आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सतर्कतेची गरज:अप्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या हाती रुग्णांचे ‘प्राण’;ऑक्सिजन प्लँट नियंत्रणासाठी कंत्राटी कर्मचारी

बीड15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जिल्हा रुग्णालयात तंत्रज्ञ नसल्याने नवखे कंत्राटी कर्मचारी बदलतात सिलिंडर

नाशिक येथील महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात बुधवारी दुपारी ऑक्सिजन गळती झाल्याने उपचार घेणाऱ्या २२ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क असायला हवी. मात्र, बीड जिल्ह्यात ऑक्सिजन प्रकल्पाची जबाबदारी अप्रशिक्षित कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हाती आहे तर, कोविड काळात सेवेत घेतलेले नवखे कंत्राटी कर्मचारी थेट ऑक्सिजन सिलिंडर बदलण्याचे काम करत असल्याने रुग्णांचा प्राण अप्रशिक्षित व नवख्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हाती असल्याचे ‘दिव्य मराठी’च्या पाहणीत समोर आले. जिल्ह्यात रोज हजारोंच्या संख्येने काेराेनाबाधित आढळून येत असून मृतांचा आकडाही वाढतोय.

जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या पाच हजारांवर गेली. एप्रिलच्या २० दिवसांत १५ हजारांहून अधिक रुग्ण जिल्ह्यात आढळलेत. दुसऱ्या लाटेत रुग्णांच्या शरीरातील ऑक्सिजन पातळी कमी होण्याचे, रुग्ण गंभीर होऊन निमोनियाॅ हाेण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. ऑक्सिजन पातळी कमी झालेल्या रुग्णांना ऑक्सिजन देण्याची आवश्यकता असते. राज्याला सध्या ऑक्सिजन तुटवड्याचा सामना करावा लागतोय. अशातच नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीमुळे अपघात हाेऊन २२ जणांचा बळी गेला तर, अंबाजोगाईतही ऑक्सिजन पुरवठा बंद पडल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाइकांनी केला.

जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजनच्या सुरक्षिततेबाबत व जबाबदाऱ्यांबाबत माहिती घेतली असता धक्कादायक बाबी समोर आल्या. जिल्हा रुग्णालयात १० केएल क्षमतेचा एक लिक्विड ऑक्सिजन टँक आहे तर हवेतून ऑक्सिजन निर्मितीचा एक प्रकल्पही आहे. ऑक्सिजन प्रकल्प हाताळणीसाठी याचे प्रशिक्षण घेतलेला तंत्रज्ञ नियुक्त करणे अवश्यक असते. मात्र, कंत्राटी कर्मचाऱ्यांवर ही जबाबदारी आहे. त्यामुळे धोका निर्माण झाल्यास त्याला जबाबदार कोण हा प्रश्न आहे.

ऑक्सिजन प्रकल्प असे

  • ०४ लिक्विड ऑक्सिजन प्रकल्प जिल्ह्यात
  • १० केेएल प्रत्येक प्रकल्पाची क्षमता
  • ०४ ठिकाणी हवेतून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प
  • ३५०० जम्बो सिलिंडर रोज आवश्यक
  • २ कोटी २५ लाख लिटर रोज ऑक्सिजन मागणी

कुणीही या काॅक बंद करून जा!
‘दिव्य मराठी’च्या पाहणीत ऑक्सिजन प्रकल्पाला जाळी लावून कुलूप लावलेले असल्याचे दिसून आले. प्रकल्प या दृष्टीने सुरक्षित असला तरी जवळच ऑक्सिजन जोडणी केलेल्या टाक्यांच्या तिथे नियंत्रणासाठी कुणी नव्हते. एखाद्या माथेफिरूने इथून पुरवठा होणारा कॉक बंद केला तर अनर्थ होऊ शकतो.

चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनाही हवे प्रशिक्षण
जिल्हा रुग्णालयाने सेवेतील नियमित असलेले काही चतुर्थ श्रेणी कर्मचारी सिलिंडर बदलण्यासाठी ड्युटीला लावल्याचे सांगितले, असे असले तरी या कर्मचाऱ्यांनाही सिलिंडर बदलण्याचे कोणतेही शास्त्रीय प्रशिक्षण दिलेले नसल्याचे सांगण्यात आले.

थेट सवाल
दिव्य मराठीने याबाबत अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुखदेव राठोड यांना काही प्रश्न केले त्यांनी यावर दिलेली उत्तरे

जिल्हा रुग्णालयाकडे प्रशिक्षित ऑक्सिजन तंत्रज्ञ आहे का?
राठोड : रुग्णालयाकडे प्रशिक्षित तंत्रज्ञ नाही, आम्ही अर्ज मागवले होते अर्जही आले नाही.

अप्रशिक्षित कर्मचाऱ्यांना ऑक्सिजनसारखी महत्त्वाची जबाबदारी का?
राठोड : प्रशिक्षित कर्मचारी उपलब्ध नसल्यानेे जबाबदारी दिली.

रुग्णालयाकडून या कर्मचाऱ्यांना काही प्रशिक्षण दिले जाते का ?
राठोड : रुग्णालयाकडून कोणतेही प्रशिक्षण दिले जात नाही, अनुभवातून ही मुले शिकतात

मुख्य जबाबदारी असलेला कर्मचारी कंत्राटी आहे?
राठोड : होय, तो मागील वर्षापासून काम करतो, त्यातून त्याला अनुभव आला.

आणखी किती कंत्राटी कर्मचारी ऑक्सिजन प्रकल्पात आहेत?
राठोड : ८ कंत्राटी कर्मचारी मदतीसाठी आहेत. इतर चतुर्थ श्रेणी कामगार आहेत.

नाशिक घटनेनंतर काही काळजी घेतली जातेय का?
राठोड : हाेय, नाशिकसारखा अपघात होऊ नये यासाठी रुग्णालय स्तरावर यासाठी एक समितीही तयार केली.

ऑक्सिजन टँकचे दीड वर्षापासून कंत्राटी कर्मचारीच पाहतो काम
लिक्विड ऑक्सिजन टँकची जबाबदारी मागील दीड वर्षांपासून नाविद शेख या कंत्राटी कर्मचाऱ्यावर आहे. या कर्मचाऱ्याला कोणतेही प्रशिक्षण रुग्णालयाने दिलेले नाही. मात्र, आपण काही दिवस एका खासगी ऑक्सिजन प्लँटमध्ये काम केले होते त्या अनुभवाच्या आधारावर येथे काम करत असल्याचे या कर्मचाऱ्याने ‘दिव्य मराठी’ ला सांगितले.

नवखे कर्मचारी बदलतात सिलिंडर
रुग्णालयातील ड्युरो सिलिंडर हे प्रशिक्षित कर्मचाऱ्यांनी बदलणे गरजेचे आहे. मात्र, कोविड काळात कंत्राटी म्हणून सेवेत घेतलेल्या नवख्या आणि अप्रशिक्षित कर्मचाऱ्यांनाच हे सिलिंडर बदलावे लागताहेत. ८ कंत्राटी कर्मचाऱ्यांवर ही जबाबदारी आहे.

बातम्या आणखी आहेत...