आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअवघ्या २ टक्क्यांच्या आत वनक्षेत्र, जिल्ह्यातून जाणाऱ्या ११ महामार्गांसाठी झालेली झाडांची बेसुमार कत्तल, सातत्याने दुष्काळाचा करावा लागणारा सामना यावर मात करण्यासाठी अभिनेते सयाजी शिंदे व लेखक अरविंद जगताप यांच्या संकल्पनेतून बीड तालुक्यातील पालवणच्या डोंगरात सह्याद्री देवराई बहरली. वृक्ष चळवळ उभारून एक-एक करून ६४ हजार विविध प्रजातींची वृक्षांची लागवड करण्यात आली. दुर्दैवाने १३ फेब्रुवारीला आग लागल्याने मोठे नुकसान झाले. यात १८ प्रजातींच्या ३२३ झाडांना आगीची झळ बसली. तर १३ मोठ्या वृक्षांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परंतु झळ पोहोचवलेल्या झाडांना जगवण्यासाठी वन विभागाकडून दररोज तीन टँकरने पाणी दिले जात आहे.
१५ दिवसांत ही झाडे पूर्वपदावर येतील, असा दावा वन विभागाने केला. सुदैवाने वनराईतील विविध प्रजातींच्या १२ हजार झाडांचे घनवृक्ष सुरक्षित असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. देवराईत वन विभागाने डिसेंबर व जानेवारीत आगीपासून झाडांची सुरक्षा व्हावी यासाठी पाच मीटर रुंदीचे गवत कापून जाळपट्टी तयार केली. परंतु तरीही आग लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, देवराईत १६ एकरमध्ये २०१७ मध्ये करवंद, वड, पिंपळ, लिंब, महारूक, कांचन यासह स्थानिक प्रजातीच्या झाडांची लागवड केली होती.
आग लागून गेल्यावर वॉचमन नियुक्त
सह्याद्री देवराईच्या परिसरात पालवण, गवळवाडी येथे बीड वन विभागाकडून एक वनमजूर व तीन वॉचमन नियुक्त केलेले आहेत. परंतु, सह्याद्री देवराई येथे मागील सहा वर्षांपासून कायमस्वरूपी वॉचमन नव्हता. आता आगीच्या घटनेनंतर वन विभागाने कायमस्वरूपी वॉचमन नियुक्तीचा निर्णय घेतला. सकाळी नऊ ते सायंकाळी ६ वाजेपर्यत त्यांची ड्यूटी असेल. शनिवार, रविवारी सुटीच्या दिवशी आता चार वन कर्मचारी येथे असतील.
वनमजूर-वन कर्मचाऱ्यांचे प्रसंगावधान
१३ फेब्रुवारीला दुपारी चार वाजेच्या सुमारास सुरुवातीला गवत पेटले त्यानंतर आग पसरली. वाऱ्यामुळे आग पसरत असल्याचे लक्षात येताच झाडांना पाणी देणाऱ्या देवराईत वनमजूर जयराम काळे यांनी परिसरातील शिंदळीच्या झाडांच्या फांद्या तोडून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. शेवटी सह्याद्री देवराईच्या परिसरात असलेली एअर ब्लोअर मशीन तातडीने आणून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. वनमजूर लक्ष्मण जाधव, राजेंद्र गाढे, पद्माकर मस्के या चार वन कर्मचाऱ्यांसह अन्य परिसरातील सहा तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली. तब्बल दोन तासांनंतर ही आग आटोक्यात आली.
सह्याद्री देवराईची सुरक्षा धोक्यात
सह्याद्री देवराईच्या प्रवेशद्वाराच्या भोवतीच तारेचे कुंपण आहे. कुंपणावरून उड्या मारत लोक आत जातात. वन विभागाने लावलेले कुलूपही अज्ञातांनी अनेकवेळा तोडले. डबा पार्टी, वाढदिवस येथे साजरा केले जातो. त्यामुळे देवराईचे विद्रूपीकरण सुरू आहे. या ठिकाणी सिगारेट, गुटख्याच्या पुड्या, वाढदिवस सेलिब्रेशन, हौशी मित्र परिवार यांनी या परिसराचा उकंडा केला आहे. रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्या, वेफर्स पाकिटे, ऊस, डहाळा आदी कचराही दिसून येतो. सिगारेट ओढणारी मंडळी किंवा वाढदिवस साजरा करताना आगीची ठिणगी येथे पडून आग लागल्याची शक्यता पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली.
सह्याद्री देवराईचे वैशिष्ट्य
निसर्गप्रेमींनाच असावा प्रवेश
आता बीडच्या नागरिकांनीच देवराईची सुरक्षा राखली पाहिजे. विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन ही देवराई सांभाळली पाहिजे. यापुढे या देवराईत ज्यांना प्रवेश द्यायचा आहे ते केवळ निसर्गप्रेमी किंवा पर्यटनप्रेमीच असावेत. या ठिकाणी डबा पार्टी किंवा वाढदिवसाच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याची गरज आहे. - सयाजी शिंदे, मराठी अभिनेता.
उपद्रवी लोकांवर आता थेट कारवाई
सह्याद्री देवराईत पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांनी पर्यावरणाचे हित लक्षात घेऊन स्वनियंत्रण करण्याची गरज आहे. वन विहाराचा प्रत्येकाने आनंद घ्यावा. परंतु या ठिकाणी वाढदिवस किंवा डबा पार्ट्या करू नयेत. परिसराची स्वच्छता राखावी. उपद्रवी लोकांवर आता थेट कारवाई केली जाणार आहे. अमोल मुंडे, वन अधिकारी, बीड.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.