आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संचालकांविरुद्ध गुन्हा:केज येथील परळी अर्बन पतसंस्थेचा 45 लाखांचा गंडा; अधिकारी-कर्मचारी पसार

केजएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मुदत ठेवींवर आकर्षक व जास्तीचे व्याज देण्याचे आमिष दाखवून ठेवी ठेवलेल्या ग्राहकांना ४४ लाख ७० हजार रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी परळी पीपल्स अर्बन मल्टिस्टेट पतसंस्थेच्या व्हाइस चेअरमन, संचालकांसह अधिकाऱ्यांविरुद्ध केज पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. चार वर्षांपूर्वी परळी पीपल्स अर्बन मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीची शाखा केज शहरातील बसस्थानकाच्या बाजूला सज्जन अंधारे यांच्या गाळ्यात सुरू करण्यात आली होती.

या शाखेने मुदत ठेवींवर आकर्षक व्याज देण्याचे आमिष दिले. त्यामुळे फिर्यादी मनीषा अनंतराव देशमुख (रा. समतानगर, केज) यांच्यासह इतर ठेवीदारांनी लाखो रुपयांच्या ठेवी ठेवल्या. मनीषा यांनी २४ सप्टेंबर २०१७ रोजी २ लाख १५ हजार रुपयांची ठेव ठेवली. मात्र ठेवीची मुदत पूर्ण झाल्यानंतर पतसंस्थेने ठेवीदारांना मुद्दल आणि व्याज देण्यास चालढकल सुरू केली. मनीषा यांना ठेवीच्या रकमेबद्दल इतर बँकेचे धनादेश दिले. त्यांनी ते धनादेश खात्यावर जमा केले.

मात्र धनादेश दिलेल्या खात्यावर रक्कम शिल्लक नसल्याने वटले नाहीत. खोटे धनादेश देऊन फसवणूक केली. मनीषा देशमुख यांच्यासह इतर ठेवीदारांना ४४ लाख ७० हजार २५९ रुपयांना गंडा घालून अधिकारी व कर्मचारी अचानक पतसंस्थेच्या शाखेला टाळे ठोकून पसार झाले. फसवणूक झाल्याची खात्री पटल्यानंतर मनीषा देशमुख यांच्यासह इतर ठेवीदारांनी पोलिसांकडे धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला गुन्हा दाखल न करता या प्रकरणाची चौकशी केली.

पोलिसांच्या चौकशीअंती ठेवीदारांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न होताच ८ डिसेंबर २०२१ रोजी मनीषा देशमुख यांच्या फिर्यादीवरून सोसायटीचे योगेश बबन मस्के, व्हाइस चेअरमन नितीन सुभाष घुगे, सीईओ निखिल शिवकुमार मानुरकर, वरिष्ठ शाखा अधिकारी विश्वजित राजाभाऊ ठोंबरे, शाखा अधिकारी दत्ता भुटाजी रंगदळ, संचालक अनिता राजाभाऊ ठोंबरे, संचालक मालन सुभाष घुगे यांच्यासह संचालक मंडळाविरुद्ध केज पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलिस निरीक्षक संतोष मिसळे हे पुढील तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...