आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:‘त्या’ पीडितेला चटके देत मारहाण, दारू पाजून अत्याचार; पोलिसानेच सोडले कला केंद्रावर

अमोल मुळे | बीड11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अंबाजोगाईतील अत्याचार प्रकरण जिवे मारण्याच्या धमकीने तिने अनेक रात्री प्रवास करून काढल्या

बालविवाहानंतर पतीकडून छळामुळे ती वडिलांकडे आली, पण वडीलच लगट करू लागले. तिने पोलिस ठाणे गाठले, पण पोलिसांनी तक्रार न घेता कुटुंबाला तोंडी समज दिली. परत आल्यावर पोलिसांत का गेली म्हणून घरच्यांनी चटके दिले. म्हणून घरून पळ काढत अंबाजोगाईत आल्यावर तिच्या असहायतेचा फायदा घेत मिळेल त्याने अत्याचार केला.

विरोध केल्यावर मारहाण केली, दारू पाजली, सिगारेट ओढायला लावली. धक्कादायक म्हणजे अत्याचार केलेल्या दोनपैकी एका पोलिसानेच तिला कला केंद्रावर सोडले. नंतर तिच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जाऊ लागला. अवघ्या १६ व्या वर्षी तिच्या वाट्याला आलेले हाल ऐकून सामाजिक कार्यकर्ते अन् अधिकारीही सुन्न झाले...

अंबाजोगाईतील अल्पवयीन मुलीवर शेकडो जणांनी अत्याचार केल्याच्या प्रकरणात सुमारे १० जणांना अटक केली आहे. अवघी १६ वर्षांची असलेली पीडिता २० आठवड्यांची गर्भवती असून सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे. बालकल्याण समितीचे सदस्य तत्त्वशील कांबळेंना सांगितलेल्या आपबितीमध्ये पीडिता म्हणते, आठ वर्षांची होते तेव्हा आई वारली.

१३ व्या वर्षी माझं लग्न धारूर तालुक्यातील एका गावात करून दिलं गेलं. पती धारूरला एका ढाब्यावर कामाला होते आणि आठवड्यातून दोन, तीन वेळेला घरी येत. दरम्यान, मी काम करत नाही म्हणून त्यांनी मला मारहाण केली म्हणून जूनमध्ये मी वडिलांकडे आले. काही दिवसांनी वडिलांनी लगट करायला सुरुवात केली. मी घाबरले. सांगायचं कुणाला हा प्रश्न होता.

असुरक्षित वाटत होतं. मग एक दिवस धीर करून पोलिस ठाण्यात गेले, तर पोलिसांनी तक्रार घेण्याऐवजी वडील, चुलते यांना बोलावून घेतले अन् प्रकरण आपसात मिटवा असे सांगून पाठवून दिले. पण घरी आल्यावर पोलिसांत का गेली म्हणून घरच्यांनी हाताला चटके दिले. सगळं असह्य होऊन एके दिवशी घरातून पळ काढला. मला फक्त अंबाजोगाई हे मोठं गाव माहिती होतं. तिथेच बसस्थानकावर राहू लागले. येथे दोन मुलांनी जेवण देतो म्हणून सांगितले अन् अत्याचार केला.

नंतर त्यांनीच अनेकांना माझ्याबाबत सांगितलं. लोकांकडून पैसे घेऊन मला त्यांच्यासोबत पाठवले जाऊ लागले. विरोध केला तर जिवे मारण्याची धमकी दिली जाऊ लागली. म्हणून मी घाबरून अनेक रात्री अंबाजोगाईहून मिळेल त्या बसमध्ये बसून रात्रभर प्रवास करायचे अन् सकाळी पुन्हा अंबाजोगाईत यायचे. शेकडो जणांनी माझ्यावर अत्याचार केला.

बालकल्याण समितीच्या सदस्यासमोर सांगितली धक्कादायक आपबिती

आरोपींची नावे नाही माहीत
तत्त्वशील कांबळे म्हणाले, पीडितेच्या सांगण्यानुसार तिच्यावर दोन पोलिसांनी अत्याचार केला. एकाने लॉजवर, तर दुसऱ्याने घरी नेऊन. तिला त्यांची नावे माहिती नाहीत, पण त्यापैकीच एकाने तिला अंबाजोगाईजवळच्या एका कला केंद्रावर सोडले. तिथे तिला नाचकाम करायला लावले.

वेश्याव्यवसायात ढकलले
अंबाजोगाईतील एका आंटीने व इतर काहींनी मुलीकडून बळजबरीने वेश्याव्यवसाय करून घेतला. ग्राहकांकडून पाच ते सात हजार रुपये घेऊन पीडितेला त्यांच्यासोबत जाण्यास भाग पाडले जायचे. विरोध केल्यास मारहाण केली जात होती. तिला विकण्यात आले होते का याबाबतही चौकशी होणे आवश्यक असल्याचे तत्त्वशील कांबळे म्हणाले.

न्यायालयाचे ताशेरे, पोलिस अद्याप का सापडत नाहीत?
दरम्यान, मंगळवारी या प्रकरणात अंबाजोगाई न्यायालयाने पोलिसांच्या तपासावर ताशेरे ओढले. या प्रकरणात आरोप झालेले पोलिस कर्मचारी अद्यापही तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना का सापडत नाहीत अशी विचारणा न्यायालयाने केली आहे.

बातम्या आणखी आहेत...