आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य विभागातील भरती:आरोग्य विभागाला बूस्टर डोस

अमोल मुळे | बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालेला भरती घोटाळा आणि सन २०१९ मध्ये उमेदवारांचे अर्ज घेऊन रखडलेल्या जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेला अखेर गती आली आहे. बीड जिल्हा परिषदेत विविध पदांच्या ३६७ जागा भरल्या जाणार आहेत. तोकड्या मनुष्यबळात काम करणाऱ्या आरोग्य विभागाला या भरतीमुळे बूस्टर डोस मिळणार आहे. दरम्यान, या भरतीसाठी जिल्ह्यातून १८ हजार ६४८ उमेदवारांनी यापूर्वीच अर्ज केलेले आहेत.

राज्याच्या आरोग्य विभागात गट क संवर्गातील अनेक पदे रिक्त होती. यामुळे आरोग्य विभागाच्या कामकाजावर परिणाम होत होता. जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग हा ग्रामीण भागात आरोग्य सुविधा पुरवण्याचे काम करत असल्याने रिक्त पदांचा थेट परिणाम ग्रामीण आरोग्य सेवेवर होत होता. त्यामुळे सन २०१९ मध्ये ही पदे भरण्यासाठी जाहिरात दिली गेली होती. जिल्ह्यातून हजारो उमेदवारांनी यासाठी अर्ज केले मात्र नंतर ही पदभरती रखडली. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या भरतीतही गैरप्रकार समोर आला होता. दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारने रखडलेली आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून २०१९ आणि घोटाळा काळातील पदे जिल्हा निवड समितीकडून भरली जाणार आहेत. याबाबतचा शासन निर्णय जाहीर केला गेला आहे.

अशा आहेत रिक्त जागा बीड जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर आरोग्यसेवक (पुरुष) या पदाच्या हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांमधून भरल्या जाणाऱ्या ९६, सरळ सेवेतून भरल्या जाणाऱ्या २०, औषध निर्माण अधिकारी पदाच्या १४, आरोग्य पर्यवेक्षक पदाच्या ३, आरोग्य सेवक महिला पदाच्या २३४ अशा एकूण ३६७ जागा रिक्त आहेत. त्या यातून भरल्या जाणार आहेत.

पारदर्शकपणे भरती होईल जिल्हा निवड समितीमार्फत पारदर्शकपणे ही भरती प्रक्रिया राबवली जाईल. ३६७ पदे भरली जाणार असल्याने आरोग्य विभागाला याचा फायदा होणार आहे. १८ हजार उमेदवारांनी यासाठी अर्ज केलेेले आहेत. - डॉ. अमोल गिते, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि. प., बीड

१५, १६ ऑक्टोबरला परीक्षा
१५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते १ यादरम्यान आरोग्य पर्यवेक्षक तर दुपारी ३ ते ५ या काळात औषध निर्माण अधिकारी पदासाठी परीक्षा होईल. १६ ऑक्टोबर राेजी आरोग्यसेवक महिला व आरोग्यसेवक पुरुष यांच्यासाठी परीक्षा होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...