आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
तालुक्यातील रत्नागिरी येथील सहा वर्षीय चिमुरडा शुभम सपकाळ याच्या खुनाचे गूढ २४ तासांत नेकनूर पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपासाने उलगडले. शुभमच्या कुटुंबीयांनी आपल्या म्हशीला करणी करून मारल्याच्या संशयातून व त्यानंतर झालेल्या वादातून भावकीतीलच एका दांपत्याने शुभमचा गळा आवळून खून केला. या दांपत्याला गजाआड करण्यात आले असल्याची माहिती नेकनूरचे सहायक पोलिस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी दिली.
शुभम सकाळी घराजवळ असलेल्या शाळेच्या प्रांगणात इतर मित्रांसोबत लपंडाव खेळण्यासाठी बहीण धनश्रीसोबत गेला होता. दरम्यान, त्याचा मृतदेह आढळून आला होता. माहिती मिळवून पोलिसांनी या प्रकरणात राेहिदास सपकाळ (४५) व देवईबाई रोहिदास सपकाळ (४२) या दांपत्याला गजाआड केले. रोहिदास सपकाळ हा शेती आणि जनावरांचा व्यापार करतो. त्याच्या म्हशीचा आजारी पडून काही महिन्यांपूर्वी मृत्यू झाला हाेता. शुभमच्या कुटुंबीयांनीच करणी करून आपल्या म्हशीला मारले, असा रोहिदास आणि देवईबाई यांना संशय होता. यातूनच बुधवारी खून करण्यात आला.
खून करून राेहिदास बाजाराला, देवईबाई घरात : गावातील सहा वर्षीय चिमुरड्याचा अचानक खून झाल्याने शुभमच्या घरासमोर सगळे गाव जमा झाले होते. त्याच्या कुटुंबीयांचे सांत्वन करून सर्वजण धीर देत होते मात्र भावकीतील घरात एवढी मोठी घटना घडून रोहिदास हा केज तालुक्यातील साळेगावमध्ये जनावरांच्या बाजाराला गेला होता, तर दिवसभर देवईबाई ही घरीच होती. सगळ्या महिला आल्या तरी ती सांत्वनाला आली नाही. इथे पोलिसांचा संशय अधिक गडद झाला. खून करून दिशाभूल करण्यासाठी रोहिदास बाजारला गेला होता.
नरबळीच्या संशयाची चौकशी
म्हशीला करणी करून मारल्याच्या संशयातून शुभमच्या कुटुंबीयांशी वादातून हा प्रकार झाला. यात काही जादूटोणा, नरबळी असा प्रकार आहे का, याचाही तपास केला जात आहे.- लक्ष्मण केंद्रे, सपोनि, नेकनूर
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.