आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक:बीडमध्ये ‘कुपन’वर गुटख्याची तस्करी, 40 कोटींचे कुपन जप्त; पेठ बीडमध्ये पोलिसांची कारवाई, गुन्हा नोंद

बीड3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • कुपनच्या किमतीएवढीच गुटख्याची झाली तस्करी

गुटख्याच्या तस्करीचे मोठे रॅकेट पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे. गुटख्याच्या खरेदी-विक्री व्यवहारातील सुमारे ४० कोटींचे कुपन पोलिसांच्या हाती लागले आहेत. पेठ बीड पोलिसांनी बुधवारी (दि.८) रात्री हा भंडाफोड केला आहे. जप्त करण्यात आलेल्या एकूण कुपननुसार तब्बल ४० कोटींच्या गुटख्याची बीडमध्ये तस्करी झाल्याचा अंदाज आहे.  दरम्यान, अपर अधीक्षक विजय कबाडे, उपअधीक्षक भास्करराव सावंत हे पेठ बीड ठाण्यात तळ ठोकून होते. शहरातील गांधीनगरमधील मेहबूब खान याचे भंगार व टायरचे दुकान आहे. तेथे गुटख्याचे कुपन साठवल्याची माहिती पेठ बीड पोलिस ठाण्याचे निरीक्षक विश्वास पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी बुधवारी रात्री साडेआठ वाजता सहकाऱ्यांसह छापा मारला.  तेथे त्यांना कुपनचा मोठा गठ्ठा मिळाला.  परंतु गुटखा मिळाला नाही. त्यामुळे गुन्हा दाखल काय करायचा? असा पेच होता.  मात्र, कायदेशीर सल्ला घेऊन गुरुवारी रात्री आठ वाजता पोलिस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या फिर्यादीवरून विष द्रव्याची विक्री व त्यास प्रोत्साहन देण्याचे कृत्य केल्याचा गुन्हा नोंदवला गेला. या कुपनची मोजदाद करताना पोलिस कर्मचारी घामाघूम झाले होते. एकूण तब्बल ४० कोटी रुपये किमतीचे हे कुपन पोलिसांच्या हाती लागले असून त्यानुसार तेवढ्याच किमतीच्या गुटख्याची तस्करी झाली असावी, असा पोलिसांचा कयास आहे. या प्रकरणी चौकशी सुरू आहे. 

काय आहे कुपन सिस्टिम ? 

पोलिसांच्या माहितीनुसार, अधिकाधिक गुटखा विकला जावा यासाठी डीलरला सवलत कुपन दिले जातात. गुटखा विक्रीच्या प्रमाणात सवलत कुपनची किंमत ठरलेली असते. पुढील खरेदीवेळी या कुपनआधारे उर्वरित रक्कम कापून घेतली जाते. हे कुपन म्हणजे गुटख्याच्या धंद्यातील चलनच आहे.  

कुपनच्या किमतीएवढीच गुटख्याची झाली तस्करी

सुमारे ४० कोटींचे कुपन हस्तगत करण्यात आले आहेत. गुटख्याची तस्करी करण्यासाठी या कुपनचा चलन म्हणून वापर केला जात असावा. कुपनप्रमाणे तितक्याच किमतीचा  गुटखा बीड जिल्ह्यात विक्री केला असावा, असा अंदाज आहे. तपासात आणखी काही बाबी स्पष्ट होतील.
- विजय कबाडे, अपर पोलिस अधीक्षक

बातम्या आणखी आहेत...