आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठिणगी:बीड जिल्हा बँक निवडणुकीत परळीत भाजप-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले

बीडएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

परळी येथील वैद्यनाथ सहकारी औद्योगिक वसाहतीतील मतदान केंद्रावर बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदाच्या आठ जागांसाठी शनिवारी दुपारी चार वाजता मतदानाची प्रक्रिया संपत असतानाच नंदागौळ गावातील एक मतदार मतदान करताना भाजप कार्यकर्त्यांनी वेळ संपल्याचे कारण पुढे करून आक्षेप घेतला. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते धावून आले. मतदान केंद्राच्या बाहेर राष्ट्रवादी व भाजपच्या कार्यकर्त्यांत बाचाबाची होऊन हमरीतुमरी झाली. या कारणामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. भाजपच्या मतदाराच्या नावावर एकाच गावातील दुसऱ्या व्यक्तीने नावातील साम्य हेरून बोगस मतदान केल्याचा आक्षेप घेऊन भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.

बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या जागेसाठी शनिवारी जिल्ह्यातील अकरा मतदान केंद्रावर मतदान घेण्यात आले. परळी येथील औद्योगिक वसाहतीच्या कार्यालयात सकाळी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. या मतदान केंद्राच्या परिसरात दुपारपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस-शिवसेना असे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मंडपात तळ ठोकून होते. बोगस मतदान होऊ नये म्हणून भाजपच्या मंडपातही कार्यकर्ते उपस्थित होते.

दुपारी चारच्या सुमारास परळी तालुक्यातील नंदागौळ येथील एक मतदार केंद्रावर मतदानासाठी गेला होता. त्या वेळी वेळ संपत आल्याचे सांगितले तरी मतदान करण्यात आले असा आक्षेप भाजप कार्यकर्त्यांनी घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते त्या ठिकाणी आले. या वेळी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत बाचाबाची होऊन हमरीतुमरी झाली. आजच्या निवडणुकीत भाजपने मतदानावर बहिष्कार टाकल्याने राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मात्र उत्साहात मतदान करून घेतले. हा प्रकार समजताच भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी मतदान केंद्राजवळ येऊन कार्यकर्त्यांशी चर्चा केली. मतदानाची वेळ संपल्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मतदान करू द्यावे असा आग्रह धरला होता. याला भाजपच्या कार्यकर्त्यांनी, सतीश मुंडे भाजप तालुकाध्यक्ष यांनी आक्षेप केला. गोंधळ निर्माण झाला. दोन्ही कार्यकर्त्यांत बाचाबाची झाली.

परळी तालुक्यातील मांडवा गावात सुधाकर प्रभाकर फड या नावाचे दोन व्यक्ती असून जिल्हा बँकेच्या मतदानाचा अधिकार मात्र एकाच व्यक्तीला होता. मांडवा येथील भाजपचे ज्येष्ठ नेते प्रभाकर फड यांचे चिरंजीव सुधाकर फड हे सोसायटीचे अधिकृत मतदार होते. परंतु या नावाचा सारखेपणा शोधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मांडवा येथील सुधाकर फड या व्यक्तीचे मतदान करून घेतल्याचा आरोप भाजपने केला आहे.

हा प्रकार राष्ट्रवादीकडून नैराश्यापोटी
मतदान केंद्राच्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांवर दादागिरी करण्याचा प्रयत्न झाला. राष्ट्रवादीच्या दादागिरीची आम्हाला सवय असून रोज आम्ही त्याचा प्रत्यय घेतो. सर्व नियमाप्रमाणे व्हावे असे काम आम्ही केले आहे त्यांचे काम नियम तोडण्याचे आहे हा प्रकार राष्ट्रवादीने नैराश्यापोटी केला आहे.असे चुकीचे काम खपवून घेणार नाही. -पंकजा मुंडे, भाजप नेत्या

बातम्या आणखी आहेत...