आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशेतातून गेलेल्या विद्युत तारांचे वाऱ्याने घर्षण होऊन झालेल्या शॉर्टसर्किटमुळे ऊस पेटला. उन्हाचा कडका आणि वाळलेले पाचट वाऱ्याने पेटत गेल्याने आग क्षणात सर्वत्र पसरली. या आगीत उसाचे फड पेटल्याने अवघ्या तीन तासांत १२५ एकर ऊस जळून खाक झाला. ही घटना तालुक्यातील सौंदाणा शिवारात घडली. या दुर्घटनेत ३२ शेतकऱ्यांचे २ कोटी २० लाखांचे नुकसान झाले.
सौंदाणा शिवारात विजेच्या थकबाकीमुळे मागील १५ दिवसांपूर्वी विद्युत महावितरण कंपनीने बनसारोळा येथील ३३ केव्ही विद्युत उपकेंद्रावरून वीज पुरवठा खंडित केला होता. त्यामुळे मागील १५ दिवसांपासून शेतात वीज नसल्याने पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. अशा परिस्थितीत ऊसतोडणी करणाऱ्या मजुरांच्या काही टोळ्या निघून गेल्या होत्या. तोड करण्यासाठी टोळ्यांची कमतरता असताना मंगळवारी रात्री या गावातील शेतातील विद्युत पुरवठा सुरू केला होता. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील तारा लोंबकाळलेल्या अवस्थेत असल्याने शेतकऱ्यांनी वेळोवेळी तारा ओढून घेण्याची मागणी करूनही दुर्लक्ष केले. त्यामुळे बुधवारी रामचंद्र भिसे यांच्या शेतातील तारेचे शॉर्टसर्किट होऊन तारा तुटून शेतात पडल्या. तर ठिणग्या उडून उसाच्या पाचटावर पडल्याने आग लागली. आगीत १२५ एकर ऊस जळल्याने ३२ शेतकऱ्यांचे २ कोटी २० लाख रुपयांचे नुकसान झाले. दरम्यान, आमदार संजय दौंड, भाजपचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांना या घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाईहून अग्निशमन दल पाठवले. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणल्याने अाणखी उसाचे फड आगीपासून वाचले.
या ३२ शेतकऱ्यांचे झाले नुकसान : सौंदाणा येथील शेतकरी जगन्नाथ नांदूरे, रुपाबाई दहिरे, धनंजय नांदूरे, नितीन भिसे, मालाबाई चव्हाण, भानुदास चव्हाण, शाहू भिसे यांचा प्रत्येकी १ एकर, रमेश भिसे, किसन भिसे, गणेश भिसे, स्वाती भिसे यांचा प्रत्येकी ३ एकर, राजामती भिसे, अण्णासाहेब भिसे, युवराज कटकुरे, सतीश चव्हाण, उषा भिसे, अमर चव्हाण यांचा प्रत्येकी २ एकर, प्रदीप भिसेंचा २ एकर २८ गुंठे, नरसू भिसेंचा २ एकर, सूर्यकांत नांदूरे, अविनाश नांदूरे, बाळासाहेब भिसे यांचा प्रत्येकी ६ एकर, अशोक नांदूरे, कुलदीप भिसे यांचा प्रत्येकी ३ एकर, शहाजी भिसेंचा ५ एकर, महादेव चव्हाण यांचा ४ एकर, अनुराधा भिसे व प्रेमदास भिसे, रामभाऊ भिसे यांचा प्रत्येकी २० गुंठे, साहिल भिसेंचा ४ एकर, ब्रह्मदेव भिसे व रामचंद्र भिसे यांचा प्रत्येकी दीड एकर ऊस जळाला.
महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केले फोन बंद
सौंदाणा येथे बनसारोळा येथील ३३ केव्ही उपकेंद्रावरून विद्युत पुरवठा केला जातो. आग लागल्यानंतर उपकेंद्राचे कनिष्ठ अभियंता नाकडे, लाइनमन शिंदे, तेलंग यांच्याशी संपर्क साधला. मात्र ते घटनास्थळी आले नाहीत. उलट या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी फोन बंद केले. -विजयकुमार नांदुरे, सरपंच, सौंदाणा, ता. केज
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.