आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बीड जिल्हात ४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन:ठोक किराणा विक्रेत्यास २, भाजी विक्रेत्यांना ३ तासांची मुभा; दूध विक्री सकाळी १० पर्यंत, बीडला दोन पंपांवरच पेट्रोल

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन २५ मार्च रोजीच्या रात्री १२ वाजेपासून ४ एप्रिलपर्यंत जिल्ह्यात कडक लॉकडाऊन जाहीर केले. याप्रसंगी एसपी आर.राजा, सीईओ अजित कुंभार आदी.

जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेवून येत्या २५ मार्चच्या रात्री १२ वाजेपासून ४ एप्रिलपर्यंत जिल्ह्यात कडक लॉकडाऊन जाहीर केले. या काळात जिल्ह्यात संचारबंदीही लागू केली असून दहा दिवसांत मॉर्निंग व इव्हिनिंग वॉकला बंदी घातली अाहे. जिल्ह्यातील हॉटेल्स, मॉल, बाजार, शाळा, महाविद्यालये, क्लासेस, सिनेमागृह, नाट्यगृह बंद राहणार आहेत. लग्नालाही बंदी असल्याने मंगल कार्यालयात सनईचे सूर गुंजणार नाहीत. जिल्ह्यात ठोक किराणा दुकानदारांना दोन तास दुकाने सुरू ठेवता येतील, तर दूध विक्रेत्यांना कोविड टेस्ट करूनच सकाळी दहापर्यंत दूध विक्री करावी लागेल.

भाजी विक्रेत्यांना तीन तासांची वेळ दिली आहे. जिल्ह्यातील शासकीय बँका, न्यायालय, केंद्र व राज्य सरकारच्या कार्यालयात केवळ ५० टक्केच उपस्थिती असेल. तर बीड शहरात केवळ दोन पेट्रोल पंप तर प्रत्येक तालुक्यात एक पेट्रोल पंप २४ तास सुरू राहतील. जिल्ह्यात एसटी बसेससह खासगी वाहनांद्वारे हाेणारी प्रवासी वाहतूक बंद राहील. अत्यावश्यक सेवेतील वाहनांच वाहतुकीसाठी मुभा आहे. बीड जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात जाणाऱ्या वाहनांना परवानगी असणार आहे. परंतु, परजिल्ह्यातून बीड जिल्ह्यात येणाऱ्यांना अँटिजन, आरटीपीसीसीआर टेस्ट करावीच लागेल अन्यथा बीड जिल्ह्यात प्रवेश मिळणार नाही.

जिल्ह्यात यायचे असेल तर कोरोना टेस्ट बंधनकारक
लॉकडाऊन आदेशापूर्वी जिल्ह्यातील ज्या नागरिकांनी बाहेरगावी, परराज्य व देशात जाण्यासाठी रेल्वे, विमानाचे तिकिट बुक केले असेल त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी प्रवासासाठी परवानगी दिली असली तरी प्रवाशांकडे त्यांचे ओळखपत्र व तिकिट असणे आवश्यक आहे. इतर जिल्ह्यात जाणाऱ्या वाहनांना प्रवेश असणार आहे. जड वाहतुकीसही परवानगी आहे. पर जिल्ह्यातून बीड जिल्ह्यात येणाऱ्यांनी अँटिजन, आरटीपीसीसीआर तपासणी केली नाही तर त्यांना जिल्ह्यात प्रवेश मिळणार नाही.

अंत्यसंस्कारासाठी केवळ २० व्यक्तींनाच परवानगी
जिल्ह्यात वृद्ध व आजार व्यक्तींसाठी नियुक्त केलेले मदतनीस सेवा देणार आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यात मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी केवळ २० व्यक्तींनाच उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.

ऊसतोड कामगारांचा प्रश्न निर्माण
जिल्ह्यात मार्च, एप्रिल अखेर पश्चिम महाराष्ट्रातून ऊसतोड कामगार कामगार आपल्या गावी परततील तेव्हा सक्षम यंत्रणा प्रशासनाकडे दिसून येत नाही. याबाबत जिल्हाधिकारी ग्रामपंचायतींना व्यवस्थेसाठी आदेश देणार आहेत. जिल्ह्यात अत्यावश्यक सेवेशी निगडीत असणारे कारखाने, उद्योग, कामाच्या ठिकाणी असलेल्या मजुरांना राहणाऱ्यांची व जेवणाची व्यवस्था उद्योजकांना करावी लागेल.

