आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानातेवाइकाच्या अंत्यविधीनंतर अहमदपूरला निघालेल्या कारचे अंबाजोगाई-अहमदपूर महामार्गावर अचानक ब्रेक निकामी झाले. चालकाने कार थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु, कार रेस होत होती. भरधाव कारने पानटपरीसमोरील तिघांचा बळी घेऊन शंभर फूट फरफटत नेऊन विजेच्या खांबावर जाऊन कार आदळली. घाटनांदूर (ता. अंबाजोगाई) येथे सोमवारी रात्री पावणेदहा वाजता घडलेल्या या भीषण अपघाताचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. वैभव ऊर्फ सौरभ सतीश गिरी (२२), लहू बबन काटुळे (३०), रमेश विठ्ठल फुलारी (४५, सर्व रा. घाटनांदूर, ता. अंबाजोगाई) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. या अपघातात कारचालकासह अन्य एक प्रवासी व दुचाकीचालक असे तिघे जखमी झाले आहेत. पोलिसांनी कारचालकाला अटक केली आहे.
अंबाजोगाई येथे नातेवाइकाचा अंत्यविधी उरकून सोमवारी रात्री पावणेदहा वाजता कार (एम एच २४ व्ही २५१८) अहमदपूकडे निघाली होती. ब्रेक फेल झाल्याने कारचालक शेख अली शेख बाबूसाब (५७) याचे कारवरील नियंत्रण सुटले. घाटनांदूर गावाजवळ या कारने नवाबवाडीला जाणाऱ्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात सालगडी उद्धव निवृत्ती डोमपले (४७, नवाबवाडी, ता. अंबाजोगाई) हे गंभीर जखमी झाले. यानंतरही भरधाव कार धावतच होती.
घाटनांदूर येथे एका पानटपरीसमोर गप्पा मारत उभे असलेले वैभव ऊर्फ सौरभ सतीश गिरी, लहू बबन काटुळे, रमेश विठ्ठल फुलारी या तिघांना कारने चिरडले. त्यानंतर कार एका विजेच्या खांबावर आदळून थांबली. यात कारचालक शेख अली शेख बाबूसाब, कारमधील सहप्रवासी दीपक वैजनाथ राजारोशे (३५, रा.अहमदपूर) हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तिघांच्या मृत्यूने गावावर शोककळा : सोमवारी रात्री कार अपघातात ठार झालेले वैभव गिरी, लहू काटुळे हे दोघेही अविवाहित होते. मृत वैभव गिरी हा मजुरी करून शेळ्यांचा खरेदी-विक्रीचा व्यवसाय करत होता. तर लहू काटुळेचे गावात ऑटोमोबाइलचे दुकान होते. तर मृत रमेश विठ्ठल फुलारी हे गावात फुलांचे हार तयार करून कुटुंब चालवत होते. फुलारींच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. तिघांच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली. दरम्यान, नातेवाइकांच्या आक्रोशामुळे अख्खे गाव सून्न झाले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.