आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड:जिल्हा बँक निवडणुकीत धनंजय मुंडेंच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीच्या शेतकरी विकास पॅनलचा मोठा विजय, 6 पैकी 5 जागी निर्विवाद वर्चस्व

बीडएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जिल्हा बँकेतील भाजपची मक्तेदारी मोडीत - धनंजय मुंडे
  • 6 पैकी 5 जागी निर्विवाद वर्चस्व, अपक्ष निवडून आलेले पापा मोदी हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष!
  • सूर्यभान मुंडेंच्या रूपाने धनंजय मुंडेंचा प्रतिनिधी पहिल्यांदाच जिल्हा बँकेत

बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या खेळीस जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत मोठे यश मिळाले आहे. महाविकास आघाडी प्रणित शेतकरी विकास पॅनलला 6 पैकी 5 जागा मिळाल्या आहेत. तर अपक्ष म्हणून निवडून आलेले राजकिशोर (पापा) मोदी हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत.

19 पैकी 8 जागांवरच निवडणूक झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आघाडीने 6 उमेदवार रिंगणात उतरवले होते. परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सूर्यभान मुंडे यांच्या रूपाने धनंजय मुंडे यांचा प्रतिनिधी प्रथमच जिल्हा बँकेच्या संचालक मंडळावर निवडून गेला आहे.

भाजप नेत्यांनी ऐन मतदानाच्या आदल्या दिवशी निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार घातला होता. परंतु माजी पालकमंत्री यांच्या आदेशाला झुगारत जवळपास 60% मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. झालेल्या मतदानापैकी 95% पेक्षा अधिक मतदान हे महाविकास आघाडीला मिळाल्याचे एकूण चित्र आहे.

महाविकास आघाडीचे भाऊसाहेब नाटकर (42 मते), अमोल आंधळे (223 मते), रवींद्र दळवी (720 मते), कल्याण आखाडे (716 मते), सूर्यभान मुंडे (710 मते) मिळवून विजयी झाले तर गंगाधर आगे यांना 36 मते मिळाली, याठिकाणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी 93 मते घेऊन विजयी झाले आहेत.

जिल्हा बँकेतील मक्तेदारी मोडीत - धनंजय मुंडे

दरम्यान केवळ 8 जागांवर निवडणूक होत असताना देखील जिल्हा बँकेशी संलग्न मतदारांनी महाविकास आघाडीला कौल दिला आहे. निवडणुकीवर बहिष्कार घालून, आपल्याच मतदारांवर अविश्वास दाखवत त्यांना राखण बसणाऱ्या भाजपची मक्तेदारी या निकालाने मोडीत निघाली असल्याचे मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे. ना. मुंडे यांनी सर्वच नवनिर्वाचित संचालकांचे अभिनंदन केले आहे. तसेच जिल्हा बँकेच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय येणाऱ्या काळात घेतले जातील, असा विश्वासही ना. मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

अवघ्या काही तरुण सहकाऱ्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या धनंजय मुंडे यांचा सूर्यभान मुंडे या जिवलग सहकाऱ्याच्या रूपाने जिल्हा बँकेतील प्रवेश महत्वाचा मानला जात आहे. नगर परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद या पाठोपाठ जिल्हा बँकेतील भाजपचे वर्चस्व मोडीत काढून धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा आपले नेतृत्व सिद्ध केले असल्याची चर्चा जिल्हाभरात आहे.

सत्तेचा गैरवापर केला म्हणणाऱ्या विरोधकांना सर्वोच्च न्यायालयाचे निकाल कळत नसतील तर ते त्यांचे अज्ञान - अमरसिंह पंडितांचा विरोधकांना टोला

महाविकास आघाडीतील प्रत्येक शिलेदाराने ना. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ही लढाई जिकिरीने लढली. प्रत्त्येक मतदारापर्यंत पोहचून आम्ही सर्वांनी काम केले. परंतु ऐनवेळी बहिष्कार घालणाऱ्या विरोधकांवर मात्र या निकालाने नामुष्की आली आहे. 'सहकार क्षेत्रातील यांना काही कळत नाही' असं म्हणणाऱ्या विरोधकांना ना. मुंडे यांनी मुत्सद्दी खेळी करत चारी मुंड्या चित केले. सत्तेचा गैरवापर केला म्हणणाऱ्या माजी मंत्र्यांनी निबंधक, हायकोर्ट ते अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत खेटे घातले मात्र इथे जो निकाल दिला होता तोच निकाल सर्वोच्च न्यायालयाने कायम केला, तरीही विरोधक सत्तेच्या वापराचा राग आळवत असतील तर हे त्यांचे अज्ञान आहे, असा मिश्किल टोला माजी आ. अमरसिंह पंडित यांनी लगावला आहे.

बातम्या आणखी आहेत...