आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक:माजलगावमध्ये बोगस वैद्याचे पितळ उघड, कोणतेही प्रमाणपत्र नसतानाही पाठदुखी व हाडांच्या आजारावर उपचार

बीडएका वर्षापूर्वीलेखक: दिनेश लिंबेकर
  • कॉपी लिंक

पाठदुखी व हाडांच्या आजारावर उपचार करणाऱ्या नित्रुड येथील जनसेवा आयुर्वेद केंद्रावर माजलगावच्या तहसीलदार वर्षा मनाळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मधुकर घुबडे व आरोग्य सहायक, दिंद्रुड पोलिस यांच्या पथकाने नुकताच छापा मारला होता. छाप्याच्या वेळी बोगस वैद्य सुभाष बाबूराव राठोड (रा. नित्रुड, ता. माजलगाव) उपचार केंद्रात आढळून आला होता. कोणतेही वैद्यकीय प्रमाणपत्र नसतानाही तो रुग्णांवर उपचार करत असल्याचे यावेळी आढळून आले होते. मात्र, या बोगस वैद्याला पकडण्यात पोलिसांना अपयश आले आहे. गुन्हा दाखल होण्यास उशीर झाल्याने बोगस वैद्य सुभाष राठोड हा फरार झाला आहे.

माजलगाव-तेलगाव महामार्गावरील नित्रूड येथे कुठलाही वैद्यकीय व्यवसायाचा परवाना नसताना सुभाष राठोड हा जनसेवा आयुर्वेदिक उपचार केंद्राच्या नावाखाली बोगसपणे वैद्यकीय व्यवसाय करत होता. तो रुग्णांना तपासतही होता. राठोडकडे अनधिकृत वैद्यकीय कागदपत्रांसह आयुर्वेदिक औषधे, गोळ्या त्याच बरोबर रुग्णांची तपासणी रजिस्टर आढळून आले. या प्रकरणी डॉ. अमोल मायकर तक्रारीवरून सुभाष राठोडवर फसवणुक व वैद्यकीय व्यावसायिक अधिनियम १९६१ अन्वये कलम ३३ नुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच, तालुका स्तरीय पथकाने सदरील उपचार केंद्र सील केले होते.