आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबालकामगारांना बालमजुरीच्या कचाट्यातून मुक्त करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी काम करणारा राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प केंद्र शासनाने मुदतवाढ न दिल्याने वर्षभरापासून बंद आहे. त्यामुळे या प्रकल्पांतर्गत येणारी २१ विशेष प्रशिक्षण केंद्रेही बंद पडली आहेत. या प्रकल्पांमधून ८२३ विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात होते. तर, १०० कर्मचारी यासाठी काम करत होते तेही ता बेरोजगार झाले आहेत.
१२ जून हा जागतिक बालकामगार प्रथाविरोधी दिन म्हणून पाळला जातो. बालकामगारांचे सर्वेक्षण करून त्यांच्यात शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, बालकामगार प्रथेपासून बालकामगारांची मुक्तता व्हावी, त्यांना व्यवसाय कौशल्य शिक्षण मिळावे यासाठी राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प उपक्रम केंद्र शासनाच्या वतीने राबवला जातो.
राज्यात कामगार आयुक्त कार्यालयाकडून याची अंमलबजावणी केली जाते. या प्रकल्पांना दरवर्षी मुदतवाढ दिली जात असते. बालकमारांच्या शाळांसाठी निधी, कर्मचाऱ्यांसाठी निधीही दरवर्षी दिला जातो. दरम्यान, कोरोना लॉकडाऊनपासून मात्र बालकामगार प्रकल्पाला घरघर लागली. बीड येथील प्रकल्पाची मुदत मार्च २०२१ मध्ये संपूनही अद्याप मुदतवाढ मिळालेली नाही. जिल्ह्यात एकूण २१ केंद्रांतून ८२३ बालकामगारांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम केले जात होते. मात्र, आता याला खीळ बसली आहे.
१०० कर्मचारीदेखील झालेत बेरोजगार
प्रत्येक केंद्रासाठी २ शिक्षण निदेशक, एक लिपिक, एक शिपाई असे मनुष्यबळ असते. तर, प्रत्येक तीन केंद्रांसाठी एक व्यवसाय निदेशक असतो. मात्र, मुदतवाढ न मिळाल्याने हे कर्मचारीही आता बेरोजगार झालेत. जिल्ह्यात २१ केंद्रांसाठी ८४ स्वयंसेवक, ८ निदेशक कार्यरत होते. तर, जिल्हा कार्यालयात १ प्रकल्प संचालक, २ कार्यक्रम अधिकारी, १ स्टेनो, १ लिपिक, १ शिपाई असे मनुष्यबळ कार्यरत होते. या सर्वांवर आता बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली.
हा प्रकल्प सुरू राहणे आवश्यक
राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प कार्यालयातून बालमजुरांना क्रमिक व व्यावसायिक शिक्षण दिले जात होते. यामुळे बालकांत शिक्षणाची गोडी निर्माण होत होती. मात्र, मुदतवाढ न मिळाल्याने प्रकल्प बंद आहे. बालकामगारांसाठी हा महत्त्वाचा प्रकल्प होता. तो सुरू राहणे आवश्यक आहे.
-ओमप्रकाश गिरी, माजी प्रकल्प संचालक, राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प, बीड.
कोरोना संकटानंतर सर्वेक्षणही नाही
बालकामगार किती आहेत यासाठी दर दोन वर्षांनी किंवा पाच वर्षांतून दोन वेळा बालकामगार प्रकल्प कार्यालयाकडून सर्वेक्षण केले जाते. यामध्ये ज्या परिसरात १५ ते २० बालकामगार आढळतात त्या ठिकाणी त्यांच्यासाठी प्रकल्पामार्फत शिक्षणाची सुविधा देणारे केंद्र सुरू केले जाते. मात्र, कोरोना लॉकडाऊन कालावधीनंतर अनेक कुटुंबांची आर्थिक स्थिती खालावलेली आहे. शिवाय, शाळाही बंद होत्या त्यामुळे बालकामगारांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. मात्र, अद्याप सर्वेक्षणही झाले नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.