आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:रुग्ण एकीकडे अन् डॉक्टर दुसरीकडेच; बाधितांचा मुक्तसंचार, 7 जण कार्यमुक्त

आष्टी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
आष्टी येथील कोविड केअर सेंटरची पाहणी करताना जिल्हा आरोग्य अधिकारी आर. बी. पवार, टीएचओ मोरे व इतर. - Divya Marathi
आष्टी येथील कोविड केअर सेंटरची पाहणी करताना जिल्हा आरोग्य अधिकारी आर. बी. पवार, टीएचओ मोरे व इतर.
  • आष्टीतील वास्तव जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या पाहणीत आले समोर

रुग्ण असलेली इमारत एकीकडे आणि उपचार करणारे डॉक्टर दुसरीकडे. स्वच्छतेच्या नावाने बोंब म्हणून सगळीकडे घाणीचा कहर म्हणजे कोरोनाबाधितांचा परिसरात मुक्त संचार सुरू असल्याचे चित्र दस्तुरखुद्द जिल्हा आरोग्य अधिकारी आर. बी. पवार यांना आष्टी येथील कोविड केअर सेंटरमध्ये केलेल्या सरप्राइज व्हिजिटमध्ये दिसून आले. यावर संतापलेल्या पवारांनी अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनाही तिसऱ्या पट्टीत खडे बोल सुनावले. एका डॉक्टरसह परिचारिका, वॉर्ड बॉय अशा एकूण ७ जणांना तडकाफडकी कार्यमुक्त करत त्यांना घरचा रस्ता दाखवला.

शनिवारी अाष्टीत पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा दौरा असल्याने जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक असा आरोग्य विभागाचा लवाजमा आष्टी दौऱ्यावर होता. दरम्यान, जिल्हा आराेग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी सकाळीच आष्टी शहरातील आयटीआयमधील कोविड केअर सेंटरला अचानक भेट दिली. या वेळी कोरोनाबाधित काही रुग्ण इमारतीखाली येऊन परिसरात फिरताना दिसले तर इथे कर्तव्यावर असलेल्या महिला डॉक्टर, परिचारिका या दुसऱ्या इमारतीत बसलेले दिसले. त्यानंतर डाॅ. पवारांनी काेविड सेंटरमध्ये जाऊन पाहणी केली. त्याठिकाणी काम करत असलेले वाॅर्डबाॅय हे कर्तव्यावर नसून, कोविड सेंटरमध्ये स्वच्छता नसल्याचे दिसून आले. या बाबीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना तिसऱ्या पट्टीत झापले. डॉ. पवारांनी खडे बोल सुनावत कामचुकारांना दाखवला घरचा रस्ता

डॉक्टरसह परिचारिका, ४ वॉर्डबॉय यांना नोटीस
डॉ. पवारांनी कामचुकारांना आरोग्य विभाग पाठीशी घालणार नाही. कोरोना रुग्णांवर उपचार गांभीर्याने व्हायला हवेत असे सांगत भेटीवेळी कर्तव्यावर असलेल्या आरोग्य अधिकारी डाॅ. माधुरी पाचरणे यांच्यासह एएनएम (नर्स) आश्विनी पाणतवणे, रूपाली काळे, वॉर्डबाॅय निखिल वाघुले, आकाश राऊत, सुमीत धोंडे, भारत राऊत यांना तडकाफडकी कार्यमुक्त केले. शिवाय आपणावर गुन्हे दाखल का करू नयेत? अशी नोटीसही बजावली आहे.

कर्तव्याचे भान नसेल तर काम करू नका
उपचार घेत असलेले रुग्ण सीसीसी केंद्रातून गेटच्या बाहेर डाॅक्टर, वाॅर्डबाॅय व विशेष म्हणजे गेटवर पोलिस कर्मचारी असूनसुद्धा कोरोना रुग्ण गेटबाहेर जातात कसेॽ यावरून तुम्ही कर्तव्य किती जबाबदारीने पार पाडतात हे दिसून आले. कर्तव्याचे भान नसेल तर काम करू नका, असे खडे बोल सुनावत जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. पवार यांनी अधिकारी व कर्मचारी यांना झापले.

हलगर्जीपणा नको, इतर कर्मचाऱ्यांनाही सूचना
सध्या सीसीसी केंद्रात १०९ रुग्ण उपचार घेत अाहेत. यासाठी सात डाॅक्टर, आठ नर्स व १२ वॉर्डबाॅय यांची नियुक्ती केलेली आहे. प्रत्येकाने गांभीर्याने जबाबदारी पार पाडणे गरजेचे असताना कामात हलगर्जीपणा करताना असे जर पुन्हा दिसून आले तर त्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही. -डाॅ. नितीन मोरे, तालुका वैद्यकीय अधिकारी, आष्टी.


बातम्या आणखी आहेत...