आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:आष्टीच्या भूमिपुत्राच्या नेतृत्वात 13 नक्षलींना कंठस्नान!; पीएसआय किशोर शिंदेंनी दाखवले शौर्य, पोलिस अधीक्षकांकडून कौतुकाची थाप

आष्टी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पोलिस उपनिरीक्षक किशोर शिंदे व एसपींनी त्यांना पाठवलेले पत्र

गडचिरोलीत दोन दिवसांपूर्वी पोलिस दलाच्या विशेष पथकातील जवानांनी नक्षलवाद्यांशी दोन हात केले. यात १३ नक्षलवाद्यांना जवानांनी कंठस्नान घातले. यामुळे या जवानांचे कौतुक होत आहे. दरम्यान, या जवानांमध्ये आष्टी तालुक्यातील सांगवी भूमिपुत्र उपनिरीक्षक किशोर शिंदे यांच्या नेतृत्वात ही कारवाई केली गेली. गडचिरोली पोलिस अधीक्षकांनी पत्र पाठवून त्यांच्या कामाचा गौरव केला. आष्टी तालुक्यातील सांगवी आष्टी या गावचे रहिवासी असलेले पोलिस उपनिरीक्षक किशोर शिंदे हे सध्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली उपविभागातील चमके कोटमे पेढी जंगल भागामध्ये २१ मे रोजी नक्षल विरोधी अभियान चालवत असताना जंगलात नक्षलवाद्यांच्या हालचालीवर नजर ठेवून त्यांची माहिती घेऊन कारवाई करत असताना नक्षलवाद्यांकडून पोलिस पथकावर अंदाधुंद गोळीबार केला गेला.

या वेळी, प्रतिकार करताना समयसूचकता आणि बुद्धिकौशल्याचा वापर करून स्वतःच्या जिवाची पर्वा न करता पोलिस उपनिरीक्षक किशोर शिंदे हे प्रभारी असलेल्या पथकाने कोणतीही अप्रिय घटना शिवाय १३ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश प्राप्त केले आहे. या घटनेमध्ये नक्षलवाद्यांकडून मोठ्याप्रमाणावर अत्याधुनिक शस्त्रास्त्रे जप्त केली आहे. या कामगिरीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. गडचिरोली पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी विशेष पत्राद्वारे पोलिस उपनिरीक्षक किशोर शिंदे प्रभारी असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.

अभिमान वाटला
किशोर शिंदे यांच्या या पराक्रमाबद्दल गावकऱ्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनीही आनंद व्यक्त केला. मुलाने दाखवलेल्या अतुलनीय शौर्याचा अभिमान असल्याची प्रतिक्रिया किशोर यांच्या कुटुंबीयांनी दिली.

बँड वाजवून अन्् फटाके फोडून केले स्वागत
या कारवाईनंतर गडचिरोली मुख्यालयात आल्यानंतर किशोर शिंदे यांच्या पथकाचे गडचिरोली पोलिसांनी बँड वाजवून, फटाके फोडून स्वागत केले. गृहमंत्र्यांनीही सर्व पोलिस दलाचे कौतुक केले.

नक्षलवादी सतीश मोहंदा ठार
या चकमकीत मृतांमध्ये कसनसूर व कंपनी क्रमांक ४ दलमच्या नक्षलींचा सहभाग आहे. मात्र यात जहाल नक्षलवादी सतीश ऊर्फ अडवे देवू मोहंदा हा ठार झाला. दोन वर्षांपूर्वी १ मे महाराष्ट्रदिनी कुरखेडाजवळील लेंढरी नाला येथे नक्षलवाद्यांनी आयडी स्फोट घडवून आणला होता. या भयंकर स्फोटात १५ पोलिस जवान शहीद झाले होते. हा स्फोट घडवण्याच्या संपूर्ण प्रक्रियेत सतीश सक्रिय होता.

बातम्या आणखी आहेत...