आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशंभरी पार केलेले वृद्ध, दिव्यांग आणि तरुणांसह महिलांनीही ग्रामपंचायत निवडणुकीत सकाळपासूनच रांगा लावून मतदान केले. ६७१ ग्रामपंचायतींसाठी राबवण्यात आलेल्या मतदान प्रक्रियेत रविवारी (दि.१८) दुपारपर्यंतच ६० टक्के मतदान झाले होते. दुपारनंतर मात्र मतदानाची टक्केवारी घटली. बीड तालुक्यात चऱ्हाटा ग्रामपंचायतीत येणाऱ्या जाधववाडी व मेंगडेवाडी येथील बुथ चऱ्हाटा येथे स्थलांतरीत केल्याने येथील ८५० मतदारांनी बहिष्कार टाकला तर, माजलगावच्या नागझरीच्या १०० जणांनी बहिष्कार टाकला. डोईफोडवाडी आणि लिंबागणेशमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. हे प्रकार वगळता जिल्ह्यात शांततेत मतदान प्रक्रिया राबवली गेली.
ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील ७०४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. राज्यातील सत्तांतरानंतर होणाऱ्या या निवडणुकांत राजकारण्यांचा मोठा उत्साह होता मतदानात मतदारांचाही उत्साह दिसून आला. थेट जनतेतून निवडणूक असूनही ४७ सरपंच बिनविरोध निवडले गेले तर, ६६३ सदस्य बिनविरोध निवडले गेले होते. मतदान प्रक्रियेची जय्यत तयारी प्रशासनाने केली होती. रविवारी सकाळपासूनच मतदारांनी केंद्रांवर रांगा लावायला सुरुवात केल्याचे चित्र होते. पहिल्या टप्प्यातच सर्वाधिक मतदान झाले. मतदारांना मतदानासाठी घराबाहेर काढण्यात उमेदवार यशस्वी झाल्याचे पहायला मिळाले. जिल्ह्यात साडेतीन वाजेपर्यंत ६० टक्के मतदानाची नोंद झाली होती.
बीड तालुक्यातील चऱ्हाट ग्रामपंचायतीत येणाऱ्या मेंगडेवाडी व जाधववाडीसाठी मेंगडेवाडीत ८५० मतदार आहेत. इथे मतदान केंद्र असते यंदा मात्र हे केंद्र चऱ्हाटा येथे स्थलांतरीत केले गेले. या विरोधात गावकऱ्यांनी एकत्रित येत घोषणाबाजी केली. प्रशासनाचा निषेध केला. मतदानावर बहिष्काराची भूमीका घेतली.
परराज्यातून येऊन मत केज तालुक्यात सकाळच्या सत्रात मतदारांची संख्या तुरळक होती. त्यानंतर सकाळी १० वाजेपासून मतदारांची गर्दी वाढत गेली. दुपारच्या सत्रात गर्दी वाढल्याने स्त्री - पुरुष मतदार रांगेत उभे राहून मतदान करीत होते. परराज्यात गेलेल्या ऊसतोड मजुरांनी गावी येऊन मतदानाचा हक्क बजावला.
नाकलगाव, मुंगीत यंत्रामध्ये झाला बिघाड माजलगावच्या नाकलगाव आणि धारूरच्या मुंगी येथे यंत्रात बिघाड झाल्याने यंत्र बदलण्याची वेळ आली. बोगस मतदानाकडे दूर्लक्ष करत असल्याच्या तक्रारीनंतर अंजनडोह येथील केंद्राध्यक्ष बदलण्यात आला. धारूरमध्ये २८ ग्रामपंचायतीसाठी ८७ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली.
मतदान यंत्रामध्ये बिघाड; चार तालुक्यात उशिरापर्यंत मतदान शिरुर कासार, परळी, माजलगाव आणि किल्ले धारूर या चार तालुक्यांमध्ये मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाल्याने काही काळ मतदान प्रक्रिया बंद झाली हाेती. त्यानुसार तहसीलदार यांना जिल्हा प्रशसनाने मतदान प्रक्रिया पूर्ण हाेण्यासाठी अतिरीक्त कालावधी वाढून दिला त्यामुळे या चार तालुक्यांमध्ये रात्री उशीरापर्यंत मतदान सुरू हाेते. यामध्ये शिरुर कासार तालुक्यासाठी तीन तास, परळी तालुक्यासाठी दाेन तास, माजलगाव तालुक्यासाठी दीड तास, किल्ले धारुर तालुक्यासाठी एक तास अशा पध्दतीचा अधिकचा वेळ तालुका प्रशासनाला देण्यात आले आहे. या चार तालुक्यातील ठरावीक मतदान यंत्र बंद पडलेल्या केंद्रांमध्ये हा अधिकचा वेळ दिल्याने रात्री उशिरापर्यंत या तालुक्यातील एकूण मतदान व टक्केवारी कळू शकली नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.