आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मावेजा मिळेना:सामाजिक कार्यकर्त्यांनी काढली बीडच्या जिल्हा प्रशासनाची प्रतीकात्मक अंत्ययात्रा

बीड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जमिनीच्या मावेजासाठी शेतकऱ्याचे एक वर्षापूर्वी आत्मदहन, पत्नीचे स्मशानभूमीतच उपोषण

संपादित जमिनीच्या मावेजासाठी जिल्हा प्रशासनाकडे चकरा मारूनही कार्यवाही होत नसल्याने दप्तर दिरंगाईला कंटाळून बीड तालुक्यातील पाली येथील शेतकऱ्याने एक वर्षापूर्वी बीडच्या पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन केले. यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तीन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होऊनही पोलिस त्यांना अटक करत नसल्याने शेतकऱ्याच्या विधवा पत्नीने बुधवार २६ जानेवारी २०२२ प्रजासत्ताक दिनापासून गावाजवळील बिंदुसरा धरण सांडव्याच्या स्मशानभूमीत उपोषण सुरू केले होते.

सदरील महिलेच्या उपोषणाकडे जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने सामाजिक कार्यकर्त्यांनी शनिवारी सकाळी जिल्हा प्रशासनाची प्रतीकात्मक अत्यंयात्रा काढून निषेध नोंदवला. दरम्यान, राज्यमंत्री बच्चू कडू यांनी येत्या चार दिवसांत बीड जिल्हा प्रशासनाबरोबर बैठक घेऊन प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले तर पोलिस ठाण्यातील दाखल गुन्ह्यात तत्काळ चौकशी करून अहवाल फेब्रुवारी अखेर सादर करण्यात येईल, असे लेखी पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर शेतकऱ्याच्या पत्नीने अकरा दिवसांनंतर उपोषण मागे घेतले आहे.

बीड तालुक्यातील पाली येथील शेतकरी अर्जुन कुंडलिक साळुंके यांनी २४ नोव्हेंबर २०२० मध्ये बीडच्या पाटबंधारे कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेऊन आत्मदहन केले होते. यात अर्जुन सोळंके यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात मृत अर्जुन सोळंके यांच्या पत्नी तारामती सोळंके यांनी तक्रार दिली होती. या तक्रारीवरून बीडच्या पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, बीडचे भूमी अभिलेखचे उपअधीक्षक व तत्कालीन भूसंपादन उपजिल्हाधिकारी अशा तीन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल दाखल झाला होता.

दोषी अधिकाऱ्यांच्या विरोधात पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही उलट हे तीनही अधिकारी तारामती सोळंके यांच्यावर दबाव टाकत असल्याचा आरोप शेतकऱ्याच्या पत्नीने केला आहे. दरम्यान, न्याय मिळावा म्हणून पती अर्जुन सोळंके यांच्यावर बिंदुसरा प्रकल्पाच्या परिसरातील ज्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले होते त्याच ठिकाणी पत्नी तारामती सोळंके यांनी २६ जानेवारी २०२२ पासून उपोषण सुरू केले होते.

मागील अकरा दिवसांच्या काळात जिल्हा प्रशासनाने महिलेच्या उपोषणाची कोणतीच दखल घेतली नसल्याने सामाजिक कार्यकर्त्यांनी शनिवारी सकाळी जिल्हा प्रशासनाची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून निषेध नोंदवला आहे. दरम्यान, महिला आयोगाच्या राज्य सदस्या अॅड.संगीता चव्हाण यांनीही आंदोलनकर्त्या तारामती सोळंके यांना लेखी पत्र देत २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत हे प्रकरण निकाली काढण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर तब्बल अकरा दिवसांनंतर तारामती सोळंके यांनी आपले उपोषण सोडले.

यांनी काढली प्रतीकात्मक अंत्यायात्रा

सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे, आम आदमी पार्टीचे अशोक येडे, काँग्रेसचे युवक नेते गणेश बजगुडे या सामाजिक कार्यकर्त्यांनी बीड तालुक्यातील पाली येथे उपोषस्थळी येऊन उपोषणकर्त्या तारामती सोळंके यांना धीर देत बीड जिल्हा प्रशासनाची अंत्ययात्रा काढली.

चार दिवसांत जिल्हा प्रशासनाबरोबर बैठक
बीड तालुक्यातील पाली येथे शनिवारी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांचे स्वीय सहायक ओमप्रकाश शेटे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन या आंदोलनाची माहिती राज्यमंत्री बच्चू कडू यांना दिली. याप्रकरणी चार दिवसांत जिल्हा प्रशासनासोबत बैठक आयोजित करून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्‍वासन बच्चू कडू यांनी दिले आहे.

काय झाली होती एकत्रीकरणात गुंतागुंत ?

बीडच्या भूमी अभिलेख कार्यालयाकडून जमीन एकत्रीकरणात झालेल्या अनियमिततेमुळे बीड तालुक्यातील पाली येथील शेतकरी अर्जुन कुंडलिक साळुंके यांचे संपादित क्षेत्र व उर्वरित क्षेत्र यांच्यात गुंतागुंत होऊन क्षेत्र कमी झाल्याने ते जिल्हा प्रशासनाकडे अनेक वर्षांपासून पाठपुरावा करत होते. क्षेत्राचा मावेजाही मिळत नव्हता.

कशामुळे केली शेतकऱ्याने आत्महत्या ?
शासकीय अधिकारी कोणतीच कारवाई करत नसल्याने दप्तर दिरंगाईला कंटाळून शेतकरी अर्जुन कुंडलिक साळुंके यांनी २४ नोव्हेंबर २०२० रोजी बीड येथील पाटबंधारे कार्यालयाच्या आवारात अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेत आत्मदहन केले होते.

बातम्या आणखी आहेत...