आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तपासाचा टक्का कमी:दर दोन दिवसांनी घरफोडी अन् 3 चोऱ्या; केवळ 17% घरफोडी, 20% चोऱ्या उघड

बीड / अमोल मुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात पोलिस यंत्रणा केवळ लाचखोरीपुरती उरल्याचा आराेप होत अाहे. जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यांच्या काळात जिल्ह्यात तब्बल २४० घरफाेड्या, ४९ जबरी चोऱ्या तर १ हजार ६८ चोऱ्यांची नोंद झाली आहे. यापैकी केवळ १७ टक्के म्हणजे ४१ घरफोड्या आणि २०% म्हणजे २२३ चोऱ्या उघडकीस आणण्यात पोलिस यंत्रणेला यश आले आहे.

विनयभंगाच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी आणि गुन्हा फायनल करण्यासाठी ३० हजारांच्या लाचेची मागणी करून १० हजार रुपये यापूर्वीच स्वीकारून उर्वरित रकमेतील १५ हजार रुपये स्वीकारताना सोमवारी रात्री औरंगाबादच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने एका अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्याला पकडले. दरम्यान, अधिकाऱ्यासह कर्मचारी अडकल्याने पोलिस दलातील लाचखोरी पुन्हा चव्हाट्यावर आली आहे. जिल्ह्यात एकीकडे गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडत असताना दुसरीकडे यंत्रणा मात्र गांभीर्यहीन आहे. कायदा-सुव्यवस्था अबाधित राखणे आणि गुन्हे अन्वेषण करणे हे पोलिस यंत्रणेचे महत्त्वाचे काम असते. मात्र, जिल्ह्यात जानेवारी ते नाेव्हेंबर या ११ महिन्यांच्या काळात २४० घरफोड्यांची नोंद झाली आहे. यापैकी केवळ ४१ म्हणजे १७ टक्के घरफोड्या उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. तर, जबरी चोरीच्या ४९ गुन्ह्यांची नोंद झाली असून यापैकी ३४ गुन्हे उघड झाले आहेत. चोरीचे ११ महिन्यांत १ हजार ६८ गुन्ह्यांची नोंद झालेली असून यापैकी २२३ म्हणजे सुमारे २० टक्के गुन्हेच उघड झाले आहेत.

डीबी पथके नावालाच : जिल्ह्यात प्रत्येक पोलिस ठाणे स्तरावर गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी डीबी पथके स्थापन करण्यात आलेली आहेत. मात्र, एक-दोन माेजकी पोलिस ठाणी सोडले तर इतर ठाण्यांमधील डीबी पथके केवळ नावालाच उरली असून त्यांच्याकडून कुठलेही गुन्हे उघड झालेले नाहीत. तपासाचा भाग स्थानिक गुन्हे शाखेच्या भरवशावर सोडला जातो. अनेकदा एलसीबीने पकडलेले आरोपीही ठाण्यातून पळून गेल्याच्या घटना घडलेल्या आहेत.

आदेशानंतरही प्रत्यक्षात काम नाही प्रत्येक महिन्याला पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर हे जिल्ह्यातील सर्व ठाणेदारांची गुन्हे आढावा बैठक घेतात. प्रत्येक बैठकीत गुन्हे उघडकीस आणण्यासाठी ठाणे प्रमुखांना सूचना दिल्या जातात. बैठकीतही सर्वजण तयारी दर्शवतात. मात्र प्रत्यक्षात काम होत नाही. ठाणेदारांकडून एसपींच्या सूचनांना केराची टोपली दाखवली जाते.

हप्तेखोरीचा डाग कधी पुसणार? बीड जिल्हा पोलिस दलावर कायम हप्तेखोरी, लाचखोरीचा आरोप केला जातो. पावसाळी अधिवेशनात आ. संदीप क्षीरसागर, आ. सोळंके, आ. मुंदडा , आ. आजबे यांनी तर तत्कालीन एसपींची हप्तेखोरी पटलावर मांडून वाभाडे काढले होते. आता अधिवेशनाच्या तोंडावर पुन्हा लाचखोरी समोर आली आहे.

तपासाच्या सूचना चोरी, घरफोड्यांच्या बाबतीत शहर स्तरावर डीबी पथके आहेत. ग्रामीण भागात अधिकचे मनुष्यबळ नसल्याने डीबी पथके फारशी अॅक्टिव्ह नाहीत. अधिकारी स्तरावर तपासाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. - नंदकुमार ठाकूर, पोलिस अधीक्षक, बीड

बातम्या आणखी आहेत...