आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काळाबाजार:कम्पाउंडर मित्रामार्फत करायचा रेमडेसिविरचा सौदा; तीन हजार रुपयांचे इंजेक्शन 22 हजारांना, तीन जण अटकेत

बीड22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • न्यायालयाने २७ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली

जिल्ह्यात एकीकडे रेमडेसिविरचा तुटवडा असताना आणि एका इंजेक्शनसाठी रुग्णांचे नातेवाइक भटकत असताना दुसरीकडे काळाबाजार जोरात सुरू आहे. २२ हजार रुपयांना एक इंजेक्शन विकण्याचा प्रकार शुक्रवारी रात्री बीडमध्ये समोर आला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले. या तिघांना न्यायालयाने २७ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या काळ्याबाजाराचा मास्टरमाइंड हा एका खासगी काेविड रुग्णालयाचा कंपाउंडर आहे. मित्राच्या मदतीने तो गरजू ग्राहक हेरून सौदा करायचा. सखोल चौकशीतून साखळी समोर येण्याची शक्यता आहे.

काेविड रुग्णांसाठी आवश्यक रेमडेसिविर इंजेक्शन मिळवण्यासाठी सध्या रुग्णांच्या नातेवाइकांची मोठी धडपड सुरू आहे. रांगा लावून लोक रेमडेसिविरसाठी वाट पाहत आहेत. हीच संधी साधून काही लोक काळाबाजार करताहेत. मूळ किमतीपेक्षा अधिक दराने विक्री होत आहे. शुक्रवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास शिवाजीनगर पोलिसांना एका व्यक्तीने असा काळाबाजार होत असल्याची माहिती दिली. पोलिसांनी माने कॉम्प्लेक्स परिसरात सापळा लावून इंजेक्शन विक्री करताना संतोष प्रभाकर नाईकवाडे (रा. चाणक्यपुरी) याला ताब्यात घेतले होते. त्यानंतर चौकशीतून दत्ता महादेव निर्मळ (रा. पिंपळगाव, ता. गेवराई) आणि प्रकाश परमेश्वर नागरगोजे (रा. क्रांतीनगर) यांनाही अटक केली गेली. शनिवारी त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

रुग्णालयात झाली ओळख
दत्ता निर्मळ हा एका खासगी काेविड रुग्णालयात कंपाउंडर आहे. प्रकाश नागरगोजेचे नातेवाईक त्या रुग्णालयात काही महिन्यांपूर्वी भरती होते. तेव्हा दोघांची ओळख झाली. यातून निर्मळने नागरगोजेच्या मदतीने ग्राहक सापडून रेमडेसिविर विक्री सुरू केली. तर, तिसरा आरोपी संतोष नाईकवाडे हा औषधनिर्माणशास्त्राचा विद्यार्थी असून तोही या दोघांचा मित्र आहे.

मूळ किंमत ३ हजार ४०० रुपये, विक्री २२ हजारांना
या आरोपींकडून दोन इंजेक्शन जप्त केले गेले. ते हिटेरो कंपनीचे आहेत. त्यांची मूळ किंमत ३ हजार ४०० रुपये आहे. हे त्रिकूट एक इंजेक्शन २२ हजारांना विक्री करायचे. दरम्यान, पकडताना झालेल्या झटापटीत एक इंजेक्शन फुटले असून दुसरे पोलिसांच्या ताब्यात आहे.

औषधी विभागाला पत्र दिले जाणार
जप्त इंजेक्शनची बॅच कोणती, ते कुणाच्या नावे विक्री झाले होते, कोणत्या मेडिकलसाठी दिले गेले होते, याबाबतची माहिती मिळवण्यासाठी औषधी विभागाला पत्र दिले जाईल. शिवाय, विक्री केलेले इंजेक्शन बनावट तर नाही ना, याची खात्री करण्यासाठी त्याची रासायनिक तपासणीही होणार आहे. अमोल गुरले, सहायक पोलिस निरीक्षक, शिवाजीनगर ठाणे.

बातम्या आणखी आहेत...