असाही विरोधाभास
जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेला लॉकडाऊनच्या आदेशात एकीकडे ट्रॅक्टर, ट्रॉली वाहतुकीला बंदी घातलेली आहे. दुसरीकडे याच आदेशात शेतीच्या कामांसाठी मुभा दिली आहे. मग शेतकऱ्यांना शेतात नांगरणीसाठी आवश्यक असलेले ट्रॅक्टर कसे वापरणार असा प्रश्न असून एकीकडे ट्रॅक्टर वाहतुकीला बंदी आणि दुसरीकडे शेतीच्या मशागतीसाठी मुभा हा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात विरोधाभास दिसून येत आहे. या बाबत गुरुवारच्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी जिल्हाधिकाऱ्यांना प्रश्न करत मशागतीसाठी शेतात ट्रॅक्टर कसे घेवून जाणार अशी विचारणा केली तेव्हा प्रशासनाकडून शेतातील ट्रॅक्टर रस्त्यावर येऊ देऊ नका असे प्रशासनाने सांगितले आहेे.

जिल्ह्यात लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांचा रोजगार हिरावला जाणार आहे. परंतु, शासनाच्या रोहयोची कामे सुरू राहणार आहेत. अशा ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांना शारीरिक अंतर ठेवण्याचे प्रशासनाने सांगितले आहे. दहा दिवसांच्या लॉकडाऊन काळात सर्वसामान्य मजुरांना काय आधार मिळणार? हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याच दहा दिवसांच्या काळात जिल्ह्यातील सर्व प्रकारची खासगी बांधकामावर जिल्हा प्रशासनाने बंदी आणली, तर दुसरीकडे मात्र शासकीय बांधकामे चालू राहतील असे आदेशात म्हटले आहे. मग खासगी आणी सरकारी असा भेदभाव जिल्हा प्रशासनाने का केला असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. शासकीय बांधकामाच्या ठिकाणी कामगारांना शाखा अभियंता हे तात्पुरते पास देणार आहेत.

दोन पेट्रोल पंप २४ तास सुरू राहणार
बीड शहरात लॉकडाऊनच्या दहा दिवसांच्या काळात पोलिस पेट्रोल पंप नगर रोड बीड व साई पेट्रोल पंप बार्शी रोड बीड हे दोन पेट्रोल पंप २४ तास सुरू राहणार आहेत, तर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक पेट्रोल पंप सुरू राहणार अाहे. याचा निर्णय प्रत्येक ज्या त्या तालुक्याचे तहसीलदार घेणार आहेत. एलपीजी गॅस सेवा घरपोच, गॅस वितरण नियमानुसार सुरू राहील. या कर्मचाऱ्यांना गणवेश, ओळखपत्र बरोबर ठेवावे लागेल.

बंद राहणाऱ्या खासगी रुग्णालयांवर करण्यात येईल कारवाई
जिल्ह्यात लॉकडाऊनच्या काळात खासगी, सार्वजनिक वैद्यकीय सेवा, पशुचिकित्सा सेवा वेळेनुसार नियमीत सुरू राहतील. जिल्ह्यातील सर्व रुग्णालय, रुग्णालयांशी निगडीत सेवा वेळेनुसार सुरू राहील. लॉकडाऊनमध्ये जे रुग्णालय रुग्णांना आवश्यक सेवा देणार नाहीत, त्या रुग्णालयांवर कारवाई केली जाणार आहे. त्याचबरोबर ऑनलाइन औषधी वितरण, रुग्णालयांशी संलग्न असणारी सर्व दुकाने २४ तास सुरू ठेवता येणार आहेत. लॉकडाऊनमध्ये जी व्यक्ती अँटिजन व आरटीपीसीआर तपासणी करणार आहे, अशा व्यक्तिजवळ आरोग्य विभागाचे पत्र, अधिकृत एसएमएस असेल तर त्यास बाहेर पडण्याची परवानगी मिळणार आहे.

बँका, कार्यालयांमध्ये ५० टक्केच उपस्थिती असेल
जिल्ह्यात न्यायालये, केंद्र व राज्य सरकारची कार्यालये, स्थानिक संस्थांची कार्यालये, बँकांत अधिकारी कर्मचाऱ्यांची ५० टक्के उपस्थिती असेल. शक्य असल्यास वर्क फ्रॉम होम करावे. शासकीय कर्मचाऱ्यांसाठी पासची आवश्यकता असणार नाही. परंतु, ओळखपत्र बाळगावेे. सर्व ऑनलाइन सेवा पुरवणारे सीएससी नियमानुसार दिलेल्या वेळेप्रमाणे सुरू राहतील. घरगुती गॅस वितरकांना आर्थिक व्यवहारासाठी बँकेत जाता येईल. खासगी कार्यालये बंद राहतील. ३१ मार्चअखेरीस ताळमेळ, बँकेत चलन भरण्यासाठी परवानगी असली तरी दुकानांचे शटर बंद करून आत क्लोझिंगची कामे करण्यास ३ व्यक्तीस परवानगी असेल.

