आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरधाव कारची अ‍ॅपेरिक्षाला धडक:आजोबा, दोन नातवंडांसह चौघे ठार, केज-अंबाजोगाई मार्गावरील अपघातात सहा जखमी

केजएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लातूरहून जामखेडकडे भरधाव निघालेल्या इनोव्हा कारने (एमएच १६ सीएन ७००) समोरून येणाऱ्या अ‍ॅपेरिक्षाला (एमएच २३ एक्स ५२२९ ) जोराची धडक दिली. यात अ‍ॅपेतील दोन नातवंडांसह आजोबा व रिक्षाचालक अशा चौघांचा मृत्यू झाला. रिक्षातील अन्य ६ जखमींवर अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात गुरुवारी (२ जून) सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास केज-अंबाजोगाई मार्गावरील होळजवळ घडला. मृतांत रिक्षाचालक बालाजी संपत्ती मुंडे (२८), मच्छिंद्रसिंग चरणसिंग गोके (४८), प्रिया दीपकसिंग गोके (२), युवराजसिंग दीपकसिंग गोके (१) असे आजोबा व दोन नातवंडे यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे मच्छिंद्रसिंग यांच्या पित्याचे निधन झाल्याने रक्षा सावडण्याचा कार्यक्रम आटोपून ते परत निघाले होते.

केज शहरातील धारूर मार्गावरील भवानी माळ येथील मच्छिंद्रसिंग चरणसिंग गोके यांचे कुटुंब व्यवसायानिमित्त अंबाजोगाईला वास्तव्यास आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांचे वडील चरणसिंग ग्यानसिंग गोके यांचे निधन झाल्याने हे कुटुंब केजला आले होते. गुरुवारी रक्षा सावडण्याचा कार्यक्रम आटोपून मच्छिंद्रसिंग यांच्यासह कुटुंबातील लोक पिसेगाव (ता.केज ) येथील बालाजी संपत्ती मुंडे यांची रिक्षा भाड्याने घेऊन अंबाजोगाईला निघाले होते. अपघातात रिक्षाचा अक्षरश: चुराडा झाला, तर इनोव्हा रस्त्याच्या कडेला झुडपात घुसली. अपघाताबद्दल कळताच युसूफवडगाव ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप दहिफळे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देत जखमींना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात पाठवले. उपविभागीय अधिकारी शरद झाडके, तहसीलदार दुलाजी मेंडके यांनी भेट दिली. अपघातानंतर इनोव्हाचा चालक फरार झाला. कारमध्ये दोन महिला व दोन मुले होती. ते जामखेड येथील असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अपघातातील जखमींची नावे : कार-रिक्षातील अपघातात दीपकसिंग मच्छिंद्रसिंग गोके, गोविंदसिंग गोके, आलासिंग दुर्गासिंग कलानी, हरजितसिंग बादलसिंग टाक, अभिजितसिंग बादलसिंग टाक, चंदाबाई बादलसिंग टाक ( तिघे, रा.कन्हैयानगर, जालना ) व इनोव्हा कारमधील मंदा चिखलकर ही महिला जखमी झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...