आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाडा दौरा:भाजप जनआशीर्वाद यात्रेला मराठवाड्यात अपशकुन!; पक्षविरोधी घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांवर पंकजा भडकल्या

परळी वैजनाथ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कपिल पाटील यांच्या यात्रेच्या मार्गावर शिवसेनानेत्यांनी लावले फ्लेक्स

बीडच्या भाजप खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना डावलून औरंगाबादचे राज्यसभा सदस्य डॉ. भागवत कराड यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश केल्याच्या संतापाची धग अद्यापही मंुडे समर्थकांमध्ये कायम असल्याची प्रचिती सोमवारी परळीत आली. डाॅ. कराड यांच्या जनआशीर्वाद यात्रेची सुरुवात गोपीनाथगड येथून हाेत असताना मुंडे समर्थकांनी ‘पंकजा मुंडे अंगार है, बाकी सब भंगार है’च्या घाेषणा देत अप्रत्यक्षपणे डॉ. कराड यांना विरोधच दर्शवला. त्यामुळे संतापलेल्या पंकजा मुंडे यांनी घाेषणाबाज कार्यकर्त्यांना चांगलेच फटकारले. ‘हा दुसऱ्या पक्षाचा कार्यक्रम आहे का? असं वागणं अजिबात शोभत नाही. जेवढ्या मोठ्या उंचीची मी आहे तेवढी लायकी ठेवा स्वत:ची. नाही तर मला भेटायला येऊ नका,’ अशा शब्दांत त्यांनी कानउघाडणी केली.

अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांतून ही यात्रा जाणार आहे. मात्र केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर मुंडे व कराड समर्थकांमध्ये निर्माण झालेली दरी दूर करण्यासाठी या यात्रेची सुरुवातच गोपीनाथ गडावरून करण्याचे ठरवण्यात आले. सोमवारी सकाळी डॉ. कराड परळीतील पंकजा मुंडे यांच्या निवासस्थानी दाखल झाले. तिथे थोडा वेळ थांबून नंतर वैद्यनाथ मंदिराचे बाहेरूनच दर्शन देऊन डॉ. कराड हे पंकजा मुंडे व इतर नेत्यांसह गोपीनाथगडाकडे रवाना झाले.

तिथे मान्यवरांनी गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले व पंकजा यांनी हिरवी झेंडी दाखवून यात्रेला प्रारंभ केला. मात्र तत्पूर्वी नेत्यांचा ताफा गडावर येताच मुंडे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. ‘पंकजा मुंडे अंगार है, बाकी सब भंगार है’, ‘गोपीनाथ मुंडे अमर रहे’ आदी घाेषणा देण्यात आल्या. या घोषणांमुळे डॉ. कराड यांच्यासह यात्रेतील इतर नेते अस्वस्थ झाले. पंकजाही संतापल्या होत्या.

कपिल पाटील यांच्या यात्रेच्या मार्गावर शिवसेनानेत्यांनी लावले फ्लेक्स
प्रस्तावित नवी मुंबई विमानतळाला भूमिपुत्रांचे नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी करत केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी राज्यातील सत्ताधारी शिवसेनेवर हल्ला चढवला. विशेष म्हणजे त्यांच्या यात्रेच्या मार्गावर शिवसेनेच्या नेत्यांनी कपिल पाटील यांच्या स्वागताचे फ्लेक्स लावले होते. ‘मै हूँ डॉन’च्या गाणे लावून कपिल पाटील यांचे येथे स्वागत करण्यात आले. पाटील यांची यात्रा रायगड व ठाणे जिल्ह्यापुरती असून पाच दिवसांत यात्रेचा प्रवास ४५१ किमी होईल.

हा दुसऱ्या पक्षाचा कार्यक्रम आहे का?
‘मी तुम्हाला असं वागायला शिकवलंय का? मूर्ख कुठले? मुंडे साहेबांवर तुमचे प्रेम आहेच, त्यामुळे ‘मुंडे साहेब अमर रहे’ या घोषणा मी रोखू शकत नाही, पण ‘अंगार, भंगार’ हे काय लावलं? हा दुसऱ्या पक्षाचा कार्यक्रम आहे का? असं वागणं अजिबात शोभत नाही. जेवढ्या मोठ्या उंचीची मी आहे तेवढी स्वत:ची लायकी ठेवा. नाही तर मला भेटायला येऊ नका..’ असे समर्थकांना सुनावून पंकजा निघून गेल्या.

बातम्या आणखी आहेत...