आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविडा ( ता. केज ) येथे धुलीवंदनाच्या सणाला जावई बापुची गाढवावरून रंगांची उधळण करीत वाजत - गाजत मिरवणूक काढण्याची परंपरा गावकऱ्यांनी जपली आहे. यंदा जवळबन ( ता. केज ) येथील अविनाश करपे हे जावई गर्दभ सवारीचे मानकरी ठरले.
केज तालुक्यातील विडा या 7 हजार लोकसंख्येच्या गावाला निजाम काळात जहागिरी होती. तर सन 1915 साली जहागीरदार तत्कालीन ठाकूर आनंदराव देशमुख यांचे बाळानाथ चिंचोली ( जि. लातूर ) येथील मेव्हूने धुलीवंधनाच्या दिवशी सासुरवाडी विडा येथे आले होते. त्यामुळे त्यांचा खास थाटमाट करीत खाण्याबरोबर भांग पिऊन त्यांची थट्टामस्करी करीत गाढवावर बसून गावातून सवारी काढली. तेव्हापासून ही जावई बापुची गाढवावरून मिरवणूक काढण्याची परंपरा सुरु झाली. ही परंपरा कायम ठेवण्यासाठी धुळवडीच्या दोन दिवस अगोदर गावातील तरुण एकत्र येऊन जावई शोध समिती नेमली. वेगवेगळी पथके करुन जावयांच्या शोध मोहीम सुरू झाली होती.
यावेळी जावई बापू शोधण्यासाठी पथकाला मोठी कसरत करावी लागली. रात्री उशिरा पर्यंत जावई हाती न लागल्याने हताश न होता धुलीवंदनाच्या दिवशीच पहाटे 2 वाजता केज तालुक्यातीलच जवळबन येथील अविनाश हरिभाऊ करपे या जावयाला तरुणांनी झोपेतच पकडून विड्याला घेऊन आले. अविनाश करपे हे युवराज पटाईत यांचे जावई असून धुळवडीच्या दिवशी सकाळी ग्रामपंचायतीसमोर गाढव आणून चपलेचा हार घातलेल्या गाढवावर जावयाला बसवून मिरवणुकीला सुरूवात झाली.
रंगाचे बॅरल भरून त्यातून रंगाची उधळण करीत ढोली बाजा, डिझेवरील गाण्याच्या तालावर तरुण मंडळीनी ठेका धरत थिरकली. तर रस्त्याच्या दुतर्फा घरांवर थांबलेल्या महिलांकडूनही मिरवणूकीवर रंगाची उधळण होत असते. गावातील प्रमुख रस्त्यांवरुन मिरवणूक काढून ग्रामदैवत राजा हनुमान मंदीरासमोर मिरवणुकीचा समारोप झाला. लोकवर्गणीतून जमलेल्या पैशांतून खरेदी केलेल्या कपड्यांचा आहेर गावातील प्रतिष्ठीतांच्या हस्ते जावई अविनाश करपे यांना करण्यात आला. सासरे युवराज पटाईत यांच्यातर्फे जावई अविनाश करपे यांना अंगठी ही भेट देण्यात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.