आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझं गाव माझी जबाबदारी:डोका गावात 45 वर्षांपुढील नागरिकांचे 95% लसीकरण, नागरिकांनी खबरदारी घेत कोरोनाला गावातून केले हद्दपार

केज2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
डोका येथे गरजूंना मदतीचे वाटप करताना सरपंच गोरख भांगे व इतर - Divya Marathi
डोका येथे गरजूंना मदतीचे वाटप करताना सरपंच गोरख भांगे व इतर
  • जनजागृतीला सकारात्मक प्रतिसाद, दीड वर्षात केवळ तीनच रुग्ण

केज तालुक्यातील डोका येथील ग्रामपंचायतीने कोरोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून बाहेरून आलेल्या नागरिकांचे विलगीकरण करीत त्यांची गावाबाहेरच राहण्याची व जेवणाची सोय केली. गावात जनजागृतीवर भर देत मास्कचा वापर, नियमांचे पालन करून ही दीड वर्षाच्या काळात तीन रुग्ण निघाले. मात्र नागरिकांनी घाबरून न जाता खबरदारी घेऊन ४५ वर्षांपुढील ९५ टक्के नागरिकांचे लसीकरण करून घेत गावातून कोरोनाला हद्दपार केले.

डोका हे गाव १५०० लोकसंख्येचे आहे. कोरोना महामारीचे संकट येताच सरपंच गोरख भांगे यांनी गावात मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्स व इतर नियमांचे पालन करण्यासाठी गावकऱ्यांमध्ये जनजागृती केली. ऊसतोड मजुरासह पुणे, मुंबई, औरंगाबाद या शहरातून गावी परतलेल्या नागरिकांची गावाबाहेर राहण्याची व जेवणाची स्वखर्चातून सोय केली. गावातून नागरिकांना बाहेर पडू न देता बाहेरून येणाऱ्या नागरिकांवर नजर ठेवत खबरदारी घेतली. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना दुकानदारांना दिल्या. सूट असलेल्या वेळेत किराणा दुकाने उघडी ठेवून नागरिकांनी गर्दी न करता सामाजिक अंतर ठेवून खरेदी केली. गावात लग्न आणि इतर सार्वजनिक धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांवर बंदी घातली. त्यामुळे वर्षभराच्या कालावधीत कोरोनाचा गावात शिरकाव झाला नाही. त्यासाठी सरपंच गोरख भांगे, ग्रामसेवक धनंजय यादव, शाळेचे मुख्याध्यापक विष्णू घोडके, शिक्षक, आशा स्वंयसेविका यांनी परिश्रम घेतले.

लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर नागरिकांचे बाहेर येणे-जाणे वाढल्याने तिघांना कोरोनाची लागण झाली. मात्र सरपंच गोरख भांगे यांनी नागरिकांना आधार दिल्याने नागरिकांनी घाबरून न जाता खबरदारी घेतली. त्यामुळे संसर्ग वाढला नाही, पॉझिटिव्ह रुग्णही कोरोनावर मात करून घरी परतले. तर चिंचोली ( माळी ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महादेव सांगळे, आरोग्य सेवक नितीन गलांडे हे आठ दिवसाला गावात जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी करून घेत आहेत. सर्दी, खोकला, ताप ही लक्षणे दिसून येताच संबंधित नागरिकांची तपासणी केली जात आहे. तर लसीकरण सुरू होताच सरपंच गोरख भांगे यांनी जनजागृती करीत गावातील ४५ वर्षांपुढील ९५ नागरिकांचे लसीकरण करून घेत त्यातील ४० टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. नागरिकांना कोरोनापासून दूर कसे ठेवता येईल यासाठी उपाययोजना राबविल्या.

गर्दी होणार नाही याची ग्रामपंचायतीने खबरदारी घेतली
ग्रामपंचायतीने वेळोवेळी केलेल्या आवाहनाला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. नागरिकांचे सर्वेक्षण करीत आठवड्याला आरोग्य तपासणी केली जात आहे. लग्न सोहळे, सार्वजनिक कार्यक्रम घेणे टाळून गर्दी होणार नाही याची खबरदारी घेतली. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला नाही. - गोरख भांगे, सरपंच, डोका

सरपंचाने गोरगरिबांना केली मदत
सरपंच गोरख भांगे यांनी लॉकडाऊनच्या काळात ऊसतोड मजूर, गोरगरीब कुटुंबांची उपासमार होऊ नये म्हणून किराणा, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. शिवाय दिवाळीच्या सणाला किराणा वाटप करून या कुटुंबांची दिवाळी गोड केली होती. नागरिकांनी घरातून बाहेर पडू नये म्हणून बंदोबस्त ठेवणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना बिस्कीट पुडे, पाणी बॉटल वाटप करून सामाजिक बांधिलकीही जपली आहे.

बातम्या आणखी आहेत...