आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संशोधन:​​​​​​​सिरो सर्वेक्षणाचा चौथा टप्पा; रविवारी पथक जिल्ह्यात, रक्ताचे नमुने घेणार; 400 व्यक्तींचे रक्त नमुने तपासणीसाठी घेणार

बीड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नागरिकांमध्ये हर्ड इम्युनिटी तयार होत असल्याबाबत सुरू आहे सर्वेक्षण
  • जिल्ह्यातील आठ गावे, दोन शहरी प्रभागांची केली निवड

कोरोनाच्या अनुषंगाने भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेकडून (आयसीएमआर) सुरू असलेल्या संशोधनात सिरो सर्वेक्षण केले जाते. राज्यात आतापर्यंत याचे तीन टप्पे पार पडले अाहेत. चाैथा टप्पाही सुरू केला असून रविवारी (२० जून) यासाठी पथक जिल्ह्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी आर. बी. पवार यांनी दिली. नागरिकांमध्ये कोरोनाशी लढणाऱ्या अँटिबॉडी नैसर्गिकरीत्या तयार होऊन हर्ड इम्युनिटी तयार होत आहे. याबाबत आयसीएमआरकडून वर्षभरापासून संशोधन केले जात आहे. सिरो सर्वेक्षणाद्वारे हे संशोधन केले जात आहे. यामध्ये नागरिकांचे रक्त नमुने घेऊन त्यांच्यातील कोविड अँटिबॉडीची तपासणी केली. वर्षभरापासून आयसीमएआरचे शास्त्रज्ञ यावर काम करताहेत.

राज्यातील बीड, परभणी, नांदेड, अहमदनगर, जळगाव आणि सातारा या सहा जिल्ह्यांमध्ये आयसीएमआरने हे सर्वेक्षण केले. आतापर्यंत याचे तीन टप्पे पार पडलेत. नागरिकांमध्ये नैसर्गिकरीत्या कोरोनाविरोधात लढणाऱ्या अँटिबॉडीज वाढत असल्याचा निष्कर्ष आतापर्यंतच्या संशोधनातून निघाला आहे. ठरावीक ठिकाणे निश्चित करून त्याच ठिकाणी हे संशोधन होेत आहे. बीड जिल्ह्यातील आठ गावे आणि दोन शहरी प्रभाग यासाठी निवडले आहेत. दरम्यान, आता चौथा टप्पाही २० जूनपासून सुरू करण्यात येणार आहे. याबाबत आयसीएमआर व राज्याच्या आरोग्य विभागाने सर्व जिल्ह्यांना तयारी करण्यासंदर्भात व सर्वेक्षणासाठी येणाऱ्या पथकांना साहित्य उपलब्धता आणि सहकार्य करण्याबाबत पत्र काढले आहे.

या दहा ठिकाणी होणार सर्वेक्षण
आष्टी तालुक्यातील हिंगणी, शिरूर तालुक्यातील पांगरी, गेवराई तालुक्यातील आम्ला, माजलगाव तालुक्यातील तळेवाडी, बीड तालुक्यातील पिंपळनेर, केज तालुक्यातील चंदन सावरगाव, परळी तालुक्यातील मोहा, अंबाजोगाई तालुक्यातील नांदगाव या गावांत तर बीड शहरातील प्रभाग क्र.२३ व परळी शहरातील प्रभाग क्र. ३० मध्ये रक्तनमुने घेतले जातील.

चेन्नईच्या प्रयोगशाळेत रक्त नमुन्यांची होणार तपासणी
आयसीएमआरच्या पथकाकडून आठ तालुक्यांतील आठ गावे आणि दोन शहरातील दोन प्रभागात सुमारे ४०० नागरिकांचे रक्त नमुने तपासणीसाठी घेतले जातील. चेन्नईच्या प्रयोगशाळेत या रक्त नमुन्यांची तपासणी होईल.

२१ ला सर्वेक्षण, जिल्ह्याकडून सहकार्य
आयसीएमआरच्या पथकांना बीड जिल्हा परिषदेकडून पूर्ण सहकार्य केले जात आहे. तिसऱ्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचेही रक्तनमुने तपासले होते यात २५ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये अँटिबॉडीज आढळून आल्या होत्या. २० जून रोजी पथक जिल्ह्यात येत असून २१ जून रोजी सर्वेक्षण होईल. - डॉ. आर. बी. पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड.

अँटिबॉडीज म्हणजे काय ?
रक्तातील अँटिबॉडीज ज्यांना मराठीत प्रतिपिंड असे म्हणतात. शरीरात एखादा विषाणू, बॅक्टेरियाने प्रवेश केल्यास त्याच्याशी लढणाऱ्यासाठी काही प्रोटीन तयार होत असतात. तेे वाय आकाराचे असतात. विषाणूचा अथवा बॅक्टेरियाचा प्रभाव कमी करण्याचे काम हे वाय आकाराचे प्रोटीन करत असतात त्यांना अँटिबॉडीज म्हणतात. शरीरात अँटिबॉडीज तयार होणे याचा अर्थ त्या आजाराचा संसर्ग झाला होता असा काढता येतो.

बातम्या आणखी आहेत...