आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्तनाचा कर्करोग हा महिलांत सर्वाधिक प्रमाणात आढळणारा कर्करोग आहे. हा कर्करोग शरीराच्या इतर भागात झपाट्याने पसरतो. म्हणून या आजाराचे निदान व उपचार लवकरात लवकर करणे गरजेचे आहे. स्वाराती वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयात सुरु असलेल्या स्तन कर्करोग जनजागृती व उपचार मोहिमेचा लाभ सर्व स्तरातील गरजू महिलांपर्यंत पोहोचावा, असे आवाहन युवा नेते अक्षय मुंदडा यांनी केले. वैद्यकीय शिक्षण व द्रव्ये औषधी विभागातर्फे राज्यभरात स्तन कर्करोग जनजागृती व उपचार अभियान राबवले जात असून या अभियानाचे स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात युवा नेते अक्षय मुंदडा, अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे, डॉ.शुभदा लोहीया, शल्य चिकित्सा विभाग प्रमुख डॉक्टर नितीन चाटे यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले यावेळी मुंदडा हे बोलत होते. नोडल अधिकारी डॉ.नितीन चाटे यांनी प्रास्ताविक करताना या अभियानामागील भुमिका स्पष्ट केली. ८ मार्चपासून दर बुधवारी दुपारी १२ ते २ या वेळेत स्वाराती रुग्णालयातील ओपीडी क्रमांक दोनमध्ये या अभियानासाठी विशेष बाह्यरुग्ण कक्ष सुरु केला गेला असून तेथे स्तन कर्करोग, स्वय स्तन तपासणी व संबंधित माहिती, समुपदेशन व उपचार मोफत केले जातील, अशी माहिती दिली.
अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे यांनी शासनामार्फत मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या स्थुलता निवारण, स्तन कर्करोग या मोहीमांसह आगामी काळात हाडाचा ठिसुळपणा, थायरॉईड आजार आदींबाबत देखील जनजागृती मोहीम राबवली जाणार असल्याचे सांगितले. यावेळी डॉ. शुभदा लोहीया, डॉ.सिद्धेश्वर बिराजदार, डॉ. देव, अधिपरिचारीका भताने, पत्रकार अविनाश मुडेगावकर, रवि मठपती, सामाजिक कार्यकर्ते भागवत मसने, डॉ.अमित लोमटे, डॉ.नागेश अब्दागिरे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ.चिन्मय इंगळे यांनी केले तर आभार डॉ.सतिश गिरेबोईनवाड यांनी केले.
लक्षणे जाणवल्यास तातडीने तपासणी करून घ्यावी स्तनाच्या कर्करोगाचे प्राथमिक अवस्थेत निदान झाल्यास रुग्णास कमी हानी होते व जीवनमान सुधारते असे दिसुन येते . स्तनाच्या कोणत्याही भागात गाठ तयार होणे अथवा वेदना होणे, स्तनावर सूज येणे, जळजळणे अथवा डाग पडणे, स्तनाग्रातून रक्त येणे, लालसर होणे, वेदना होणे आत खेचले जाणे, स्तनांच्या आकारात बदल दिसणे, अशी साधारण स्तन कर्करोगाची लक्षणे आहेत. यातील कुठलीही लक्षणे जाणवल्यास तातडीने तपासणी करून घ्यावी, असे आवाहन नोडल अधिकारी डॉ.नितीन चाटे यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.