आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोना साखळी तोडण्यासाठीच्या नियमांचे जिल्ह्यातील नागरिकांकडून काटेकोरपणे पालन हाेत नसल्याने अखेर जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी बीड जिल्ह्यात पुन्हा शनिवार (दि.८) ते बुधवार (दि. १२) पर्यंत असे पाच दिवसांच्या कडक लाॅकडाऊनमध्ये वाढ करण्याचे अादेश काढले. या पाच दिवसांच्या कालावधीत निर्बंध असलेली दुकाने चालू असल्याचे निदर्शनास आल्यास ती सील करण्यात येणार असून या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलिस प्रशासनावर असणार अाहे. जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या वाढत अाहे. त्यामुळे ५ मेपासून तीन दिवसांचा कडक लाॅकडाऊन केला हाेता. परंतु, जिल्हाभरात दुकाने छुप्या पद्धतीने सुरू असून नागरिक विनाकारण बाहेर फिरत अाहेत.
अावाहन करूनही नियमांचे पालन हाेत नसल्याने गुरुवारी सायंकाळी बीड शहरात जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, पाेलिस अधीक्षक अार. राजा, उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, तहसीलदार शिरीष वमने यांनी पाहणी केली हाेती. दरम्यान, जालना राेडवरील संदेश माेटर्स वाहन बाजारला जिल्हाधिकाऱ्यांच्या अादेशानुसार सील ठाेकले. तसेच या ठिकाणी आढळून अालेल्या चार व्यक्तींची अँटिजन टेस्ट करण्याचे अादेश दिले हाेते. गुरुवार व शुक्रवारी सर्व तालुक्यांतील परिस्थितीचा अाढावा घेत जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी सायंकाळी निर्णय घेऊन पाच दिवस लाॅकडाऊन वाढवण्याचे अादेश काढले.
या आस्थापना सुरू राहतील
पाच दिवसांच्या या लाॅकडाऊन कालावधीत सर्व मेडिकल, दवाखाने, लसीकरण केंद्रे, वैद्यकीय विमा कार्यालये, फार्मास्युटिकल्स, फार्मास्युटिकल कंपन्या, इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा ज्यात सहायक उत्पादन आणि वितरण युनिट, त्यांचे डीलर्स, वाहतूक आणि पुरवठा साखळी, लसींचे उत्पादन व वितरण, सॅनिटायझर, मास्क, वैद्यकीय उपकरणे, कच्चा माल युनिट आणि साहाय्य सेवा, पेट्रोल पंप व पेट्रोलियमशी संबंधित उत्पादने, टपाल सेवा अादी उपरोक्त अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या आस्थापना वगळता इतर कोणत्याही आस्थापना चालू राहणार नाहीत.
या वेळेत करता येईल भाजी आणि फळ विक्री
जिल्हाभरात लाॅकडाऊन कालावधीत पायी किंवा हातगाड्यांवर फिरून दूध, भाजी व फळांची विक्री केवळ सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत करता येईल, तर फक्त फळांची विक्री सायंकाळी पाच ते रात्री सात या वेळेत करता येणार अाहे. तसेच गॅस सिलिंडर वितरण दिवसभर सुरू राहील.
या आस्थापना पूर्णवेळ राहतील बंद
जिल्हाभरात ८ ते १२ मे या कालावधीत सर्व अत्यावश्यक सेवेत न मोडणाऱ्या आस्थापना किराणा दुकाने, मटण विक्रीची दुकाने, बेकरी व कृषीशी संबंधित दुकाने बंद राहतील.
अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींना असेल मुभा
काेराेना काळात कर्तव्य बजावणारे अधिकारी, कर्मचारी (उदा. डाॅक्टर, परिचारिका कर्मचारी, महसूल विभाग, पोलिस, जि.प.चे अधिकारी, कर्मचारी) ज्यांच्याकडे संबंधित कार्यालय प्रमुखाने दिलेले ओळखपत्र असेल त्यांनाच कार्यालयात ये-जा करण्याची मुभा असणार आहे.
बँकांचे कामकाज १० ते १२ वेळेत राहील सुरू
लाॅकडाऊनमध्ये बँकेचे कामकाज सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत अंतर्गत कामकाजासाठी व शासकीय व्यवहारासाठी सुरू राहील. पेट्रोल पंपावर रोख रक्कम मोठ्या प्रमाणात जमा होते. याकरिता पेट्रोल पंप व गॅस एजन्सी यांना या ठराविक वेळेत बँकेत जाऊन व्यवहार करता येईल.
अन्यथा फौजदारी कारवाईचे अादेश
आदेशाचे पालन न करणारी व्यक्ती अथवा संस्थांवर भादंसं १८६० (४५) च्या कलम १८८, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीप्रमाणे फौजदारी कारवाई होईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.