आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आज जिल्ह्यात; आष्टीत कार्यकर्ता मेळावा, कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता

बीड8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विधान परिषदेच्या निवडणुकीत डावलल्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे मंगळवारी (२१ जून) पहिल्यांदाच बीड जिल्ह्यात येत आहेत. दुपारी १ वाजता आष्टीत त्या भाजप कार्यकर्त्यांचा मेळाव्याला हजेरी लावून कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. त्यामुळे पंकजा काय बोलणार? पक्षाकडून डावलले जात असल्याने नाराज समर्थकांना आगामी जि.प., पं.स. निवडणुकांसाठी काय कानमंत्र देणार हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

परळी विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर पक्षांतर्गत गटबाजीतून पंकजा मुंडेंचे अद्यापही राजकीय पुनर्वसन होऊ शकलेले नाही. एकीकडे भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंचे समर्थक म्हणून ओळखले जात असलेल्या नेत्यांना भाजपकडून विविध पदांवर संधी दिली जात आहे. रमेश कराड, डॉ. भागवत कराड आणि आता प्रा. राम शिंदे यांना पक्षाने उमेदवारी देत संधी दिली. डॉ. भागवत कराड यांना तर मंत्रीही केले. मात्र, गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजांच्या बाबतीत मात्र पक्ष निर्णय घेत नसल्याचे चित्र आहे.

सुरुवातीला पंकजांना विधान परिषदेची आमदारकी मिळेल असे वाटत असताना ती माळ रमेश कराडांच्या गळ्यात पडली. राज्यसभेवर संधी मिळेल अशी शक्यता असताना डॉ. कराड यांना उमेदवारी देत पक्षाने धक्का दिला. नंतर खा. डॉ. प्रीतम मुंडेंची मंत्रिपदावर वर्णी लागेल असा अंदाज असताना आणि त्यांची मोठी दावेदारी असताना तिथेही पक्षाने डॉ. कराड यांनाच पसंती दिली. या वेळी पंकजा मुंडे समर्थकांनी राजीनामा सत्र सुरू केले होते. यानंतर पंकजांनी मुंबईत सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करून पक्ष घेईल तो निर्णय अंतिम असेल असे सांगितले होते. दरम्यान, आधी राज्यसभा व आता विधान परिषदेच्या निवडणुकीत पंकजांचे नाव आघाडीवर असतानाही त्यांचा पत्ता कट करून इतरांना पक्षाने पसंती दिली. त्यामुळे पंकजा मुंडे समर्थकांच्या नाराजीचा रोखही देवेंद्र फडणवीसांकडेच आहे.

समर्थक रस्त्यावर
पंकजांना डावलल्याने कार्यकर्त्यांनी थेट रस्त्यावर उतरून नाराजी व्यक्त केली. औरंगाबादेत भाजप कार्यालयावर दगडफेक झाली. बीडमध्ये विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांचा २ वेळा ताफा अडवला होता. पाथर्डीत कार्यकर्त्याने विष घेत आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

मेळाव्यात पंकजांच्या बोलण्याकडे लक्ष
उमेदवारी डावलणे, कार्यकर्त्यांनी नेत्यांचा ताफा अडवणे, कार्यकर्त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न करणे या सगळ्यांच्या बाबतीत अद्यापही पंकजांनी मौन बाळगलेले आहे. जाहीररीत्या त्या काहीही बाेललेल्या नाहीत. या सर्व घटनानंतर त्या मंगळवारी दुपारी पहिल्यांदाच जिल्ह्यात येत असून कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करणार आहेत. त्यामुळे त्या काय बोलतात याकडे लक्ष असेल.

ताकद दाखवण्याचा प्रयत्न
येत्या जि.प. व पं.स. निवडणुकांत अधिक जोमाने काम करून जिल्ह्यात भाजपची सत्ता मिळवून पक्षाला त्या ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न करतील. त्या अनुषंगानेच त्या कार्यकर्त्यांना संबोधित करतील, असे सूत्रांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...