आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेवराई तालुक्यातील केकतपांगरी येथील ग्रामपंचायत निवडणूक दरम्यान पोलिसांकडून नागरिकांना मारहाण करत नागरिकांवर गुन्हा दाखल करून नाहक त्रास देण्यात आला. त्यानंतर नागरिकांकडून न्यायालयात धाव घेत जामीन मिळवला. परंतु, गेवराई पोलिसांकडून गावामध्ये दहशत निर्माण करण्यासाठी वारंवार गावात फेऱ्या मारत गावातील तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेले जात आहे. पोलिसांकडून होत असलेला नाहक त्रास तत्काळ थांबविण्याची मागणी बीड जिल्हा भाजप पदाधिकाऱ्यांनी पोलिस अधीक्षक ठाकूर यांना भेदून निवेदन देत केली. गेवराई तालुक्यातील केकतपांगरी निवडणुकीदरम्यान हरिलाल नाईक तांडा, रामुनाईक तांडा येथील मतदार केंद्रावर १८ डिसेंबर २०२२ रोजी मतदानाच्या दिवशी इव्हीएम वारंवार बंद पडत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात होता.
मतदान प्रक्रियेचा कालावधी संपल्यानंतरही मशीनच्या बिघाडीमध्ये उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरू ठेवण्यात आली होती. मात्र सुरळीत सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेमध्ये पोलिसांकडून जमावावर विनाकारण अमानुष मारहाण करण्यास सुरूवात केल्याने नागरिकांचा रोष अनावर होऊन पोलिस आणि नागरिकांमध्ये वाद झाला होता. तत्कालीन पीआय रवींद्र पेरगुलवार यांनी गुन्हे नोंद केले होते. यात न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतरही पोलिसांकडून अज्ञातांचा शोध घेत असल्याचे सांगत गावामध्ये दहशत निर्माण करत असल्याने नागरिक भयभीत होत आहे, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, माजी जि. प. सदस्य प्रा. पी. टी. चव्हाण, जिल्हा संघटन सरचिटणीस देविदास नागरगोजे, भाजप अनुसूचित मोर्चा जिल्हाध्यक्ष अजय सवाई, भाजप विमुक्त-भटके आघाडी बीड जिल्हाध्यक्ष डॉ. लक्ष्मण जाधव, शांतिनाथ डोरले, महेश सावंत, संतोष चव्हाण आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.