आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधारूर तालुक्यात बालाघाटाच्या डोंगर परिसरात मुरमाड व बरड्या स्वरूपाच्या जमीन आहे. या जमिनीत मोठ्या प्रमाणात दगड आहेत. त्यामुळे दगडं वेचणी करून पिकांची उत्पादन क्षमता वाढवण्याच्या उद्देशाने चोंडी येथील शेतकरी वैजनाथ साहेबराव मुंडे यांनी दगडं वेचणी करणारे यंत्र खरेदी केले आहे. यंत्राद्वारे मागील आठ दिवसांपासून अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीतील दगड वेचणीचे काम सुरू आहे. या यंत्रामुळे जमिनीची सुपिकता व उत्पादन क्षमता वाढण्यास नक्कीच मदत होणार आहे. धारूर तालुक्यामध्ये डोंगररांगाच्या परिसरात व माथ्यावर अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत. परंतु, या परिसरातील जमिनीत लहान-मोठे आकाराचे दगड अधिक आहेत.या दगडांमुळे खरीप व रब्बी पिके घेण्यासही शेतकऱ्यांना अडचणी येतात. तसेच या दगड-गोट्यांमुळे पिकाच्या उगवण शक्तीवर परिणाम होऊन उत्पादनही घटते. अनेक शेतकऱ्यांनी बरड्या जमिनी विक्री करून माजलगाव तालुक्यात जमिनी खरेदी करून स्थलांतर केले.
तालुक्यातील चोंडी, आंबेवडगाव, गावंदरा, भोगलवाडी, सोनीमोहा, जहागिमोहा, अरणवाडी, पिंपरवाडा, काठेवाडी, उमरेवाडी, आसोला शिंगणवाडी, सुरनरवाडी, घागरवाडा, चारदरी, चोरांबा यासह अनेक गावांतील जमिनीत अधिक दगड आहे. यावर मजुरांमार्फत दगड वेचणी केली तरी शेतामध्ये दगडांची संख्या पुन्हा वाढते. मजुरांमार्फत दगड वेचणी करण्यास शेतकऱ्यांनाही परवडत नाही. यावर पर्याय म्हणून चोंडी येथील शेतकरी वैजनाथ मुंडे यांनी मागील आठ दिवसांपूर्वी शेतातील दगड वेचणी करणारे यंत्र खरेदी केले. हे यंत्र ट्रॅक्टरला जोडून दगडांची वेचणी करून दुसऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये दगड टाकण्यात येतात. यंत्र चालवण्यासाठी दोन ट्रॅक्टरचा उपयोग करावा लागतो. एक ट्रॉलीसाठी असणारे ट्रॅक्टर तर दुसरे यंत्र चालवण्यासाठी ट्रॅक्टर अशा दोन ट्रॅक्टरची गरज असते. तालुक्यात आठ दिवसांपासून या ट्रॅक्टरला चांगली मागणी असून दिवसभरात या यंत्राच्या साह्याने तीन ते चार एकर जमिनीतील दगड वेचणी होते. तीन तासांत एक एकर जमिनीतील दगड वेचणी करण्यात येते. यंत्राच्या साह्यान दगडं ट्रॉलीच्या साहाय्याने शेताच्या बांधावर टाकण्यात येतात.
लहान-मोठ्या दगडांची वेचणी होते
दगड वेचणीचे यंत्र ६ लाख ६५ हजार रुपयास खरेदी केले आहे. दिवसभरात चार एकर शेतातील दगड वेचणी होते. लहान-मोठ्या दगडांची वेचणी होते. यास चांगली मागणी आहे. - वैजनाथ मुंडे, चोंडी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.