आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजुन्या घाटावरील एका पायरी शिलालेखानुसार देवगिरीच्या यादवांचा मुख्यमंत्री हेेमाद्रीपंतानेे शके ११०८ मध्ये हे मंदिर उभारले असावे. त्याची पारंपरिक शैली हेमाडपंती मंदिराचा पुरावा ठरते. मंदिराचा महामंडप अष्टकोनी असून त्याला दिवाणखाना आहे. मंदिराच्या मूळ बाह्य भिंतीदेखील अष्टकोनाकृती असून मंदिरात दगडावर नक्षीकाम केलेली जाळी किंवा झरोका उल्लेखनीय आहे.
मंदिर तयार करण्यासाठी १८ वर्षांचा कालावधी लागला. बांधकामासाठीचा दगड परळी शहराच्या उत्तरेला डिघोळ (ता.सोनपेठ) येथील त्रिशूला देवीच्या डोंगरातून खोदकाम करून आणला असल्याचा उल्लेख वैद्यनाथावरील पुस्तकात आहे. मंदिर परिसरातील एका अन्य शिलालेखानुसार १७०६ क्रोधनाम संवत्सर चैत्र शु. शके ५ इ.स. १७८४ शुक्रवार रोजी राणी अहिल्यादेवी होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. मंदिराच्या मूळ गाभाऱ्यासह तिन्ही घाट व आजूबाजूच्या तीर्थांचे चिरेबंदी बांधकाम आहे. गाभारा व सभामंडप एकाच पातळीवर असल्यामुळे सभामंडपातून ज्योतिर्लिंगाचे दर्शन होऊ शकते. परळीत वैद्यनाथाच्या पिंडीला स्पर्श करून दर्शन घेता येते.
छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिराला अभयपत्र
परळीतील वैद्यनाथ मंदिराला छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व निजामाच्या सर्व राजवटींनी अभयपत्र दिलेले आहे. वैद्यनाथ मंदिरासाठी १८९० मध्ये इटालियन व्यापारी गुस्टाओ उल्शी यांनी ट्रस्ट स्थापन करत तत्कालीन राज्यकारभाराच्या परिस्थितीत कायदेशीर व्यवस्था केली होती. स्वातंत्र्यानंतर परळीतील राज्यकर्त्यांकडे ट्रस्टचा ताबा आला.
कशी आहे मंदिराची रचना
राष्ट्रकूटकालीन महत्त्व
राष्ट्रकूट राजा तिसरा इंद्र याचा परळीत सापडलेला ताम्रपट राष्ट्रकूटकालीन परळीचे महत्त्व अधोरेखांकित करतो. हा ताम्रपट प्रा.जयश्री देशमुख यांनी विद्यापीठाच्या इतिहास व प्राचीन भारतीय संस्कृती विभागाकडे सुपूर्द केल्याचा उल्लेख इतिहासतज्ज्ञ, अभ्यासक डॉ. सतीश साळुंके यांच्या “बीड जिल्ह्याचा प्राचीन व मध्ययुगीन इतिहास’ या पुस्तकात केला आहे.
चार लाख भाविकांचा अंदाज
कोरोनामुळे इतर सर्व धार्मिक स्थळांप्रमाणे परळी वैजनाथचे मंदिरही दोन वर्षे जवळपास बंद होते. आता महाशिवरात्रीला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून किमान चार लाख भाविक दर्शनासाठी येतील, असा अंदाज आहे. त्यांच्यासाठी मंदिराच्या विश्वस्त मंडळाने आवश्यक त्या सोयी-सुविधा केल्या आहेत. २८ फेब्रुवारी रोजी रात्री बारा वाजता जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते अभिषेक होईल. तेव्हापासून १ मार्च रोजी रात्री उशिरापर्यंत दर्शन घेता येईल. महाशिवरात्रीनिमित्त यात्रा आयोजनाचा निर्णय मात्र झालेला नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.