एसटीला बंदी, अत्यावश्यक सेवेला परवानगी
एसटी बरोबरच सार्वजनिक व खासगी प्रवासी वाहने, दुचाकी तीन चाकी, चार चाकी वाहने, एसटी बरोबरच खासगी बस सेवा, ट्रक, टेम्पो, ट्रेलर या वाहनांना बंदी असणार आहे तर जिल्ह्यातील औषध, अन्न उत्पादन संलग्न प्रक्रिया, निर्यात उद्योग, त्याचे पुरवठा नियमानुसार सुरू राहणार असून माहिती तंत्रज्ञानातून आस्थापनांना वर्क फ्रॉम होम करावे लागणार असुन जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय व्यावसायिक, परिचारिका, पॅरा मेडिकल कर्मचारी, सफाई कर्मचारी, अ‍ॅम्ब्युलन्स यांना जिल्हा वाहतुकीसाठी परवानगी असणार आहे.

लॉकडाऊनच्या काळात हे असेल बंद
जिल्ह्यात सार्वजनिक, खासगी क्रीडांगणे, मोकळ्या जागा, उद्याने बंद राहणार अाहेत. सार्वजनीक ठिकाणी मॉर्निंग व इव्हिनिंग वॉकला बंदी असेल. उपहारगृृहे, रेस्टॉरंट, लॉज, हॉटेल्स, मॉल, बाजार मार्केट, केश कर्तनालय, ब्युटीपार्लर, दुकाने, शाळा महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, क्लासेस, चित्रपटगृहे, व्यायाम शाळा, जलतरण तलाव, करमणूक केंद्रे, उद्योग, नाट्यगृह, प्रेक्षागृह, मंगल कार्यालये, हॉल, लग्न समारंभ, स्वागत समारंभ दहा दिवसांच्या काळात बंद असणार अाहेत. सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोजरंजन, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम, सभा अादी कार्यक्रम घेण्यावर निर्बंध असणार अाहेत. त्यामुळे जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, सार्वजनिक प्रार्थना स्थळेही बंद राहतील.

सकाळी ७ ते ९ या वेळेत किराणा दुकाने सुरू राहतील
जिल्ह्यात किराण्याचे ठोक विक्रेत्यांना सकाळी ७ ते ९ या वेळेत दुकाने सुरू ठेवता येतील. किरकोळ विक्रेत्यांना कोराेना नियम पाळून सकाळी ७ ते ९ वेळेत दुकानांतून नागरिकांना घरपोच किराणा पुरवठा करता येईल. दुधाची विक्री व वाटप सकाळी दहा वाजेपर्यंत घरपोच करता येईल. दूध वितरकांना अ‍ँटिजन व आर्टिपीसीआर टेस्ट आवश्यक. तर पाणी विक्रेत्यांना दुपारी १२ वाजेपर्यंत परवानगी, तर भाजीपाला व फळांची ठोक विक्री करणाऱ्यांना सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत विक्री करता येईल. किरकोळ विक्रेत्यांना सकाळी ७ ते दुपारी १२ या वेळेत गल्लोगल्ली फिरून विक्री करता येईल. कोरोना नियम पाळत जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकाने दुपारी १२ वाजेपर्यंत राहील.

परजिल्ह्यातून येणाऱ्यांनी कोरोना टेस्ट केल्यावरच बीडमध्ये प्रवेश; एसटीसह खासगी प्रवासी वाहतूक असणार बंद
-जिल्ह्यात उद्यापासून ४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन
-स्वस्त धान्य दुकाने दुपारी १२ वाजेपर्यंत काेरोनाचे नियम पाळत सुरू राहणार
-शेती कामाला मुभा, पण ट्रॅक्टर वाहतुकीला बंदी असल्याने शेतकऱ्यांपुढे मशागतीचा प्रश्न
-प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एकच पेट्रोलपंप राहणार सुरू, तहसीलदार घेणार निर्णय

बातम्या आणखी आहेत...