आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्षीरसागर कुटुंबातील भाऊबंदकी विकोपाला:बीड शहरात गोळीबारानंतर दोन्ही गटांच्या तक्रारी; 16 जणांवर गुन्हा

बीड6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • डॉ. सारिका क्षीरसागर यांचे एसपींना निवेदन

बीडमध्ये माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर व त्यांचे पुतणे आ. संदीप क्षीरसागर यांच्या कुटुंबातील भाऊबंदकी विकोपाला गेली. शुक्रवारी रजिस्ट्री कार्यालय परिसरातील गोळीबारप्रकरणी माजी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, त्यांचे पुत्र डॉ. योगेश क्षीरसागर यांच्यासह ८ जणांवर गुन्हा नोंद झाला, तर शनिवारी याच प्रकरणात जमीन खरेदी करणाऱ्या प्रतिभा श्रीराम क्षीरसागर यांच्या तक्रारीवरून आ. संदीप क्षीरसागर यांचे वडील रवींद्र क्षीरसागर, भाऊ तथा माजी उपनगराध्यक्ष हेमंत व अर्जुन क्षीरसागर यांच्यासह ८ जणांवर प्राणघातक हल्ला व दरोडाप्रकरणी गुन्हा नोंदवला गेला.

शुक्रवारी रजिस्ट्री कार्यालयात झालेल्या गोळीबारात सतीश बबन क्षीरसागर व सिद्दीक फारोकी हे दोन जण जखमी झाले होते. या प्रकरणात सतीश क्षीरसागर याच्या जबाबावरून शुक्रवारी रात्री ११ वाजता डॉ. भारतभूषण क्षीरसागर, डॉ. योगेश क्षीरसागर, सतीश पवार, विनोद पवार, प्रमोद पवार, आदित्य पवार, रवी पवार व अन्य एकावर प्राणघातक हल्लाप्रकरणी गुन्हा नोंद केला गेला होता.

दरम्यान, शनिवारी प्रतिभा श्रीराम क्षीरसागर यांनीही शिवाजीनगर पोलिसांत तक्रार दिली. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची जमीन खरेदी करण्यासाठी शुक्रवारी वडील राजेंद्र पवार व भाऊ सतीश, प्रमोद, विनोद पवार यांच्यासह रजिस्ट्री कार्यालयात गेलो असता खरेदीखताची प्रक्रिया सुरू असताना रवींद्र क्षीरसागर हे मुलगा हेमंत व अर्जुन क्षीरसागर व अशोक रोमण, गणेश भरनाळे, आनंद पवार, सतीश क्षीरसागर हे सिद्दीक फारोकी यांच्यासह आले.

त्यांनी राजेंद्र पवार यांना ही जमीन खरेदी करू नका असे सांगितले. या वेळी हेमंत क्षीरसागर याने कुकरीने प्रतिभा यांचे भाऊ प्रमोद पवार यांच्या पोटावर वार केला. मात्र त्यांनी तो चुकवला, तर अर्जुन क्षीरसागर याने आदित्य पवारच्या मानेला चाकू लावून ५ लाख ५२ हजार रुपये असलेली पैशाची बॅग हिसकावून घेतली. यानंतर सर्वजण भाऊ सतीश पवार यांच्या दिशेने हत्यारे घेऊन जात असताना सतीश यांनी परवानाधारक पिस्तुलाने एकदा हवेत, तर दुसऱ्यांदा जमिनीवर फायर केले. या प्रकरणी आठ जणांवर गुन्हा नोंदवला गेला.

जमिनीचा नेमका वाद काय?
माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या नावे खंडेश्वरी मोहल्ला सर्व्हे क्रमांक ८ व ९ मध्ये जमीन आहे. ६ भूखंड असून त्याची विक्री जयदत्त क्षीरसागर यांना करायची आहे. ३३८ चौरस मीटरचा भूखंड प्रतिभा श्रीराम क्षीरसागर या १५ लाख ५२ हजारांना खरेदी करणार होत्या, ४४२ चौरस मीटरचा भूखंड १८ लाख २५ हजारांत राजेंद्र पवार व त्यांची ३ मुले खरेदी करणार होते. इतरही ४ ते ५ जणांना ४ भूखंड विक्री होणार होते. यास आ. संदीप क्षीरसागर यांच्या कुटुंबाचा विरोध आहे.

काकांपासून जिवाला धोका : हेमंत क्षीरसागर यांची तक्रार
शनिवारी हेमंत क्षीरसागर यांनी शिवाजीनगर पोलिसांत काका भारतभूषण क्षीरसागर यांच्याविरोधात तक्रार दिली. भारतभूषण यांनी शुक्रवारच्या गोळीबाराच्या प्रकरणावरून शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता घरी असताना मला शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले असून आम्ही एकाच घरात राहत असल्याने काकांपासून जिवाला धोका असल्याचे म्हटले आहे.

खोटा गुन्हा मागे घ्या; सारिका क्षीरसागरांचे निवेदन
गोळीबार प्रकरणात डॉ. भारतभूषण क्षीरसागर, डॉ. योगेश क्षीरसागर यांचा संबंध नाही. डॉ. योगेश हे घटना घडली तेव्हा शहराबाहेर होते. सत्तेचा गैरवापर करून त्यांच्यावर गुन्हा नोंदवला गेला. हा खोटा गुन्हा मागे घ्यावा, अशी मागणी करत योगेश यांच्या पत्नी डॉ. सारिका क्षीरसागर यांनी पोलिस अधीक्षक व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. डीवायएसपी श्रीकांत परोपकारी यांच्याशी त्यांनी चर्चा केली.

बातम्या आणखी आहेत...