आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धक्कादायक:वडिलांच्या पीएफच्या पैशांसाठी आईला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, दोन मुले अटकेत; सरपंचामुळे वाचला महिलेचा जीव

केज4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सरपंच धावले महिलेच्या मदतीला, मुलाच्या हातातील काडी विझविल्याने पुढील अनर्थ टळला

पतीचे पीएफचे मिळालेल्या 13 लाख रुपयांच्या रकमेतून दोन्ही मुलांना 9 लाख 84 हजार रुपये देऊनही उर्वरित पैशासाठी मुलांनी आईच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना केज तालुक्यातील कानडीमाळी येथे शनिवारी ( ता. 3 ) रात्री घडली. गावच्या सरपंचांनी मदतीसाठी धाव घेऊन मुलाच्या हातातील पेटती काडी विझविली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या प्रकरणी दोन्ही मुलांविरुद्ध केज पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्यांना अटक केले आहे.

इंदूबाई लालासाहेब कुचेकर (वय 50 रा. कानडीमाळी ता केज) असे या दुर्देवी आईचे नाव आहे. त्यांना संतोष, नितीन आणि धीरज ही तीन मुले आहेत. संतोष व नितीन हे दोघे बीडला तर त्या धीरजसोबत गावी राहतात. त्यांचे पती लालासाहेब हरिभाऊ कुचेकर बीड पोलीस दलात होते. सन 200५ मध्ये परळी शहर ठाण्यात कार्यरत असताना अचानक बेपत्ता झाले. मात्र त्यांचा शोध न लागल्याने 2013 मध्ये त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांच्या नोकरीच्या कालावधीतील पीएफचे 13 लाख 84 हजार रुपये हे इंदूबाई यांना 2018 मध्ये मिळाले होते. या मिळालेल्या रक्कमेतून त्यांनी नऊ लाख 84 हजार रुपये संतोष आणि नितीन या दोघांना दिले होते. परंतु इतकी रक्कम देऊनही त्या दोघांचे समाधान झाले नव्हते. उर्वरित रक्कमेची मागणी करून ते दोघे नेहमी आईला शिवीगाळ आणि मारहाण करीत होते. स्वतःची मुले असल्याने त्यांनी हे सहन ही केले.

शनिवारी ( ता. 3 ) दुपारी एक वाजेच्या सुमारास संतोष आणि नितीन हे दोघे कानडीमाळी येथे आले. नितीन याने आम्हाला पैसे देण्याचा बंदोबस्त कर नसता तुझा खून करीन अशी धमकी दिली. यापूर्वी त्यांनी केलेल्या मारहाणीमुळे इंदूबाई यांनी घाबरून गावातील माणसे गोळा करून तुम्हाला पैसे देऊन टाकते. असे सांगितल्यावर ते दोघे निघून गेले. त्यानंतर रात्री 7 वाजेच्या सुमारास पुन्हा ते दोघे घरी आले आणि पैशाची मागणी करू लागले. इंदूबाई यांनी आता माझ्याकडे पैसे नाहीत असे उत्तर दिले.

धर आज हिला संपवतोच..

पैशांना नकार देताच नितीन याने संतोषला त्याच्या हातातील बाटलीतील पेट्रोल इंदुबाई यांच्या अंगावर टाक, आजच हिला जीवे मारु असे म्हटले. हे ऐकताच इंदुबाई यांनी तेथून भावजईच्या घराकडे पळ काढला. मात्र त्या दोघांनी पाठलाग करीत गावातील एका दुकानासमोर इंदूबाई यांना गाठले. संतोष याने त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकले, तर दुसरा मुलगा नितीन याने जीवे मारण्याच्या उद्देशाने काडीपेटीतील काडी पेटवून त्यांच्या अंगावर फेकणार तोच गावातील सरपंच अमर राऊत यांनी त्याच्या हातावर मारून काडी विझविली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

मुले अटकेत, दोन दिवसांची कोठडी

इंदूबाई कुचेकर यांच्या तक्रारीवरून संतोष कुचेकर, नितीन कुचेकर या दोन्ही मुलांच्या विरोधात केज पोलिसांत खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दोघांना अटक करून रविवारी न्यायालयासमोर हजर केले. 6 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार दादासाहेब सिद्धे हे पुढील तपास करत आहेत.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser