आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजमीन खरेदी-विक्रीच्या वादातून शुक्रवारी सकाळी ११ वाजता बीडमध्ये रजिस्ट्री कार्यालय परिसरात दोन गटांत वाद झाला. यात एका गटाकडून गोळीबार केला गेला. यामध्ये दोन तरुण जखमी झाले. त्यांच्यावर औरंगाबादेत उपचार सुरू आहेत. दरम्यान, याप्रकरणी शुक्रवारी रात्री साडेसात वाजेपर्यंत गुन्हा नोंद नव्हता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश बबन क्षीरसागर (३०, रा. लक्ष्मणनगर, बीड) आणि सिद्दीक फारोकी (३०, रा. जालना रोड, बीड) अशी जखमींची नावे आहेत. ते राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे समर्थक आहेत. दरम्यान, शहराजवळ असलेल्या एका जमिनीच्या खरेदी- विक्रीची प्रक्रिया रजिस्ट्री कार्यालयात सुरू होती. या वेळी दोन गट समोरासमोर आले. यात लाकडी दांड्याचा वापर केला गेला. हे दांडे पोलिसांनी जप्त केले आहेत.
दरम्यान, या वेळी एका गटाकडून गोळीबार केला गेला. चार राउंड फायर केल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांना एक कॅप आढळून आली आहे. सतीश क्षीरसागर आणि सिद्दीक फारुकी यांच्या पायाला गोळी चाटून गेली. मारहाणीत फारुकी यांच्या चेहऱ्यावरही जखमा झाल्या. गोळीबारानंतर आरोपी पसार झाले. जखमींना रुग्णालयात आणल्यानंतर उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर, राष्ट्रवादीचे फारुक पटेल, एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शफिक शेख यांनी रुग्णालयात धाव घेतली.
जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील रुग्णालयात पाठवले गेले आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर रजिस्ट्री कार्यालय परिसरात तणाव होता. पोलिस बंदोबस्तही वाढवण्यात आला होता. मोबाइल फॉरेन्सिक लॅबलाही पाचारण केले गेले होते.
वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी : दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक आर. राजा, अपर पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार, पोलिस उपअधीक्षक संतोष वाळके, शिवाजीनगर ठाण्याचे पोलिस निरीक्षक केतन राठोड यांनी घटनास्थळी धाव घेतली.
डॉ. भारतभूषण, डॉ. योगेश क्षीरसागरसह ८ जणांवर गुन्हा!
गोळीबार प्रकरणात रात्री उशिरा जखमी सतीश क्षीरसागर यांच्या जबाबावरून ८ जणांवर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. माजी नगराध्यक्ष डाॅ. भारतभूषण क्षीरसागर, त्यांचे पुत्र डाॅ. योगेश क्षीरसागर यांच्या सांगण्यावरून सतीश पवार, विनोद पवार, प्रमोद पवार, रवि पवार, आदित्य पवार व अन्य एकाने रजिस्ट्री कार्यालयात आपल्यावर गोळी झाडली, असे जबाबात म्हटले असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.