशिक्षित तंत्रज्ञ उपस्थित असणे अपेक्षित आहे, मात्र टँकरचालकच हा ऑक्सिजन उतरवत असल्याचे ‘दिव्य मराठी’च्या पाहणीत समोर आले. शिवाय, हा टँकरचालक या कामासाठी प्रशिक्षित असल्याची कुठलीही खातरजमा रुग्णालय प्रशासनाने केलेली नाही. त्यामुळे नाशिकसारखी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण? हा प्रश्न आहे. कोरोना रुग्णांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ऑक्सिजनची मागणीही वाढत आहे. जिल्ह्याला रोज २२ मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता अाहे.

मात्र, त्या तुलनेत पुरवठ्याचे प्रमाण कमी आहे. जिल्हा रुग्णालय, लोखंडी सावरगाव रुग्णालय व अंबाजोगाईचे स्वाराती रुग्णालय येथे गतवर्षी प्रशासनाने लिक्विड ऑक्सिजन प्रकल्प उभारले होते. १० केएल क्षमता असलेले हे प्रकल्प आहेत. टँकरमधून द्रवरूप ऑक्सिजन या टाक्यांमध्ये सोडला जातो. या प्रकल्पात द्रवरूप ऑक्सिजन वायुरूप करून तो मध्यवर्ती पाइपलाइनद्वारे रुग्णांपर्यंत पोहोचवला जातो. दरम्यान, टँकरमधून येणारा हा द्रवरूप ऑक्सिजन टाकीत सोडताना त्याचे प्रेशर कंट्रोल असणे किती महत्त्वाचे असते, ही बाब नाशिकच्या दुर्घटनेनंतर समोर आली.

थेट प्रश्न (QA) याबाबत ‘दिव्य मराठी’ने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते यांना काही प्रश्न केले, त्याची उत्तरे त्यांना देता आली नाहीत.

प्रश्न : टँकरचालकच ऑक्सिजन उतरवतो तिथे तंत्रज्ञ का नाही?
डॉ. गित्ते : आतापर्यंत तरी कंपनीने कधीही तंत्रज्ञ दिलेला नाही.

प्रश्न : टँकरचालकाने ऑक्सिजन उतरवणे चूक आहे, तंत्रज्ञ हवा.
डॉ. गित्ते : टँकरचालक प्रशिक्षित असू शकतो म्हणून तो उतरवतो.

प्रश्न : टँकरचालक प्रशिक्षित असल्याची खात्री केली का?
डॉ. गित्ते : आम्ही अशी खात्री केलेली नाही.

प्रश्न : चालकाचे प्रशिक्षणाचे काही प्रमाणपत्र आहे का?
डॉ. गित्ते : आम्ही त्याचे प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र पाहिलेले नाही.

प्रश्न : कंत्राटदार कंपनीने तरी तो प्रशिक्षित आहे हे कळवले आहे का?
डॉ. गित्ते : कंपनीनेही चालक प्रशिक्षित आहे की नाही हे कळवले नाही.

प्रश्न : दुर्घटना घडल्यास जबाबदार काेण? काय उपाययोजना करणार?
डॉ. गित्ते : चालक प्रशिक्षित आहे का? याची तपासणी केली जाईल.

... म्हणून मीच उतरवला ऑक्सिजन
‘तुम्ही रोज टँकर उतरवता का? असा प्रश्न टँकरचालकाला विचारला असता आज प्रथमच हे काम करत असल्याचे सांगितले. यानंतर त्याच्या संभाषणाचा व्हिडिओ शूट करण्यास सुरुवात केली. ही बाब लक्षात येताच रोज माझ्यासोबत तंत्रज्ञ असतो,’ असे टँकरचालकाने सांगितले, मात्र आज तंत्रज्ञ नाही हे लक्षात आणून दिल्यानंतर आज तो आला नसल्याने मीच ऑक्सिजन उतरवला, असे त्याने सांगितले. जर रोज हे काम न करणाऱ्या व्यक्तीने अचानक काम केले तर अपघाताचा धोका अनेक पटींत आहे.

रुग्णालयाचा कर्मचारी तोही अप्रशिक्षित
टँकर उतरवताना तिथे जिल्हा रुग्णालयाच्या आॅक्सिजन प्रकल्पाचे काम पाहणारा कर्मचारी उपस्थित असतो, मात्र हा कर्मचारीही कंत्राटी स्वरूपाचा असून तोही अप्रशिक्षित आहे. केवळ एका खासगी प्रकल्पावर केलेल्या कामाच्या अनुभवाच्या आधारावर तो हे काम करत आहे.

बातम्या आणखी आहेत...